अभंग

कृतांताचे क्रूर नेत्र ते पाहून जीव हा हासून पुढे जाई। फोल चाखी मृत्यू - अभंग तो जीवात्मा

तुझ्या केशपाशी ओठ हा लावू दे।

पुष्प हे ठेवूं दे चुंबनाचे।।

पुष्प सौरभे त्या विश्व हें मोहून।

आपुले मीलन न देखेल! ॥९५॥

 

तुझी ती अंगुली, जाई ओठापाशी।

सांगते गूज कांही, बोलते तुझ्याशी ॥

अंगुली ताईने, तुला माझे हृदय ।

विदित केले काय, मला सांग अनंतते ॥९६॥

 

स्थलाचे कालाचे किनारे हे दोन।

अस्तित्व उद्धीचे भासता।।

आत्मचक्षू याही - काळावरुनी ह्या ।

जलाच्या हालत्या - जशा लाटा।।

अस्तित्वाचे बंध आत्मास अज्ञात ।

दृश्ये जो देखत - साक्षि दृष्ट्या ॥९७॥

 

शारीर प्रीतीनें - विकलांग होउनी ।

चित्त हे सडूनी जावयाचें ॥

आत्मतत्त्वाची जी क्षयाची भावना।

तियेच्या यातना प्रीतिरुप ॥९८॥

 

वासनेनें प्रेम अश्रद्धया ज्ञान।

कीर्ति-लोभे दान - व्यर्थ जाई ॥

मूर्तिनें हे देव शास्त्रयोगे वृत्ति।

फलेच्छेने कृति - व्यर्थ जाई ॥९९॥

 

थोडीशी सु-स्थिति मलाही देऊन ।

अशी माझी मान - कांपली का? ॥

कशाला देवाजी जाहला कनवाळू ।

कां मला लाधला - बुद्धिठेवा ॥

मुलाम्याचे ज्ञान मनाला फासून ।

जीव हा त्रासून - असा गेलो ॥१००॥

 

आत्मनिवेदन हीच माझी भक्ति।

आणि आत्मगीति हीच अर्चा ॥

श्वासाश्वासासवें शब्दाशब्दा सवे।

भक्ति - गीत गावें - हीच इच्छा ॥

भक्तिनें पूर्णात्मा गीतीनें अंशात्मा ।

पावतो आरामा - चिरंतन ॥१०१॥

 

विषाचा पेरावा करुनीया ऐसा।

घ्यावया विसावा नको जाऊं ॥

एक एक शब्द जणूं कालकूट।

श्वास माझा स्तब्ध करू पाहे ॥

अनंतते अशी नको जाऊ दूर।

आसवांचा पूर वाहतो हा ॥

रात्रिदेवी देते चांदणे, काळोख ।

मोद आणि दु:ख तसे तूही ॥१०२॥

 

तुझ्या सौंदर्याचे, सुवास-सेवन ।

करायास नयन, भृंग झाले ॥

किरणगुंजी असली, घालतांना त्यांस।

पंख हलवायास, नुरे भान ॥

म्हणूनी राहिले, अचल ते स्वस्थानीं।

तुला मी गाऊनी, आळवितांना ॥१०३॥

 

निशा मेघ गळला, शुभ्र चंद्रिकेंत।

अंतरिक्ष-क्षेत्र, पिका आलें ॥

अनंत धान्यें हीं, तारकांच्या रुपें।

कोणत्या मीं मापे, मोजणार ॥१०४॥

 

केर कचर्‍याची ही - शेज अंगा खाली ।

धूळ दिसते गाली - लागलेली ॥

मंद मंद चाले श्वास जो हवेंत ।

तयाने कंपित तमस्तेज? ॥१०५॥

 

विजेचा चमत्कार नभीं ऐसा व्हावा।

काळोख लागावा दिसूं पुन्हा ॥

अधिक ही वाढते भीति त्याने मात्र।

भोवताली रात्र - दुणावते ॥

वाढवी निराशा तुझा निमिष हास ।

जीव हा उदास अधिक होई ॥१०६॥

 

अश्रू हे गाळण्या मला वाटे लाज।

परि ना इलाज - दुजा ठावा ॥

तुझ्या चित्तीं आहे बीज ते प्रीतीचें।

तेंच वाढायाचे जन्मजन्मी ॥

नेत्र सालिलेंच म्हणूनी गाळितो ।

रसदा आंसवाना परी न वासना तुष्ट होई ॥१०७॥

 

तशी कोल्हे कुई जगाची चालूं द्या।

मला एक वंद्या अनंत-ता ॥

इतर सारे देव तिच्याच रुपाने।

येताच नेत्रानें आकळीन ॥

एरव्ही अदृश्य तयांचे अस्तित्व।

हे न आत्मतत्त्व पूजी यांस ॥१०८॥

 

पुन्हां पुन्हां व्हावें - असे मी दु:खित

। तूं न सत्यतेंत - कधी यावें ॥

आलीस तूं वाटे - जीव हा घाबरे।

देहास कांपरे असें नाचें (येई) ॥

नको येऊ कधी असे हे चालूं दे ।

चित्त हे भुलूं दे आभासाने संभ्रमात ॥१०९॥

 

कसाबकरणी ही कशी केली मींच।

असा झालो नीच जन्मोजन्मी ॥

क्षणोक्षणीं घोर - आत्मनाश चाले ।

परी नाही झाले - समाधान ॥

देह हत्या संपे एकाच निधनांत ।

परी आत्मघात सदा चाले ॥

अनंत ते! सरता करूं दे हा वार ।

होउ दे हें ठार - आत्मतत्त्व ॥११०॥

 

जखम झाली चित्ता सांकळे की रक्त ।

जीव हो भयभीत पाहतां तें ॥

मोडिलेस शब्दा आस ही गारठे।

गीत ही ना उठे - तुझ्या साठी ॥

जा आता - झाले ते असेंच होऊ दे ।

जन्म हा जाऊं दे पुन्हा व्यर्थ ॥१११॥

 

जीवाची सावली मृत्तिकेचा देह।

तियेला कवटाळी कृतांत हा ॥

कृतांताचे क्रूर नेत्र ते पाहून ।

जीव हा हासून पुढे जाई ॥

फोल चाखी मृत्यू - अभंग तो जीवात्मा ।

पुन्हा घेई जन्मा - निजेच्छाया ॥

मृत्यूचा कोंबडा दाण्यांसाठी हिंडे ।

तया न सांपडे - कधी ही तो ॥११२॥

 

ऒठ तो हालला - फुलेला कपोल ।

गांठ बोलाफुला - पडे ऐशी ॥

बोलल्या आशया सुवास अर्थाचा ।

गालिं एक वाचा - स्पष्ट होई ॥११३॥

 

नाचक्की होउ द्या जगामध्ये माझी।

पाप ते भोगू द्या मला पुरतें॥

शापांचे वर्षाव - मजवरी होउन।

देह हा भंगून - असा जावो ॥

नको हा कटाक्ष अंतरीं टाकणें ।

आणि हा चालणे - पुन्हा श्वास ॥

वैताग येउनी जीव द्यावा वाटे।

नाचता ही दाटे अशी चित्तीं ॥११४॥

 

मंगल स्नानानें - अखंड अश्रूंच्या।

माझिया जीवानें शुद्ध व्हावे॥

एक हेतू मनी सदा वागे माझ्या।

निराशा न म्हणूनी कधी होई ॥

गळूं दे आसवें घडो अंत:स्नान।

कधीही न पूर्ण आस व्हावी॥११५॥

१९-९-५८

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

Dr. Samprasad Vinod - 09373686537

Dr. Mrs. Rujuta Vinod - 09371934520

Copyright 2019. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search