प्रस्तावना

तीर्थयात्रा म्हणजे ब्रह्मपदी नेणारी प्र-वासाची प्रक्रिया.

पुस्तकाचे नाव: अखिल भारतातील तीर्थयात्रा

लेखकाचे नाव: 

प्रस्तावना: न्यायरत्न डॉ.धुं.गो. विनोद, दर्शनालंकार यांचा आशीर्वाद पुरस्कार

शुभास्ते पंथान:
(१)

‘तीर्थ’ शब्दाचा निरुक्तार्थ ‘तारं स्थापयति’ असा आहे. संसारसागराच्या परतीराला नेऊन ब्रह्म-स्वरूपात सुप्रतिष्ठित करते ते तीर्थ. 

जीवमात्राला व जातमात्राला अखेर ब्रह्मस्वरूपी विलीन व्हावयाचे आहे. अज्ञानपाशातून, मोहपाशातून माया-पाशातून सुटावयाचे आहे. खरे बंधन, खरा पाश अज्ञानाचा आहे. अज्ञान, अविद्या, मोह व माया यांचा अर्थ स्थूलत: एकच आहे.

ज्ञान किंवा विद्या यांचा अर्थ स्वत:चे मूल स्वरूप, सत् + ता किंवा ‘असणेपण’, अथवा अंतिम सत्य या विषयीचे जे ज्ञान ते होय. ब्रह्मविद्या किंवा आत्मविद्या हीच श्रेष्ठतम विद्या आहे.

श्री शंकराचार्य सांगतात, “सा विद्या या विमुक्तये।” - “जी ‘विमुक्ती’ देऊ शकते तीच खरी विद्या”

एकंदर चौदा विद्यांचा उल्लेख भारतीय शास्त्रग्रंथात केलेला आहे. बहुतेक सर्व आधुनिक विद्यांचाही त्यात अंतर्भाव आहे. सर्वच विद्या उपयुक्त आहेत.

एकंदर कला चौसष्ट आहेत. मानवी जीवनात त्यांनाही महत्त्वाचे स्थान आहे; पण सर्व विद्यांमध्ये व कलांमध्ये ब्रह्मविद्या व जीवशिवाचे अद्वैत अनुभविण्याची कला ही साधना सर्वोत्कृष्ट व सर्वश्रेष्ठ होत.

ब्रह्मविद्येला व अद्वैतसिद्धीला तीर्थयात्रा सर्वथैव उपकारक ठरतात. आपणाला तीर गाठावयाचे आहे. ब्रह्मपदी आरूढ व्हावयाचे आहे, यासाठी जी शक्ती लागते, जे ‘माण’ लागते ते ‘यात्रा’ केल्याने प्राप्त होते. ‘यात्रा’ शब्दाचा निरूक्तार्थ, जी क्रिया, माण किंवा संरक्षण देते ती यात्रा. ‘या त्रायते, सा यात्रा!’

अतएव तीर्थयात्रा म्हणजे ब्रह्मपदी नेणारी प्र-वासाची प्रक्रिया. प्र-वास या शब्दाचा संदेशही मोठा उद्बोधक आहे. प्रगतौ + वास:। प्रगती करीत असताना जागोजागी थांबणे किंवा थांबत थांबत प्रगती करणे. एकाच तीर्थाला एकदम एकट्याने जाण्यापेक्षा अनेक तीर्थांना, मोठ्या समूहाने व थांबत थांबत जाणे ही खरी ‘यात्रा’ होय. 

भारतीय संस्कृती, भारताची अध्यात्मविद्या व वैदिक यज्ञसंस्था ही समूह-निष्ठ किंवा समष्टिसम्मुख आहे. एकट्याने कार्यच करावयाचे नाही.

‘धियोयोन: प्रचोदयात्।’ सुप्रसिद्ध गायत्री मंत्राच्या या चरणात ‘न:’ म्हणजे ‘आम्हा सर्वांची बुद्धी, तो सूर्यदेव प्रज्वलित करो’ अशी प्रार्थना आहे. माझ्या एकट्याची बुद्धी प्रज्वलित करो अशी नाही. 

‘सर्वेऽपि सुखिन: सन्तु’ ही प्रार्थना हेच तत्त्व स्पष्ट करते. 

अर्थात काही प्रार्थना, साधना व विधी विधाने एका व्यक्तीपुरतीच मर्यादित आहेत; पण त्याचे कारण एखादा विशिष्ट शास्त्रीय हेतू हे होय. सामान्यत: अध्यात्म व आत्मोन्नती या गोष्टी अनेकांशी सहयोग केल्याने सिद्ध होणे सुलभतर आहेत, हे नि:संशय. तीर्थयात्रेला मोठमोठ्या समूहाने जाणे हे अधिक उपकारक आहे.

(२)

तीर्थ-यात्रिकांची सेवा, ही धर्म-सेवा, समाज-सेवा, मानव-सेवा व ईश-सेवा आहे. तीर्थक्षेत्री, सामान्यत: सत्संगति सहज-शक्य असते. सिद्ध संतांचे दर्शन, त्याचे आशीर्वाद हे ऐहिक भाग्योदयालाही कारक असतात. मुख्यत: त्यांच्या दर्शनाचा व चरणस्पर्शाचा परिणाम असा होतो की भगवद्भक्ती, अनासक्ती व अद्वैत-वृत्ति हे भाव आपल्या ठिकाणी सहजासहजी प्रकट होऊ लागतात.

‘तस्मात् तीर्थेषु गन्तव्यं नरै: संसारभीरूभि:।

पुण्योदकेषु सततं साधु-श्रेणिविराजिषु।।’ - (पद्यपुराण, पाताल खंड)

पद्यपुराण सांगते, ‘साधूंचे दर्शन पापराशींचे दहन करण्यात अग्नीसारखे प्रभावी आहे, म्हणून जेथे साधूंचे समुदाय असतात अशा पुण्योदक तीर्थाला सर्व माणसांनी अवश्य जावे.’ 

पाप-निष्कृति व पुण्य-संचय हा तीर्थयात्रेचा द्विविध हेतू आहे. तीर्थयात्रा हा एक धर्मसंस्कार आहे. तन्त्रवार्तिकांत मलांचे, म्हणजे पापांचे अपहनन व सद्गुणांचे बीजारोपण हाच संस्काराचा हेतू सांगितला आहे; म्हणून तीर्थयात्रा विधियुक्त व यथासांग करावी असे मी सुचवीन. आजकाल विधी-विशारद, कर्मशास्त्रज्ञ पुरोहितांची संख्या अत्यंत कमी झाली आहे. तरीही विशुद्ध भावनेने, अन्तर्मुखवृत्ताने, शक्य तेवढे विधीसम्मुख रहावे. मनाचा व इंद्रियग्रामाचा संयम शिकण्यासाठी तीर्थयात्रा करावयाची असते.

‘यस्य हस्तें च पादौ च मनश्चैव सुसंयतम्।

विद्या तपश्च कीर्तिश्च स तीर्थफलमश्नुते।।’ - भगवद् भक्त हे पहिले महातीर्थ आहे. 

युधिष्ठिराने भक्तश्रेष्ठ विदुराला सांगितले,

‘भगद्विधा भागवत: तीर्थभूता: स्वयं विभो।’ - भागवत अ, १-१३-१०

दुसरे गुरूतीर्थ आहे. 

‘तस्मात् गुरू: परं तीर्थ शिष्यानां अवनीपते।’

माता व पिता ही सुद्धा दोन तीर्थे आहेत. तसेच पति आणि पतिव्रता यांनाही पद्यपुराणाने तीर्थत्व दिले आहे. - (भूमिखंड) 

स्वत:चे शुचिर्भूत अन्त:करण हा सर्वश्रेष्ठ तीर्थराज होय. आपले मानस-तीर्थ, मानस-सरोवर तीर्थक्षेत्र बनविण्यासाठी बाकीच्या सर्व तीर्थयात्रा करावयाच्या असतात. माणसाचे मन जिज्ञासा, मुमुक्षा व श्रद्धा यांनी युक्त असेल तरच ते तीर्थस्थानाने शुचितर व मोक्ष सन्मुख होईल. 

लक्षावधि मत्स्य कायमचे गंगाजलात आहेत, पोपट फलाहार करीत आहेत व अनेक पक्षी देवळांभोवती घिरट्या घालीत आहेत. ते काय मुक्त जीव आहेत? जिज्ञासू, श्रद्धावान व मुमुक्षु असे आपले मन कोणत्या साधनेने होईल? सत्संग-कारक सामुदायिक यात्रा हीच आत्म-विकासाची सर्वोकृष्ट साधना होय.

- धुं. गो. विनोद

ॐ ॐ ॐ

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search