अभंग

अन्तरी माझ्याच, सत्तत्व जन्मतें। तयांत नाहतें, विश्व सारे॥

मानस सृष्टींत, सृष्टी दृश्य येते ।

सौंदर्य लाधतें, तया तेथें ॥

नभी तैशी मनीं, जन्मते सर्वथा ।

दिव्य तेजस्विता, तारकांची ॥१॥

 

भावना वासना, कल्पना विचार ।

वीचि या अस्थिर, मानसाच्या ॥

सत्य त्यांचे जरी, लकाके क्षणैक ।

भ्रान्ति वैयक्तिक, सर्वही ती ॥

पूर्ण सत्याचें ते, रुप एकमेव ।

शुद्ध आत्मभाव, चिरंतन ॥२॥

 

अन्तरी माझ्याच, सत्तत्व जन्मतें ।

तयांत नाहतें, विश्व सारे ॥

श्रेष्ठता देवाची, पूज्यता सत्याची ।

इष्टता प्रेमाची, आत्मनिष्ठ ॥३॥

 

ज्ञेयतेचे विश्वा, नेपथ्य घातलें ।

बुद्धिनेच गेले, बावरून ॥

आत्मदृष्टि मात्र, सत्यार्थ देखून ।

राहिली स्थिरून, स्व-स्वरूपी ॥४॥

 

देह दृष्टीमुळें, वृत्ति होई मूळ ।

उलगडेल गूढ, आत्मरुपीं ॥

शब्दाशब्दांमध्ये, वृत्ति हो कुंठित ।

जाणतां भावार्थ, स्थिरे तीच ॥

जीव वेडावतो, सापेक्ष हृदयांत ।

नुरे केवलांत, द्वैतमोह ॥५॥

 

सहस्र जन्मींचें, फुलले संस्कार ।

हा तेजविस्तार, मनीं झाला ॥

स्वयं आत्मतेजे, शोभले मिथ्यात्व ।

भ्रमास सत्यत्व, जणूं आले ।

अहमात्मरुप, कैवल्य लाधलें ॥

अस्तित्व भासलें, ज्ञाननिष्ठ ॥६॥

 

पुरुषाद्य जो मी, कैवल्य तेंच ते ।

सर्वदां वागते, सवे माझ्या ॥

द्वितीय तृतीय, उर्वरीत पुरुष ।

तयांना न स्पर्श, पौरुषाचा ॥

तुला त्यांना नसे, अर्थ माझ्यावीण ।

मी हे अधिष्ठान, वस्तु-मात्र ॥७॥

 

भ्रष्ट अस्मद्भावा, अहंकार रुप ।

येतसे अपाप, बुद्धियोगें ॥

साहजिक होतो, माझा जो आचार ।

असे तो अवतार, केवलाचा ॥

कृत्रिमता जरा, स्पर्शतांच तेथ ।

होई अस्तंगत, ब्रह्मभाव ॥८॥

 

प्रत्ययास येई, सहज स्थितीत ।

तोचि अस्मदर्थ, गूढगूढ ॥

अहंकार असे, स्थलकालयुक्त ।

मन:शब्दातीत, अस्मदर्थ ॥

अनुभवांचीं रत्नें, अस्मदर्थ सूत्री ।

अजाणता होती, अनुस्यूत ॥९॥

 

अहं सांडिताच, सुटायाचें सर्व ।

जीव शिव विश्व, परब्रह्म ॥

अहं न सांडितां, तैसेच राहील ।

त्याज्य देहशील, अन्तरीचें ॥

देहोऽहं भावाचे, टाकुनी ते नीर ।

अस्मदर्थ क्षीर, घ्यावयाचे ॥१०॥

 

अन्त:करणाची, विक्रिया क्षणैक ।

विश्व हे ठाऊक, मला होतें ॥

आत्मरुपीं नुरे, विश्वाला या सत्य ।

असें तें अपत्य,संभ्रमाचें ॥११॥

 

अन्त:करणाच्याही, अभावाचे मागें ।

भूत राही जागें, पुन्हा त्याचें ॥

साध्या भूतचेष्टा, भावाभाव जे हे ।

आत्मतत्त्व आहे, पलीकडे ॥१२॥

 

विचारस्पर्शानें, सत्याची आकृति ।

तर्काने अनुभूति, उणावते ॥

शब्दांत सांडतां, अन्तरींचा अर्थ ।

होतसे विकृत, मर्म त्याचे ॥

पूर्ण ब्रह्मभाव, सहजेत मात्र ।

आढळे इतरत्र, परोक्षता हो ॥१३॥

 

सिद्धि आस्तित्वाची, अस्तित्व ज्ञानांत ।

अभेद उभयांत, ज्ञानदृष्ट्या ॥

करावया जावे, जरी भेद येथे ।

पुन्हां ज्ञान होतें, खडे तेथे ॥

ज्ञानवर्तुळाच्या, बाहेर पाऊल ।

कधी न पडेल, अनुभवाचे ॥१४॥

 

स्वत:च्या दृष्टीला, रुप ज्याचे शून्य ।

आधार ज्या अन्य, पाहिजेच ॥

विषय-रुपता ती, ओळखावी तेथे ।

विषयित्व असतें, स्वयंसिद्ध ॥१५॥

 

आदि अन्त वाटे, माझिया देहाचा ।

पार्श्व अनुभवाचा, तया लागे ॥

अनुभवाचे पोटी, सर्वांस सत्यता ।

जन्म मृत्यू कर्ता, अनुभव ॥

दृश्य वस्तुसीमा, दृश्यतेंत येती ।

नुरे त्या संस्थिति, अदृश्यांत ॥१६॥

 

१-४-१९२८ तत्त्वज्ञान मंदिर

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search