अभंग

विसरलो करण्याचे सुखे द्रव्यार्जन। ज्ञानाचें मोहन - परी, मोठे।

स्मशानांत व्हावा सदा माझा वास।

हाच चित्ता ध्यास आतां लागे ॥

जगाचा जीवाचा वीट पुरता आला।

जिवाला न उरला हेतु मुळीं ॥

वायुला भवतीच्या पोटांत घेऊनी।

देणेच सोडूनी दुज्या क्षणी ॥

अशा या जगण्याला कशाला गोंजारू।

बुडवुं द्या हे तारु - जला मध्ये ॥८९॥

निजावेसे वाटे तशा तिरडीवरी।

जीव या शरीरीं नको राहणे ॥

सुखाची ती शय्या कधी आदरीन।

निर्र्वेध हिंडेन- जगामध्ये ॥

स्वप्न सृष्टी दिसे निद्रिस्त असतांना।

मृतांच्या नेत्रांना तत्त्व दृष्टि ॥

तुला, आकाशाला ढगांना देवांना।

बघूं दे सर्वांना - मृत दृष्ट्या ॥९०॥

 

काषाय वस्त्रांनी बुद्धिला झाकिलें।

दूर ते टाकिले - ज्ञान - वेड ॥

क्षणामध्ये एका संसार सोडिला।

ज्ञानाने ना दिला परी जीव ॥

विसरलो करण्याचे सुखे द्रव्यार्जन।

ज्ञानाचें मोहन - परी, मोठे ॥

क्षणीं याच झाली सुटका तयांतुनी।

-आणि भक्तिगानीं जीव रंगे ॥९१॥

 

नाटकी पेहेराव निर्धना घालुनी।

राजपुत्र म्हणुनी - हिंडवीले ॥

मुद्रिकेच्या अंगी फत्तरा बसविले।

नांव दिधले हिरा - असे त्यासी ॥

मढ्यांत सोडिला आणूनिया वायू।

तयाला मीं आयु समजलो ॥९२॥

 

गाभ्यांत ज्ञानाच्या अनुभवाचा देव।

नेउनीया ठेव मध्यभागी ॥

फुलांत केसर नेत्रांत बुबुळ।

अनुभवाचा मेळ तसा ज्ञानी, (गीती)॥९३॥

 

भिकारी तुझ्या घरापाशी।

येउनीया अशी - भीक मागे ॥

हृदयाचे पात्र हें पुढे धरिले आहे।

जें तुलाच वाहे - जन्मजन्मी, अनंतते ॥

पात्रांत टाक त्या तुझे प्रति-प्रेम।

नंतरी निष्काम - जीव होई ॥

कुठें ही जाईन - तुझी आज्ञा होतां।

कटाक्ष मागुता - तुझा यावा ॥९४॥

 

मन:सरितेवर गीत पुष्प- (माझे?)।

त्या सवे तरंगे - तुझे रुप ॥

म्हणूनीया येई गीतांस सौरभ।

विश्व गुंग होई - जयांवरी ॥९५॥

 

नेत्रांत बिंबला (मनीचा?) निश्चय।

उचलिलास पाय - पुढे जाया ॥

ओंठ तो पुटपुटे अस्पष्ट कांहीसे।

तूहीं तें नीटसे ऐकिलें न ॥

कुठेंही जा जरी माझ्या विना तुला।

आवडूं लागला - कुणी दुसरा॥

मला मात्र ठावे - दुजे प्रेम नाही।

तुलाच हे गाई श्वास-गीत ॥९६॥

८-११-५८

येथे अचानक कशी झाली भेट।

बोलणे ही स्पष्ट आज झाले ॥

एकमेकां विषयी मला तुजला आतां।

शंका न सर्व था - मुळीं वाटे ॥

हृदये ही गुंफुनी प्रीतिच्या दोऱ्यांत।

या विश्व भोवऱ्यांत फेकिली तीं ॥९७॥

 

तुझ्याच हातांत राहु दे तें फूल।

कटाक्षांची झूल मजला घाली ॥

तशीच तेथेच जन्मजन्मांतरी।

राहुनी मजवरी टाक दृष्टि ॥

नेत्रवाणी वदे ‘फूल घ्या’ हे असे।

सांगु तें मीं कसें परी सत्य ॥९८॥

 

चित्र कोठें कसे दिसे पुन्हा

मनी इच्छा एक शब्दांमध्ये दुसरी।

तिसरीच आचारी तुझ्या दिसते ॥

मनांमध्ये प्रेम शब्दांत अप्रीती।

वागण्याची रीति बेफिकीर ॥

दुरात्म्यांचा मार्ग असा स्वीकारून।

माझें कां वचन असे करिसी अनंतते ॥९९॥

 

मृत्यूच्या शेजारी बसूनी जीवित।

अमृतत्व-गीत-सदा गाई ॥

मृत्यूला तयाचा अर्थ ना कळून।

स्वत:लाच धन्य - मानितो तो ॥

मृत्यू हे साधन अमृतत्व साध्य।

ध्येय गांठू - तया आदरून ॥१००॥

 

देवा - तुला कशी यावी दया।

जोंवरी गावया - इच्छिते मी ॥

निस्तब्ध संगीत निरर्थ वाङ्मय।

जोवरी न होय - मला प्राप्त ॥

तोंवरी तू तसा दूरीच राहून।

मला खुणावून करी त्रस्त ॥१०१॥

 

१४-११-५८

तुषारांत दिसले धनुष्य इंद्राचे।

अनंत-त्व सजले आभासांत ॥

ज्ञान-नेत्रांनी त्या पहातांच जीव।

वरी एकमात्र विश्वरूपी ॥१०२॥

 

मृत्यु चिंतनाने श्रेष्ठ हे जीवन।

बाह्य विश्वे ज्ञान अंतरांचे ॥

आत्मदाने होते माझी आत्मवृद्धी।

विभव-ता शोभते स-योगे ॥१०३॥

 

विचारांचे कार्य भावांचे विनयन।

भाव शून्य ज्ञान विफल होई ॥

मनो भावनेची अवस्था विशिष्ट।

जीविताचे इष्ट सदा असे ॥

भाव शब्दामध्ये अर्थ जीविताचे।

अनुभवाची वाचा सदा बोले ॥१०४॥

 

२०-११-५८

तुझ्या पायाखाली दिसली रज:कण।

आणि माझे स्वप्न तिथेच का? ॥

तुझ्या ओलामधली संपली ती गीति।

मनांतील भक्ती तशीच कां ॥

तुझ्या गालावरचें हास्य दूर गेलें।

स्मरण सुद्धा नुरलें तुला माझें ॥१०५॥

 

प्रेम कथितांच हें तुझ्या गालावरी।

रक्तिमा सत्वरी पहा आली ॥

अश्रु देखिलास नेत्रिं माझ्या जेव्हा।

एक हास्य तेव्हा हासलीस ॥

हृदय माझें कळलें - मोद झाला तुला।

रुकार अवतरला ओष्ठयुग्मी ॥

इतुक्यांत शंका जी एक चित्तीं आली ।

तिने ------------॥१०६॥

 

नकोत शब्द ते यावयासी आड।

शांति-गीत धाड - मनीं माझ्या ॥

नको तसले स्मित - अदृश्य आनंद।

जीवास उन्माद देई माझ्या ॥

कशाला शपथ ही कशाला देवाजी।

एक हे जीवित - तुझे माझें ॥१०७॥

 

चित्तात नाचतो एकलाच नाद।

एक हाच वाद तर्क घाली ॥

सखी अनंतता करी माझे ध्यान ।

माझेंच अर्चन - निरंतर ॥

तिचें माझें चाले एकले संगीत ।

कळे त्याचा अर्थ - एकमेका ॥१०८॥

 

हेतु सिद्दी साठी जीव झाला वेडा।

देवतांनो सोडा अभाग्याला ॥

जाउ द्या एकदा शून्य-तत्त्वीं विरुनी।

नको या जीवनी - मोद घेणें ॥

अंतरात्मा माझा होउ द्या संतुष्ट।

नको मजला कष्ट चेतनेचे ॥१०९॥

 

अनुभवाच्या ग्रंथी मिळाले जे ज्ञान।

तयाने जीवन श्रेष्ठ झाले ॥

बाल्यांत पोशिली फोल स्वप्ने चित्ती।

तयांची ही हाती आली राख ॥

तिलाच फासुनी चित्त - देहा - वरी।

संसार हा करी सुखाने मीं ॥११०॥

 

विश्वगूढ यावे कळूनी एकदां।

विरक्ति संपदा मेळवावी ॥

सत्य उलगडावे - ज्ञान व्हावे स्पष्ट।

म्हणूनी मी कष्ट किती केले ॥

शेवटी जाहली निराशा ही अशी।

जीव पडला फशी वैभवाच्या ॥१११॥

 

बाह्य देहावरी चित्त झाले लुब्ध।

आत्मदेव क्षुब्ध अंतरींचा ॥

तेरड्याचा रंग पाहुनी मी भुललो।

सौरभा आचवलो - केतकीच्या ॥

शरीर सौंदर्य चित्त नेत्रा झुलवी।

नको नीति देवी - शांति दात्री ॥११२॥

 

झोप लागतांच जीव होई शांत।

जाळ जागृतींत चिंतनाचा ॥

नको हे विचार नको ज्ञान गंध।

नसावा संबंध-ईश्वराशी ॥

मनाला विश्रांति कधी नाही ठावी।

कशी भेट व्हावी-शून्यतेची ॥११३॥

 

प्रेम शोधितां हें हाती आले सत्य।

समाधान झाले-अंतरांचे ॥

प्रेमाच्या मृगजला निघावे शोधीत।

पावले टाकीत निराशेची ॥

सत्य-तत्वापुढे असे जावयाचे।

प्रेम व्हावयाचे - ज्ञान दायि ॥११४॥

 

कुणीसें बोलले मला शिकवाया।

कशाला गावया लागतो मीं ॥

गायनाचा हेतु सांगण्या सुरवात।

करू जातां गीत सिद्ध होई ॥११५॥

 

कर्तव्य क्षेत्र हे रणक्षेत्र दिव्य।

दैव देव राहे त्या स्थलींच ॥

कर्तव्य करितांना सुखे यावे मरण ।

तें मात्र जीवन हेतु मूल ॥

भार संसाराचा घेउन या स्कंधी ।

कशाला ही अर्चा संपदेची॥११६॥

 

अनुभवाने ज्ञान कधी मिळणे नाही।

उन्नती न होई ज्ञान योगे ॥

वृत्ति असती सुप्त व्यष्टि तत्वामध्ये।

जीवितार्थ व्यक्त तयांनीच ॥११७॥

 

मनोवृत्ती पाशीं झगडती विचार।

युक्त धर्माचार - गूढ राही॥

वृत्तींनी बोधिला विचारे पटविला।

एकही न दिसला-असा मार्ग ॥

विचाराचे तेज भुलविते बुद्धीला।

वृत्ति मूढ होते हृदय परी ॥११८॥

 

स्वत्वाचे सत्य जे जन्मसिद्ध असते।

जीवनांत फुलतें तेंच बीज ॥

तेंच अंत:सत्य सदां आचरावें।

नीति धर्म द्यावे-फेकुनीया ॥

कशी मजला मुक्ती जगीच्या ज्ञानाने।

इतरीय नेत्राने कसे पांहू ॥११९॥

 

किती वेळा केला सांगण्याचा धीर।

तरी हा ऊर धजावतो ॥

गीति येते ओठी - चितसांडे त्यांत ।

स्पष्ट होई अर्थ न कळतांच ॥

पुन्हा येते कांही मनामध्ये भलते।

प्रेम हे लाजते प्रकाशाला ॥१२०॥

 

संशयाचा राहू पुन्हा चित्ती येई।

सत्य सूर्य होई कलंकित॥

विश्वास वाटला मनन सामर्थ्याचा।

जीव संतोषला निमिष मात्र ॥

पुन्हा गेले माझें समाधान आतां।

कशाला ही व्यथा-विचारांची ॥१२१॥

 

सौंदर्य हें नसे गुणधर्म वस्तुचात।

रुप-नाम विषय बाह्य ॥

सत्य जे आंतर अस्तित्व-खंडात।

सौंदर्य भासत तेंच जीवा ॥

होइ आत्मा प्रीत - आणि बुद्धि नयन।

सौंदर्य दर्शन प्राप्त होतां ॥१२२॥

 

तारा तारा कथी हेच मजला रोज।

तशी या अमोज मनी शंका ॥

पुष्प पुष्प सांगे डुलुनी बागेंत।

अनन्ततेची / अनंतेची प्रीत मजवरीच ॥

परी नाही होत समाधान जीवा।

प्रीतिला न ठावा - मोदभाव ॥१२३॥

 

अंतरात माझ्या माझा `मी' प्रियसखा।

सदा हाकां मारी - स्वत:लाच ॥

शब्द ते लोपती विश्वाच्या अंतरीं।

आणि माझ्या उरी तयाचे ते ॥

माझ्यांत विश्व हे मीं पुन्हा विश्वांत।

आप आपुले गीत फेंकितो हे ॥१२४॥ (गात राहू)

 

जाणिती ती असत्ये बुद्धिचे हे नयन।

नसे सत्य ज्ञान तयांना, ते ॥

ठाउक मात्र ह्या दु:खांच्या वेदना।

सौख्य माझ्या मना नसे ठावें ॥

विश्व हे जाणिले - परी विश्व कर्ता।

मला कां सर्वथा - अनज्ञान ॥१२५॥

 

नको हे जगण्याचे वेड माझ्या चित्ता।

मर्त्य मानवता नको मजला ॥

अंतरंग आता पाहिल्यावरी ही ।

कसे सांग बाह्य देहीं - रमावे मीं ॥

जगांतील इथले घेतले अनुभव। न

से लुप्त् जीव त्यांत आता ॥१२६॥

 

तुझ्या प्रेमामुळे जखम झाली जीवा।

चित्त झाले खुळे तुझ्यासाठी ॥

क्षणोक्षणी तुझी मूर्ति आठवावी।

भक्ति साठवावी - गीत ध्यानी ॥

तुला मात्र त्याचे काही न वाटावे।

कां असे असावे अनंतते ॥१२७॥

 

सत्य ये ओठांशी परी बोलूं कैसे।

कशाला उसासे पहावे तूं ॥

बरी ही वचना - तुझी जी होतसे।

अप्रेम तें नसे तुला ठावे ॥

सुखे जावा जन्म सौख्य संभ्रमांत।

पहावे अज्ञात कृष्णसत्य ॥१२८॥

 

भीक एवढीच तुजपाशी मागतो।

हस्य सांगतो मनातले ॥

विस्मरून जा ते ऐकता क्षणींच ।

किती मी हा नीच नको स्मरूं ॥

तसे तेव्हा आले मनामध्ये कसें।

मला सुद्धा नसे ज्ञान त्याचें ॥१२९॥

 

मनामध्ये माझ्या - वासना एकही।

कधी आली नाही - अनैतिक ॥

अप-शब्द एकादां कधीही न वदलो।

कधीही न पडलो प्रेमपंकी ॥

एक सहजाचार असे मजला ठावा।

एक वेड जीवा अनंतेचे/ अनंततेचे ॥१३०॥

 

किती वेळा सांगूं पुन: पुन्हां तुला।

जीव हा अर्पिला तुझ्यापायी ॥

तुझे गीत शब्द राहिले मनांत।

शोभले नभांत जसे तारे ॥

त्याच शब्दांसवे पावलें टाकीत।

चालत्ये शोधीत अनंतेला/ अनन्ततेला ॥१३१॥

२१-११-५८

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

Dr. Samprasad Vinod - 09373686537

Dr. Mrs. Rujuta Vinod - 09371934520

Copyright 2019. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search