प्रस्तावना

मास्टर दीनानाथ स्मृतिग्रंथ

पुस्तकाचे नाव: स्मृति-दर्शन

लेखक: श्री. वि. ना. कोठीवाले

मास्टर दीनानाथ यांच्या स्मृतिग्रंथास लिहिलेली प्रस्तावना

काँग्रेसची स्थापना ता. २८ डिसेंबर १८८५ या दिवशी झाली. त्यापूर्वी पाच वर्षे किर्लोस्कर संगीत मंडळीची स्थापना ता. ३१ ऑक्टोबर १८८० या तारखेस झाली. स्वत: अण्णासाहेब किर्लोस्कर, शंकरराव मुजुमदार, भाऊराव कोल्हटकर, बाळकोबा नाटेकर हा पहिल्या अमदानीतला नटवर्ग - नंतर केशवराव भोसले, बालगंधर्व व दीनानाथ. हे तिघेही नट-गायक ‘स्वदेश हितचिंतक’ व किर्लोस्कर संगीत मंडळीच्या अंकावर वाढले. हे तीन चिरस्मरणीय झालेले कलावंत म्हणजे महाराष्ट्राच्या नाट्य-नटेश्वराचे त्रि-नेत्र होत.

ता. २९ डिसेंबर १९०० साली, सूर्योदयापूर्वी अर्धातास, वृश्चिक लग्नात शुक्र असता मा. दीनानाथ यांचा जन्म झाला. त्यांचे निर्वाण ता. २४ एप्रिल १९४२ रोजी झाले. वयाच्या १२ वर्षापासून नाट्यसंगीताच्या एकनिष्ठ सेवेत, आयुष्याची तीस वर्षे घालवलेल्या या थोर कलावंताच्या बालवयातील गानसरस्वतीचा गौरव, बालगंधर्वांनी असा केला होता; “मंगेशीपासून मुंबईपर्यंत चंदेरी रुपयांच्या पायघड्या घालून या मुलाला मी माझ्या कंपनीत नेईन.”

दीनानाथांच्या मृत्यूनंतर आठ वर्षांनी त्यांच्या पत्नी श्री.माईसाहेब, कन्या लता, श्री.वि.ना. कोठीवाले व सौ.मनोरमा देशपांडे यांच्या प्रदीर्घ प्रयत्नाने हा चरित्रग्रंथ त्यांच्या श्राद्धदिनी प्रसिद्ध होत आहे. सौ.मालती व श्री.माधवराव तेंडुलकर यांनी मोठ्या कलाकुसरीने व आपुलकीने या ग्रंथाचे मुद्रण केलेले पाहून मला विशेष संतोष वाटतो. हा ग्रंथ महाराष्ट्रीय रंगभूमीचा व गेल्या सत्तर वर्षांत नाट्यकलेशी संबंध असलेल्या अनेक व्यक्तींच्या जीवनकार्याचा भव्य इतिहास आहे. मास्टर दीनानाथ यांची संगीतकला ही एक दिव्य, प्रभातरल ज्योति होती. या ज्योतीचा उदयगार अर्थातच वसुधातलावर नव्हता. आकाशगंगेच्या गंगोत्री पलीकडे, अनंत-तेच्या अथांग अवकाशात, इंद्रधनुष्याची जाळी विणीत मंद मंद गतीने सरकत राहाणार्‍या तेजो मेघाच्या सुवर्ण कक्षेत, विश्वदेवांच्या सहस्रार नीलकमलात, मानवी प्रतिभेचे उच्च उन्मेष उदित होत असतात. सामाजिक परिस्थिती, सांस्कृतिक पार्श्व, भौगोलिक वैशिष्ट्य या गोष्टी प्रतिभेच्या आविष्कारांच्या बाह्यरूपे व स्थूल सीमा, निर्णीत करीत असतील; पण अंत:स्फूर्तीचे पहिले स्पंद दूर दूर कोठेतरी, नेणीवेच्या गूढ गर्भात, अज्ञेयाच्या गंभीर गुहेत कंपायमान होत असतात. हे स्पंद ओळखण्याची, आत्मसात् करण्याची व व्यक्तविण्याची शक्ती ज्या व्यक्तीचे ठिकाणी असते, त्याच व्यक्ती मानवी संस्कृतीचे मार्गदर्शन करणार्‍या महानुभाव विभूति ठरतात. मानव्य, निसर्ग व ऐश्वर्य किंवा ईश्वर भाव या तीन शक्तींचा त्रिवेणी-संगम म्हणजे संगीत कलेचा आविष्कार. निसर्ग व मानव्य यांचे तादात्म्य हे तर रागरागिणीच्या शास्त्रसिद्धीचे गृहीतकृत्यच होय. ईश्वरी स्फूर्तीचे ऐश्वर्य या दोन तत्त्वांच्या तादात्म्याला लाधले की, संगीत कलेला परमोच्च अवस्था प्राप्त होते. श्रोत्यांच्या चित्त-देहावर गान-सरस्वतीचे स्वर-सिंचन सुरू झाले की, मानवी अश्रूंची उष्णता, निसर्गातल्या दवबिंदूंची शीतता व ईश्वर भावाची अनंत-ता अतीतता यांचा सहज साक्षात्कार सिद्ध होतो - गायन ऐकत असताना एकीकडे सुख-दु:खाच्या तीव्रतम संवेदनांचा पुन: प्रत्यय होत असतो; पण त्या द्वंद्वांच्या पलीकडे राहून, त्यांचेवेळी साक्षित्वाने त्यांचे परम अर्थ अनुभवता येतात. ‘समत्व-निष्ट’ नवयुग-संस्कृति निर्माण करण्याला कारणीभूत होणार्‍या अनेक शक्तींमध्ये सामश्रुतीची, संगीत विद्येची शक्ती ही अग्रगण्य होऊ शकेल. जातिभेद, वंशभेद, राष्ट्रभेद, वर्णभेद-स्थानभेद या सर्व भेदांचा निरास करून अद्वैतसिद्धी करण्याचे सामर्थ्य संगीत विद्येत आहे. किंबहुना, एकंदर जीवसृष्टीचे-कदाचित निर्जीव सृष्टीचेही अंत:स्वरूप स्पंदमय (Vibrational) गीतमय असल्यामुळे एकता, समता व संगीत निष्पन्न करण्याचे, संगीत हेच सर्वोत्तम, सर्व प्रभावी कारण होऊ शकेल हे स्वयंस्पष्ट आहे. पण महात्माजींचा सिद्धांत सर्वथा खरा आहे. “विशुद्ध आचरण हीच परमोच्च कला होय.” अनैतिक जीवनात उपजलेल्या कलाविष्काराला शांति-प्रापक, समत्व-संपादक सामर्थ्य कधीही लाधणार नाही.

मा. दीनानाथ हे एक अलौकिक प्रतिभेचे संगीतज्ञ होते. संगीत विद्येचा त्यांचा व्यासंग मूलग्राही, चिकित्सक व स्वंतत्र धारणेचा होता. या पुस्तकात छापलेला संगीत शास्त्रावरील त्यांचा प्रबंध संपूर्ण उपलब्ध झाला असता तर काही नवीनच उपपत्ति आपल्यापुढे विचाराकरीता आल्या असत्या यात संशय नाही. चैतन्याची परमोच्च अवस्था संगीत श्रवणाने निष्पन्न होऊ शकते. मंत्रयोग, ध्यानयोग, ज्ञानयोग, भक्तियोग व कर्मयोग या योग पंचकाचे पंचप्राण संगीताच्या श्रुतियोगात, गानश्रवणात समाविष्ट आहेत. तन्मयतेने, देहभाव विसरून स्वर-पंक्ती ऐकली तर भावनांचे विशेषत: वासनांचे विनयन सहज साधता येते. संगीताने क्षणमात्र वासनांचे उद्दीपन होते - पण आंतर मनोवृत्ती तरल होत होत जाऊन शेवटी स्वरदीप्तीत वासनांचे पतंग उडी घेतात व स्वत:चा स्वाहाकार करतात - मनोलयाची सिद्धी होते आणि देहबंध शिथिल होऊन अनंत-तेत अहंभावाचे विसर्जन होते. मास्टर दीनानाथ यांची स्वरशक्ती अशीच बंधविमोचक होती. शृंगार रसाची, कामुकतेची त्यांच्या संगीत शक्तीला तितकीशी ओढ नसे. वीर रस व विशेषत: भक्तिरस त्यांना विशेष आवडे. त्यांच्या स्वरपंक्ति ऐकताना - विशेषत: खासगी बैठकीत व ते स्वत: लहरीत असताना स्वर काढीत असत तेव्हा, वासनांचे नियमन, भावनेची विशुद्धी सहजासहजी होत असे व मनाच्या एका उत्तुंग अवस्थेत वावरत राहिल्याचा भास श्रोत्यांना होई. साम-संगीताने वैदिक कालातल्या मानवतेचे समाधि-धन सिद्ध होई. स्वत:च्या सहज-सुंदर संगीत-सामाने गान सरस्वतीची परमोत्कट प्रतीके निर्माण करून, आजकालच्या मराठी जनतेला, समाधिसुखांचा क्षणास्वाद देणार्‍या या स्वर-महर्षीने महाराष्ट्र संस्कृतीला चिरकाल ऋणाईत केले आहे.

दीनानाथांनी रंगविलेल्या अनेक भूमिका महाराष्ट्रीय जनतेच्या चित्त-चक्षूसमोर अजूनदेखील टवटवीत ताजेपणाने उभ्या आहेत. भूमिकेशी समरस होऊन पुन: स्वत:चा साक्षित्व-भाव अढळ ठेवणे हे अभिनय-कलेचे आंतर रहस्य आहे. दीनानाथांनी ते आत्म-सात केले होते व म्हणून त्यांचा अभिनय अतिकोटीने यशस्वी झाला. बालगंधर्वांनी महाराष्ट्रातील स्त्रियांना मानापमानातल्या भामिनीचा आदर्श दिला. दीनानाथांनी भावबंधनातल्या लतिकेचा आदर्श महाराष्ट्रीय युवतीपुढे धरला. भामिनी ही भारदस्त युवती आहे. लतिका ही फूलपाखरांसारखी स्वच्छंद आहे, अल्लड स्वातंत्र्याचा एक आकर्षक नमुना आहे. विश्वविद्यालयीन विद्यार्थिनीपुढे कित्येक वर्षे लतिकेच्या खेळकर हालचालींचा आदर्श असे हे सूक्ष्म निरीक्षकांच्या लक्षात आल्याशिवाय राहिले नाही. प्रो.वामन मल्हार जोशी यांच्या कल्पनासृष्टीतल्या उत्तरा व रागिणी या दोन्ही मुली गडकर्‍यांच्या भावबंधनांत लतिका व मालती या नामांतराने अवतरल्या होत्या. उत्तरेच्या स्वभावचित्रणाशी परिचित असलेला महाराष्ट्र लतिकेच्या मनोज्ञ रेखाचित्राकडे एकदम आकृष्ट झाला. दीनानाथांनी लतिकेची भूमिका, आपल्या अमर अभिनयाने, महाराष्ट्रीय रंगभूमीचा रत्नालंकार म्हणून चिरंजीव केली आहे. “कठिण, कठिण, कठिण किती पुरुष हृदय बाई” हे त्यांनी गायलेले लतिकेचे पद या क्षणालादेखील, सभोवतालच्या वातावरणातून दीनानाथांच्या तानांवर, रांगत रांगत येत आहे असा मधुर भास होतो. शकुंतला, भामिनी, शिवांगी, कांता, उग्र मंगलमधील राणी पद्यावती, वीर वामनरावांच्या रणदुंदुभीतील ‘तेजस्विनी’ या त्यांच्या भूमिका कोणता महाराष्ट्रीय रसिक विसरू शकेल? तेजस्विनीची भूमिका त्यांना विशेष साजेसे दिसे. वीररसाची त्यांना स्वभावत: गोडी पण त्यांच्या भावकोमल अंग विक्षेपांनी त्या त्यांच्या वीररसात एक निराळेच आकर्षण निर्माण होई. “परवशता पाश दैवे, ज्यांच्या गळा लागला” हे पद तर त्यावेळी शेकडो तरुणांच्या जिव्हाग्रावर नाचे. सावरकरांच्या ‘सन्यस्त खड्ग’तील सुलोचना ही त्यांची भूमिकाही अलौकिक वठे. ताजेवफामधील ‘बालम् सुरतिया’ हे यांचे पद त्याचप्रमाणे ‘छोडो छोडो’ हा कथ्थकी दादरा, उर्दू जोषाने महाराष्ट्रीय तोंडात खेळतांना ऐकला की गंमत वाटे. मानापमान नाटकातील त्यांची धैर्यधराची भूमिका हे एक महाराष्ट्र रंगभूमीचे डौलदार लेणे ठरले होते. ‘चंद्रिका ही जणू’ हे पद ‘रूपक’ तालात ते म्हणत, ‘त्रितालात’ ऐकण्याची सवय असलेल्या श्रोत्यांचा प्रथम अपेक्षाभंग होई पण रूपक ताल ते असा रंगवीत, की श्रोत्यांनी मंत्रमुग्ध व्हावे. ‘शूरा मी वंदिले’, ‘रवि मी, चंद्र कसा’ या पदाचे त्यांनी केलेले नवसंस्करण असेच दिलखेच करणारे असे. पुण्याचे वसंतराव देशपांडे, ही सर्व पदे दीनानाथांच्या पंजाबी ढंगात व थाटात म्हणतात व एखादे वेळी हुबेहुब पंधरा वर्षांपूर्वीची तान आता पुन: ऐकल्यासारखे वाटते. मा. दीनानाथ यांची प्रत्येक विषयावर एखादी स्वतंत्र उपपत्ति असे. पुरुषांनीच स्त्रियांचा अभिनय करणे योग्य होय. नुसत्या जन्मसिद्ध स्त्रीत्वाने स्त्रीपात्राचा `अभिनय' करता येईल, असे त्यांना वाटत नसे. स्त्रियांनी, स्त्रियांची भूमिका करण्यापेक्षा, अभिनय सिद्धीसाठी पुरुषांच्या भूमिका कराव्यात असा त्यांचा एक आग्रह असे!! पुरस्कृत ग्रंथाचे लेखक श्री. वि. ना. कोठीवाले यांनी, अविनाभावाचे साहचर्य मा.दीनानाथांच्या सर्व कुटुंबियांना दिले आहे. मा.दीनानाथांच्या आंतर-बाह्य जीवनाशी समरस होऊन, त्यांनी कित्येक वर्षे आपल्या चरित्रविषयाचा सूक्ष्म व सखोल अभ्यास केला आहे. जीवनाचा रसान्वेष, जीवनातल्या अनेक अर्थांचा शोध हे या तडफदार साहित्यिकाच्या प्रतिभेचे वैशिष्ट्य आहे. हा शोध, हा अन्वेष सुरू असता त्यांच्या स्वत:च्या पायाला पुष्कळ दगडांशी ठेच खावी लागते व त्यांचे पाय, दुसर्‍या मार्गस्थांना, ठेचाळीत जातात. त्यांची लेखणी जरा तिखट आहे - पण स्वभाव निर्मळ, सत्यप्रेमी व खेळकर असल्यामुळे, त्यांच्या शुद्ध हेतूविषयी सर्व नि:शंक असतात. ऐतिहासिक पद्धतीने (Historical method) चरित्र लेखन करण्याची, एमिल लडविग् (Emil Ludwig) या जगद्विख्यात पाश्चात्य चरित्र-लेखकांची प्रक्रिया त्यांनी अभावितपणे प्रस्तुत ग्रंथांत उपयोजिली आहे. वैयक्तिक आचाराचे मागे असणाऱ्या मानसिक पार्श्वाचे पृथ:करण त्यांनी आपल्या ग्रंथांत, अनेक ठिकाणी हळुवार, मर्मग्राहक तर्‍हेने केले आहे. त्यांच्या या सुयशाबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो. मा. दीनानाथ एकदा लतेला म्हणाले - “गांधार राग ज्यांच्या गळयात हुकमी उपजतो त्यांच्या पायावर लक्ष्मी लोळण घेते; बालगंधर्वाला ही देणगी आहे - मला नाही. लता, तुझ्यावर ईश्वराने ही कृपा केली आहे - गळयातला गांधार सांभाळ.” कु.लताताईंनी हा गळयातला गंधर्व सांभाळला आहे व वाटेल तेव्हा त्याचा आलाप त्या ऐकवू शकतात. भाग्य-श्री त्यांचेभोवती सारखी रेंगाळते - यांचे कारण हा गांधार असेल काय?

कुमारी ल-ता या आपल्या वडिलांच्या जीवनकार्याचा जणू काय एक ता-ल आहेत. मा.दीनानाथांनी ही एक साकारलेली लकेर आहे.

संगीताची समाधि-धने उधळीत जाणारी त्यांची स्वरशक्ती यक्षकिन्नरींना हेवा वाटण्याइतकी सतेज अलौकिक आहे. त्यांची पितृभक्ती ही एक अविश्वसनीय नवलकथा होण्याइतकी लोकविलक्षण आहे. आपल्या थोर वडिलांच्या आशीर्वादांची व संन्यस्त मातुश्रींच्या प्रेमाश्रूंची अखंड उदक-शांती लाधलेल्या या लतांवर, आकाशीच्या तारका स्वर पुष्पे होऊन फुलू लागतील. स्वत: दीनानाथांनी आपला तंबोरा कु. लताताईंच्या हातात देऊन आपले ध्येय-सर्वस्व त्यांच्या स्वाधीन केले होते. ही अल्पवयी स्वरशारदा आपल्या मातुश्रीची, हृदयनाथ या बंधूची व सर्व कुटुंबीय आप्तांची सेवा करण्यात स्वत:ला धन्य समजते. जणू काय, कु. लताताईंनीही म्हणावी म्हणून एका वैदिक द्रष्ट्याने खालील प्रार्थना केली होती, “हे वषट्-विष्णो, आमचे आपण संरक्षण करावे; आपण आम्हाला शुभ सौभाग्य द्या; माझ्या स्वरशक्तीचा व शब्दशक्तीचा आपल्या कृपेने परिपूर्ण विकास व्हावा.”

वर्धंतु त्वा सुष्टतयो गिरो मे ।

यूयम् पात स्वस्तिभि: सदा न:।।

वरील श्रुतिमंत्राने या प्रस्तावनेपुढे पूर्ण-विराम ठेवतो.

- धुं.गो. विनोद

ता. २० एप्रिल १९५०, गुरुवार,

अक्षय्य तृतीया, वैशाख शके १८७२

ॐ ॐ ॐ

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search