अभंग

जीवनें नाचावे मृत्यूच्या तालांत। अनन्तेला साथ सान्ततेची।।

भयाण रात्रीच्या मनामध्ये जाऊं।

धीरतेनें जाऊं आत्मगीत ॥

काळया काळया जगां भ्यावयाचें नाही।

तुला हीच ताई विज्ञापना ॥३१॥

 

परीसाला एका दुजा तो लागतां।

कशी सुवर्णता सिद्ध व्हावी? ॥

अग्नीला अग्नीचे जाळणे शक्य न।

जीवने जीवन भिजे कैसे? ॥

प्रेमानें वाढणें कधीही न प्रेम।

सृष्टीचा हा (नियम) नेम अनन्तते ॥

दिलें तुजला प्रेम हीच माझी चूक।

आता ती - न भूक कधीं शमणे ॥३२॥

 

‘जरा जाऊं पुढें’ असें सांगुनीयां।

निर्जन स्थळीं या आणिलीत ॥

असा तुमचा हेतु मला नव्हता ठावा।

साधलात कावा तुम्ही मात्र ॥

कुठेंही का न्या ना मिळेल ना प्रीति।

जरी मी सांगाती जन्मोजन्मीं ॥

मी ही अनन्तता तुमचे ते जीवित।

सदा मर्यादित असत्याचें ॥३३॥

 

मृत्यूच्या शेजारी बसूनी जीवित।

अमृतत्व - गीत सदा गाई ॥

मृत्यूला तयाचा अर्थ नाकळून।

स्वत:लाच धन्य मानितो तो ॥

`अमृतत्त्व' साध्य ‘मृत्यू’ हे साधन।

तया आदरून ध्येय गाठूं ॥३४॥

 

अभाव नी भाव सापेक्ष भासतो।

प्रत्येक बिंबतो दुज्यामध्ये ॥

अभाव अत्यन्त कुठेही नादळे।

भाव-त्व हें मिळे सर्व ठायीं ॥

हेतुयोगें होतें अभाव, भाव-ता।

द्वन्द्व तें तत्त्वतां हेतुमूल ॥

हेतुदृष्ट ऐसें वस्तुत्व तो भाव।

अदृष्ट तो अभाव वस्तूचा त्या ॥३५॥

 

विचार करितांना आधी इच्छा येई।

इष्यमात्र होई मनन-हेतु ॥

ज्ञान सारे माझें असें असायाचे।

मनोविकृतीचे बाह्य रुप ॥३६॥

 

अपूर्णानें येई विश्वदृष्ट्या शोभा।

पूर्णतेचा भागा न्यूनताही ॥

फुललें सौन्दर्य विरुपता-जले।

सत्य हे सजेले असत्यानें ॥

जीवनें नाचावे मृत्यूच्या तालांत।

अनन्तेला साथ सान्ततेची ॥३७॥

 

छे, न आले मनी कधींही हे असे।

मलाही उसासे असें यावे ॥

निसर्गते मला करूनी दीनवाणी।

कां अशी जीवनी फिरवितेस? ॥

हिरकणीसारखी कठोर जी वृत्ति।

तिला कांहीं प्रीति आठवावी ॥३८॥

 

ढोलक्याचा नाद दूर कोठेंतरी।

येउनी अन्तरी दुणावतो ॥

गंभीर अर्थ जे सवे त्यांच्या येती।

तयांनाच रात्रीं ठेवि चित्तीं ॥

जवळीं तूं नसतां ते उसने मी घेउनी।

सन्तोषतों मनीं तशा वेळीं ॥३९॥

 

पाकळया मोजाया कुठेही सुरुवात।

करावया येत कमलिनीच्या ॥

वर्तुळा प्रारंभ बिन्दु कोठलाही।

करुनीया देई परिघ-रेषा ॥

कोठलेही दृश्य आकळूनी घेतां।

कळते अनन्तता पूर्णतेने ॥४०॥

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search