अभंग

सान्त दृश्ये सारीं पसरिलीं सर्वत्र भव्य देहगात्र अनन्ततेचें।।

तुझ्या सौन्दर्याचे सुवास-सेवन ।

करावया नयन भृंग झाले ॥

किरणगुंजी असली घालतांना त्यास ।

पंख हलवायास नुरे भान ॥

म्हणूनी राहिले अचल ते स्वस्थानीं ।

तुला मी गाऊनी आळवितांना ॥६१॥

 

कृतान्ताचे क्रूर नेत्र ते पाहून ।

जीव हा हांसून पुढे जाई ॥

फोल चाखी मृत्यू अभंग तो आत्मा ।

घेत पुनर्जन्मा पुन्हा पुन्हा ॥

मृत्यूचा कोंबडा दाण्यासाठी हिंडे ।

तया न सांपडे कधीही तो ॥६२॥

 

उघडतांच नेत्र स्मिते दिसली सगळी ।

तुझी अन्तराळी विखुरलेली ॥

श्वास होतां चालू तुझीच चेतना ।

घेऊनी जीवना सुरूं केले ॥

जागृती होतांच विचारांची चित्तीं ।

तुझी रम्य मूर्ति चिन्तियेली ॥६३॥

 

मला कांहीतरी हवेसे वाटते ।

जया हीं न गीतें कधी गातीं ॥

उगम - केन्द्र नाही दीप्तीचे या ठावे ।

सदा कां नाचावे तिने मात्र ॥

भोवतीं हा उजळा कसा केव्हा होतो ।

जीव हा नाहतो आनन्दात ॥६४॥

 

सान्त दृश्ये सारीं पसरिलीं सर्वत्र ।

भव्य देहगात्र अनन्तेचें ॥

तिच्याच एकत्वी सत्यता सर्वांस ।

सिद्ध हा आभास विविधतेनें ॥

विविधत्व जन्मतें सान्ततेच्या साठीं ।

तिचा वास पोटी अनन्तेच्या ॥६५॥

 

प्रतिभेची अस्वलें नाचवाया जगतीं ।

चालते भ्रमन्ती अशी माझी ॥

असा मी दरवेशी कशाला जन्मलों ।

ध्येय कां विसरलो दिव्य माझें ॥

दीड दमडीच्या त्या स्तुतीच्या बोलास ।

कसें वाहिलेंस आत्मतत्त्व ॥

अनन्ते-ते पायीं विरूनीया जावे ।

व्यर्थ कां नाचावें काव्यतोषें ॥६६॥

 

तेथें उभी तशी किती तूं राहशील ।

किती थांबशील कशासाठीं ॥

सुचेना कांहीच करावें मीं काय ।

धरूं का ते पाय या क्षणींच ॥

अनवधान खेळे तुझ्या भालावरीं ।

सान्धे ही सत्वरीं साधूं कां मी? ॥६७॥

 

फुला फत्तरांत एवढल्हा फरक ।

फुलाला ठाऊक कोमेजणें ॥

हेंच माझें भाग्य मरणार मी आहे ।

अमृतत्व ते राहे मला दूर ॥६८॥

 

हृदय माझे असल्या वृत्तिंनी फुलेलें ।

चित्त हे झुलेले तत्त्वरंगी ॥

सखी प्रतिभा असली जिच्या कटाक्षांनीं ।

विश्व हें मोहुनी सर्व जावें ॥

ध्यान, गान, मनन सदा ऐसें चालें।

आनन्दांत डोले असा जीव ॥

खरें पाहता खोटीं ही बोलणीं ।

पोर मी रंगुनी त्यांत जाई ॥

परी अनन्तते तुझ्या पायावरी ।

आत्म्याची बासरी फेंकिली ना? ॥६९॥

 

भरे पुरेपुर प्याला हा भक्तीचा ।

शराब प्राणांचा काढियेला ॥

जातांच ओठांशी असला माझा पेला ।

दिव्य धुन्दि तुला प्राप्त व्हावी ॥

तुलाही देहाचें भान नुरल्यावरी ।

त्याच हृदयावरी झोपशील ॥७०॥

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search