अभंग

मरणांनी मारिले कितीदां आशेला। तरीही न सुटला छंद तुझा।

सुरुवांत झर झरा मंद मंद दु:खी।

पावलांस टाकी - काळ माझा ॥

अजाणतां असा होई कालक्षेप।

जीविताचें माप - कसे व्हावें ॥

जन्म मृत्यू झाले कुणा ठावे किती।

असे मोक्षस्थिती हीच किंवा ॥४६॥

 

विचाराचे पाय टाकितांना कांटे।

कोठले या वाटे लागतात ॥

निरनिराळी दृश्ये बोंचती न कळतां।

जिवाला खिन्नता प्राप्त् होई ॥

माझे कांही तरी जेथे तेथे सांडे।

पुन्हा तें सापडे मला केव्हां ॥

कित्येक जन्मांच्या नेत्रांनी शोधिले।

परी जें हरपलें मिळे तें न ॥४७॥

 

असां हा भोवती जनांचा संमर्द।

तरी ही एकांती जीव रंगे ॥

कित्येक जन्मांचा वियोग आडवा।

विस्मृति न जीवा तरी तुझी ॥

मरणांनी मारिले कितीदां आशेला।

तरीही न सुटला छंद तुझा ॥

केलेस दुर्लक्ष कितीदां गीतांकडे।

तरी मी बडबडे तुझ्या साठीं ॥४८॥

 

घेतांच लोळण तुझ्या पायावरी।

शरीर सत्वरी सजीव-ले ॥

पूर्वि होते वाटे - निष्प्राण जीवन।

चुंबिता हे चरण तुझे देवी ॥

चेतना देहासी आनंद चित्तासी।

दिव्यता मर्त्यासी - मला लाधे ॥

तसेच राहुं दे - चरण येथें तुझे।

शिराचें या ओझें - तिथे राहो ॥४९॥

 

नभांत सांडती चंद्रिकेची किरणें।

मनांत चांदणे तसे माझ्या ॥

सहज झाली तुझें इतक्यांत संस्मरण।

चित हे लक्कन - उजाळले ॥

स्मृतीचाही इतका प्रताप तेजाळ।

सहवास कौतुका - कसे वर्णू ॥५०॥

 

पापांची पावले टाकीत चाललो।

म्हणूनी हा आलो तुझ्या देशीं ॥

हुडाकला काळोख सदां दुर्वृत्तींचा ।

जीव हा बुडविला - अनीतींत ॥

सदाचाराची ती तेजस्विनी भूल।

कधी अंत:करणी न मातली ॥

नेत्र हा मिटेल - पाहतांच आत्म्याचें शोधन देई अनाचार ।

जयाचा आधार सांततेला ॥५१॥

 

विश्व सारे नटले माझ्या सुखासाठी।

सूर्य माझ्या पाठीं फिरतसे ॥५२॥

 

“टिचकी ही लागतां अशा गालावरती।

जातसे अंतरी कुठेशी ती ॥

तिचा सुख स्पर्श जीवासि टोचतो।

देहासि बोचतो जेथ-तेथे ॥

हर्ष सांडु लागे शब्दांत चेहर्‍यांत।

नयनांत श्वासांत - रोम रोमी ॥

जरी तुजला व्हावी रुची या हर्षाची।

तरी या देहाची भेट घेई अनंतता” ॥५३॥

 

पहिल्याच पासून मला होती ठावी।

तुझी वृत्ति भावी - अशी होणे ॥

बोललीस तेव्हा शपथ ती घेऊन।

हातांत देउन - तुझा हात ॥

परी नव्हतें तुझें - तुझ्या हातीं हृदय।

तुला कसला काय दोष देणे ॥

दयां तरी तुजला अभाग्याची आली।

तयानें हि झाली - मना शांति ॥

जा सुखे - कुठेही तुझे पुण्य स्मरण।

सुखवील जीवन - सदा माझे ॥५४॥

 

इतक्यांत येशील असें जें वाटतें।

तयानेच होते समाधान ॥

अधीर चित्ताने वाट मी पाहिली।

सारखी सोशिली - निराशा ही ॥

अनेक जन्माची अशी माझी तृष्णा।

प्राशुनी जीवना वाढलेली ॥५५॥

 

तापल्या सृष्टीच्या उष्ण निश्वासांनीं।

आग वातावरणी - लागली ही॥

पोळतो हा ऊर वायु घेता आंत।

जीभ कीं भाजत श्वास योगें॥

एक दावानल - भडकला अंतरी।

जाळ ते शरीरी - पेटतात॥५६॥

 

मनीं माझ्या होतें तेंच आले घडुनी।

कळी आली फुलुनी - इच्छिलेली ॥

नभांगणी नाचे मनीचीं तारका।

आले ऐकू सूर अंतरींचे ॥

देवता चिंतिली अवतरे तीच ही।

जीव जन्म घेई - इष्ट देहीं ॥५७॥

 

थकले मोजुनी मोजुनी।

कितीदा जन्मुनी - पाहिले मीं ॥

तोच तोच स्वर - सदा आळवोनी।

तान तीच गानीं खेळवील ॥

कधी संपायाचे असे हें गायन।

कधीं जन्म मरण चुकायाचे ॥५८॥

 

(आवाजांचे संघ?) फिरते हे - घुमविती आकाश।

माझिया चित्तास गीत शब्द ॥

वनस्थली पुढें नाचतो निर्झर।

बागडे हा सूर - तुझ्या पुढें ॥५९॥

 

सहज बोललीस शब्द तो तूं गूढ।

चित्त माझे मूढ - तरी झाले ॥

जीवास वाटलें - आनंदाची उषा।

घेत शब्द वेषा - जणूं आली ॥

पुरी दुसऱ्या क्षणीं - नुरलें मोहन।

जीवन स्मशान - पुढे दिसलें॥६०॥

 

वादळांत असल्या कुठें सांपडत।

आलीस कोठून - इथे सांग ॥

केंस हे विखुरले - स्कंध देशी भाली।

आणि कांही गाली खेळतात ॥

थरारे अंग हे - भीति मूर्तिमंत।

जणू सिद्ध होत - शरीरस्थिती ॥

चिंब ओला पदर - ढगांनी नयनांनी।

अश्रूंस गाळूनी - असा केला ॥

शून्य दृष्टीने या धरेस पाहसी।

वाटते प्रार्थिसी - दुभंगण्या ॥

धरेच्या पोटांत - नको ऐशी जाऊ।

अंतरीं या ठेऊ - तुला का मी? ॥

जेथ होती माझी - (तत्त्व) गीते स्फूर्त।

तयांना ऐकत - रहा सुखे ॥६१॥ (रहा ही ऐकत - अनंत-तें।)

६-११-५८

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

Dr. Samprasad Vinod - 09373686537

Dr. Mrs. Rujuta Vinod - 09371934520

Copyright 2019. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search