अभंग

युगांची पाऊलें टाळूनीया संथ कालराज जात कुठे सांगा।।

दिव्य ते अनुभव विरूनिया गेले।

ते पुन्हां आणिले कुणीं चित्तीं ॥

गीत ते संपलें कुठूनी हे नाद।

काढिती पडसाद पुन्हां पुन्हां ॥

नेत्र कां मिटलेले, स्वप्न तें भंगले।

आयुष्य संपले श्वास कां हा? ॥४१॥

 

झुळूक वार्‍याची नजर त्या तार्‍याची।

मला जाचाया(य्)अशीच का? ॥

सृष्टीच्या दृश्यांनीं असे हे दुखवावे।

अनन्तेनें रहावे तसें दूर ॥

अभाग्याला नाही प्रेम तेंही ठावें।

कसें मी कंठावे आयु सांगा ॥४२॥

 

येथेंच दिसते हे प्रकाशाचे मूळ ।

काळी जी काजळी दिव्याची त्या ॥

निळया या बुबुळीं तेजकिरणे निघतीं।

जीवने जन्मतीं मृत्यूमध्ये ॥४३॥

 

पुन्हा पुन्हा यावें तुझ्या घरट्याकडे।

परी न सांपडे जीव माझा ॥

कुठेसा तेथेच ठेविला आहे मी।

मागल्याच जन्मीं असें वाटे ॥४४॥

 

ताडपत्र काळें निशेचें घेऊनी लेख हा वाचुनी कोण पाही ॥

अर्धपडा लागे तारकांचा अर्थ ।

परी हा अज्ञात किती भाग ॥४५॥

 

रांग ही तार्‍यांची खावया बैसली।

निशा भातूकली खेळुं लागे ॥

चन्द्रिकेचें पेय पडता पानावरी ।

तारा तारा करी पान त्याचें ॥४६॥

 

युगांची पाऊलें टाळूनीया संथ कालराज जात कुठे सांगा ॥

निघालाना तोही माझ्या वेशींतुनी ।

स्वशिर माझ्या चरणी ठेवुनीयां ॥

तसा आशीर्वाद त्याला दिला मीच ।

“चालू दे तो नाच तुझा स्वैर ॥

मानवांची कुलें चिरड पायांखाली ।

सृष्टीलाहि घाली तुझे फास ॥

माझ्याच आशीनें सारे चराचर ।

होऊनी हें अमर सदा नान्दे ॥

तूहि नान्द तैसा सवे त्यांच्या काला ।

गूढ माझी लीला अशी चाले” ॥४७॥

मृत्यूची पासोडी जीवनाचे तोंडी । टाकुनीया उघडी नेत्र माझे ॥ वस्त्र येतां आड चामड्याची दृष्टि । पाहावया सृष्टि अन्ध होई ॥ मृत्यूचे पटल हें जीवचक्षूपुढें । अमृतत्व खडे करीतसे ॥४८॥

चालतांना यावे अधान्तरी ऐसें । मनीं कां येतसे सदा सांग ॥ पायांनी चालतां खालची ही भूमी । कधीही सर्वथा न संपेल ॥ पृथ्वि ही हिंडलो जरी ना मी सारी । येणें तुझ्या घरी नसे शक्य ॥ स्थलातीत वास तुझा ना तो आई । स्थलान्तरे येई कसा जवळ ॥४९॥

नको इकडे पाहू नको मजला ध्याऊं। नको गीत गाऊं सये, असलें ॥ प्रीतीच्या भावांनी रसरसतो नयन । तया माझें मन नसे योग्य ॥ निष्प्रेम जीव हा तयाला प्रार्थुनी । व्यर्थ कां जीवनीं कष्टतेस? ॥५०॥

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

Dr. Samprasad Vinod - 09373686537

Dr. Mrs. Rujuta Vinod - 09371934520

Copyright 2019. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search