अभंग

विकारांचा वास चित्तांत असतांना। सत्याच्या दर्शना कसा घेऊं।

विश्वगूढ तुम्हां उलगडेल केव्हा ।

विचारे विसावा मिळे कैसा ॥

भक्तिच्या नेत्रांनी विश्व हें पाहून ।

रहस्य जाणून चला घेऊ ॥

दिव्य माझे प्रेम जाणितें अज्ञेये ।

ज्ञान दृष्टीं जयां - ओळखीन ॥१४९॥

 

प्रकाशाचे मूळ येथेंच दिसते हे।

काळी जी कोजळ (काजळी) - दिव्याची या ॥

निळया या बुबुळीं तेज किरणें निघती।

जीवनें जन्मती - मृत्यूमध्यें ॥१५०॥

 

आचार सरितेंत आत्म बिंबाची या ।

तरंगावी छाया - पूर्णतेनें ॥

सिद्ध करणें असे तयामध्ये व्हावी ।

सिद्ध व्यष्टि देवी - पूर्णतेनें ॥

धर्माची नीतीची - प्रेमाची सत्याची ।

पूर्तता व्हायाची - अशा योगे ॥१५१॥

 

सिद्धता पूर्णतेने

समर्याद माझें सारेंच अस्तित्व ।

म्हणूनी हें द्वित्व अनुल्लंघ्य ॥

एकत्व भोगाया - नाश लागे व्हावा ।

तो कसा सोसावा - सांततेनें ॥

माझाच जाहला जरी तेव्हां अस्त ।

एकत्व भोगीत - कोण राही ॥१५२॥

 

आत्म्याचे वर्धन - नाश जो स्वत्वाचा ।

मृत्यू जीविताचा जन्म हेतू ॥

स्वत:ला विसरावें स्वेतरांच्यासाठी।

अनंतेच्या काठी - सांततेला ॥१५३॥

 

दोन आत्म्यामध्ये यावी एकात्मता ।

गूढ हें सर्वथा - सुटे कोणा ॥

ऐक्य जें तयांचें सदां होई भव्य।

तयाचा स्वभाव अविज्ञात ॥

विचारी उच्चरी - अंतरी आचारी।

साम्यता का करी असा वास ॥

आत्म बाळे सारी एकाच आईची।

वासरे गाईची एकल्याच॥

म्हणूनी हें होते ऐक्य असले रम्य ।

कुणीसे सांगते - असे मजला ॥१५४॥

 

मागील (दिव्य)ते अनुभव विरुनियां गेले ।

ते पुन्हां आणिले कुणी चित्ती ॥

गीत ते संपले फुटूनी हे नाद।

काढिती झाले स्तब्ध पडसाद- पुन्हा पुन्हा ॥

स्वप्न तें भंगले नेत्र मिटलेले का।

आयुष्य संपले - श्वास कां हा ॥१५५॥

 

स्मृतीच्या मंदिरी अनुभवांचा नाच।

चालुं दे असाच सर्व काळ ॥

हरपलेले दृश्य पुन्हां केव्हां पाहूं।

अर्थ कैसा गाऊं पुन्हा गानीं ॥

सखी माझी स्मृती असेल जोवरी ।

जीव हा तोवरी - धरी श्वास ॥१५६॥

 

आतांचाच काल असे हा कारण।

भूत भावि क्षण - सिद्ध होण्या ॥

आतांच्या भाषेत - बोलतो जे काल ।

वर्तमान हेंच कालाचें मंदिर ॥१५७॥

 

जेथ नांदणार - भूत भावी

स्मृतीचे निर्णय अनुमान रुपाचे ।

त्यांत ना सत्याचे खरें तत्त्व ॥

दर्पणांतली ती स्वरुपे विकृत ।

तयांनी न कळत - मूळरुप ॥१५८॥

 

मला जें जें वाटे असे तें मायिक।

कसें हें ठाऊक - परी मजला ॥

सत्य नसते जरी माझ्या स्वत्वाखाली।

असत्ये समूळी समजती न ॥१५९॥

 

`इच्छा' असे आंत `इष्ट' तें जगताचें।

ऐक्य त्या दोघांचें व्हावयाचें ॥

विश्व नसतें माझ्या विणे दुसरे काही।

आस भंग होई। सदा हां कां? ॥

बाह्य सृष्टीपाशीं करूनी यां युद्ध।

होतसे संसिद्ध - इच्छिलेलें॥१६०॥

 

सांत अस्तित्वांचे अनंतीं मज्जन।

होई कैसे ते न मला ज्ञेय॥

शब्दा शब्दा ते न मला ज्ञेय।

शब्दा शब्दा ज्ञात कसे व्हावें गीत ॥

सिद्ध होत अर्थ - पूर्ण ज्यांत।

शब्दा शब्दा ज्ञात कसा व्हावा अर्थ ॥

समग्र वाक्यांत - अवतरे जो।

प्रत्येक तंतूला स्वरूप जाळयाचे ॥१६१॥

 

कसे नसते कळायाचे समग्रत:

जेथ तेथे आहे वास त्या नसत्याचा ।

कुठे ना `असत्यां' चा मिळे ठाव ॥

अनंतता मात्र धनीण ‘असत्या’ची ।

इतर सर्वस्वांची - नसे सोय ॥

नसत्यांत जे थोडे - बिंब ते ना ‘असते’ ।

(`नसते' हा मूळ शब्द) तयांनी चालतें विश्व सारे ॥१६२॥

 

विचार करितांना आधी इच्छा येई।

इष्ट मात्र होई - मनन हेतू ॥

ज्ञान सारे माझे असे असायाचे।

मनो विकृतीचे बाह्य रुप ॥१६३॥

 

विकारांचा वास, चित्तांत असतांना।

सत्याच्या दर्शना, कसा जाऊं ॥

खळबळाट चाले, जलाच्या या पृष्ठीं।

पाहि कैसी दृष्टि, तिथे चंद्रबिंब ॥१६४॥

 

भविष्याचे नेत्र लावुनीया आता।

देखता जगा या भुले जीव ॥

कधी कोठे तरी मिळषल व्हावे तें।

असे हे वाटते प्रतिक्षणी का? ॥

परी वर्तमान आहे अजरामर।

भावि जन्मणार कसा केव्हा ॥

‘नन्तरी’ चे नेत्र - लावुनीया आतां ।

देतसे जीविता - वेड असले ॥१६५॥

०२-०९-१९५८

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

Dr. Samprasad Vinod - 09373686537

Dr. Mrs. Rujuta Vinod - 09371934520

Copyright 2019. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search