साधना सूत्रे

हृदय-परिवर्तन

[ले. - महर्षि न्यायरत्न डॉ. धुं. गो. विनोद (दीपावली १९६३), पश्यंती (२५)]

-----------------------------------

हृदय-परिवर्तन ही एक विलक्षण प्रक्रिया आहे.

हृदय-परिवर्तनात केवळ हृदयाचेच परिवर्तन होते असे नव्हे. एकंदर समग्र जीवनाचे हृदय हे एक प्रतीक आहे.

प्रथम बौद्धिक किंवा वैचारिक परिवर्तन होत असते.

वैचारिक परिवर्तन पुष्कळ वेळा सहज शक्य असते. पण त्याचा परिणाम नेहमीच हृदयापर्यंत जातो असे नाही.

शीर्ष-मध्य किंवा मेंदू, आणि हृदय यांत स्थूलत: एक हाताचे अंतर आहे.

कार्य करणारा तळ-हात व शीर्ष मध्य यांमध्ये स्थूलत: अडीच हातांचे अंतर आहे.

हृदयामध्ये कार्याची स्फूर्ती झाली, मेंदूपर्यंत गेली व मेंदूपासून खांद्याकडून तळहातापर्यंत पोचली की बरोबर साडेतीन हातांचे अंतर तोडले जाते.

हृदयांतून उद्भूत झालेल्या कर्माचे स्वरूप स्वयंपूर्ण असते. अशा कर्मात एक पूर्णतेचा प्रत्यय येतो. व एक आगळे समाधान मिळते.

पण, आपल्या अनेकानेक क्रिया केवळ बुद्धीत, केवळ मेंदूपासून जन्म घेतात. हृदयाशी त्यांचा संबंधच नसतो.

मेंदूपासून निघालेला स्पंद प्रवाह तळहातापर्यंत पोहोचण्याचे अगोदर तो हृदयांतून गेला तरीही ३।। हातांचे परिमाण पुरे भरून, कृती स्वयपूर्ण होते.

संपूर्ण मानवी देह हा त्या त्या व्यक्तीच्या औट म्हणजे साडेतीन हातांचा असतो. हा तंत्रशास्त्राचा व आयुर्वेदाचा सिद्धांत आहे.

स्वं स्वं हस्तत्रयं सार्धं वपु:।

हृदय, मेंदू व तळहात यांचे संयुक्त कार्य म्हणजे खिशींसीरश्र अलींळि

शीर्ष-मध्यांत, मेंदूत, बुद्धीमध्ये जरी स्फूर्ती प्रथमत: उद्भवली तरीही ती हृदयमध्यापर्यंत एक हात, तेथून खांद्यापर्यंत अर्धा हात, म्हणजे एकूण दीड हात, व खांद्यापासून तळहातापर्यंत दोन हात असे एकूण ३।। हात होतात, व ती कृती संपूर्ण, स्वयंपूर्ण, मानवी देहाच्या परिमाणाइतकी औट हातांची होते.

आदर्श विचार आणि क्रिया यांमधील अंतर मानवी देहाएवढे म्हणजे  साडेतीन हातांचे असावे. असा तंत्रशास्त्रीय संकेत आहे.

मानवमात्राच्या संपूर्ण देहाचे परिमाण व विचार, हृदय व क्रिया यांच्या संयुक्त आविष्काराचे परिमाण अगदी सारखे असते. हे केवढे आश्चर्य!

पण ही वस्तुस्थिती जितकी आश्चर्यकारक तितकीच अर्थसूचक आहे.

प्रत्येक क्रियेत, म्हणजे प्रत्येक ज्ञानजन्य क्रियेत मानवी देहाचे सपूर्ण 'परिमाण`आविष्कृत झाले असेल तरच, व तेव्हाच ते कर्म समन्वय-योगाचा व साम्य-योगाचा संपूर्ण आविष्कार करू शकते.

हे कर्म खऱ्या अर्थाने स्व-तंत्र होय.

जीवन्मुक्तांचे कर्म अशा घाटाचे व अशा थाटाचे असते. त्यांच्या कर्मात त्यांचा देह व देहांतर्गत सर्व शक्ती संयुक्ततेने व समन्वयाने अभिव्यक्त झालेल्या असतात.

'सम` किंवा 'साम्य-युक्त` कर्म ते हेच होय. कारण, ह्या कर्मामध्ये, कार्याचे व्यक्तीमत्त्व स मन्वयाने प्रकट होते. हृदय, बुद्धी व हात हे मानवी व्यक्तीमत्त्वाचे तीनही घटक समत्वाने एकत्रित झाले की त्या कार्यामध्ये 'सम-ता` आली.

आपादमस्तक मानव  देहाचे परिणाम 'क्ष` असले तर, मेंदूतला विचार व हातून घडणारे कर्म, यांतही तेच 'क्ष` हे परिणाम असणे हाच साम्ययोग होय.

हृदय-परिवर्तन ही घटना केवळ विचाराने किंवा विचारांतील रूपांतराने होऊ शकत नाही.

विचाराचा स्पंद, हृदयातून खांद्यावाटे तळहातापर्यंत गेला तरच हृदय-परिवर्तनाचे परीणाम कृतीत दिसू लागतात.

सामान्यत: मेंदूतील स्पंद हृदयांतल्या स्पंदाशी एकरूप होतोच असे नाही.

अशा क्रियेत हृदयाचा विचाराशी समन्वय होत नाही. डोक्यांतला विचार फक्त अडीच हातांचा प्रवास करून प्रत्यक्ष क्रियेत अवतीर्ण होतो.

हृदयरसांत न्हाल्याशिवाय विचाराचे होणारे कृतीत रूपांतर ''पारोसे`` रहाते. प्रत्येक विचाराला हृदयरसाचे मंगल स्नान घडले पाहिजे. हृदय-स्पर्शाशिवाय विचारक्रिया किंवा कर्मे होतील, परंतू ती अमंगल, अपूर्ण व निष्फल ठरतील. हा समन्वय-योग समजला जातो तरच हृदय-परिवर्तनाची शक्यता.

हृदय-परिवर्तनाची क्रिया ही प्रामुख्याने वैयक्तीक स्वरूपाची आहे.

सामुदायिक हृदय-पालट अनेक वेळा झालेला दिसतो. पण तो क्षणभंगूर ठरतो.

व्यक्ती हीच नैतिक व आध्यात्मिक क्रांतीचे मूलाधार चक्र आहे.

सामुदायिक शिक्षणातून किंवा दीक्षेतून व्यक्तीचा खरा हृदयपालट क्वचितच होऊ शकतो. समुदायांतून व्यक्तींत म्हणजे वरून खाली, असा या आंतर-क्रांतीचा मार्ग नाही.

लोकशाहीच्या शक्तीप्रमाणेच, खालून वर, व्यक्तींतून समूहांत अशी ही गती आहे.

'खालून वर` हा शब्दप्रयोग शब्दश: न घेता केवळ अर्थ सूचकतेसाठी याचा उपयोग केला आहे.

हृदय-परिवर्तन करण्याचे सर्व प्रयत्न व प्रयोग व्यक्तीश: व्हावयास पाहिजेत.

एका व्यक्तीच्या ठिकाणी हृदय-परिवर्तन झाले की हळूहळू अनेक व्यक्तींचे ठिकाणी ती ज्योत संपर्काने पेटू लागते.

शेकडो व्यक्तींचे ठिकाणी ही ज्योत एकदम पेटू शकत नाही.

गुन्हेगार, दरोडेखोर व प्रमत्त आचरण करणारे भ्रष्ट जीव, यांचे हृदय-परिवर्तन करण्यासाठी  एकेका व्यक्तीची निवड केली पाहिजे.

श्रेष्ठतम श्रेणीच्या धर्मस्थापकांना देखील तीन, चार, बारा अशा शिष्यांचे हृदय-परिवर्तन करणे शक्य झाले नाही. अशी धर्मक्रांतीच्या इतिहासाची साक्ष आहे.

आद्य श्री शंकराचार्य, बुद्ध, जीझस व महंमद या सर्वांचे अग्रेसर अनतेवासी, पहिले शिष्य अवघे तीनचारच होते!

हृदय-परिवर्तन हे वैयक्तीक व सामाजिक क्रांतीचे अत्यंत प्रभविष्णू असे एकच तंत्र आहे. बौद्धीक सिद्धांत पटले तरी हृदय-पालट झाल्याशिवाय जीवनांत क्रांती होत नाही.

मानवी व्यक्तीमत्त्वांचे मुख्यत: तीन घटक आहेत. बुद्धी, भावना व वासना.

बुद्धी हा एकमात्र घटक नाही. भावना व वासना हे हृदयाचे व इच्छाशक्तीचे गुण आहेत.

बौद्धीक निश्चयाची वात हृदयाच्या स्नेहांत भिजल्याशिवाय ती पेट घेऊ शकत नाही. 

बुद्धीला पटलेला प्रत्येक सिद्धांत हृदयाच्या स्नेहाळ पणतीत प्रविेट झाल्यावर तो संथपणे प्रकाश प्रसवू लागतो.

प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनांत हृदय-परिवर्तन घडवून उच्चेदात्त ध्येयांचे दीप उजळवीत राहीले पाहिजे. हीच खरी दिवाळी होय.

नुसता बुद्धीत पालट पुरेसा नाही, त्या बरोबर हृदयांतही पालट झाला पाहीजे.

खरोखर हृदय-पालट होणे हा एक पुनर्जन्म आहे. त्या आंतर व आमुलाग्र क्रांतीने मानव-मात्राला ''द्वी`` - जत्व येते.

एखाद्या जीवन-मुक्ताशी संबंध घडला (जरी हा संबंध स्वप्नात घडला तरी पुरतो.) की हृदयपालट, नवजागृती सुलभ होते.

मानवाची मने बदलण्यासाठी परमेश्वर मानवी अवतार घेतो याचे कारण, मानवाचा उद्धार मानवच करू शकतो. देव देखील हा चमत्कार करण्यास अ-समर्थ आहे. देवाला मानवाचे रूप यासाठीच घ्यावे लागते. माणूस माणसापासूनच शिकू शकतो, स्फूर्ती घेऊ शकतो, स्वत:ला पुनर्जन्म देऊ शकतो.

हृदय-परिवर्तन होण्यास जीवनाची ठराविक घडी उधळून लावणारा एखादा विलक्षण अनुभव यावा लागतो. अनुभव दु:खद असलाच पाहिजे असे नाही. काही वेळा तो सुखदही असू शकतो. मात्र तो अनुभव अंत:करणाला चटका देणारा, धक्का देणारा असला पाहिजे. पूर्व अनुभवांची, स्मृतींची, मूल्यांची व ध्येयांची देखील आमूलाग्र क्रांती करण्याचे सामर्थ्य त्या अनुभवांत, त्या प्रसंगात, असले पाहिजे.

येथे एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती ध्यानांत घेतली पाहिजे. प्रसंगाची विलक्षणता घटनांची अद्भूतता व अनुभवांची अ-लौकीकता ही पुष्कळ अंशाने त्या व्यक्तीच्या  ग्रहणशीलतेवर अवलंबून असते. सामान्यत: आपण अर्ध-जागृत अवस्थेत कालक्रमण करीत असतो. जीवनाला, अनुभवाला, विशालतर क्षितीजे आहेत. याची आपणाला वार्ता ही नसते. ही क्षितीजे डोळविणे हे स्वत:च्या आनंद-सिद्धी साठी आवश्यक असे एक कर्तव्य आहे.

परमार्थ, परम-अर्थ हा स्वानंद - योग आहे. बौद्धीक विकास किंवा आध्यात्मिक विकास हा जीवनाला अधिक स्वतंत्र, अधिक प्रभावी व अधिक आनंद - मय करण्यासाठी आहे. ही जाणीव, ही निष्ठा उत्पन्न करण्यासाठीच एक महाजागर यावा लागतो.

हा महाजागर म्हणजेच हृदय - पालट.

मनुष्याचा अर्थ मनन - शीलता. मुमुक्षत्व अर्थात स्वतंत्रतेची इच्छा, मननशील मानवाचे स्वातंत्र्य किंवा मुमुक्षत्व हे सहजसिद्ध ध्येय आहे. ते प्राप्त् करून घेण्याचा उत्कृष्ट व सुलभ - सहज मार्ग, महापुरूष - संश्रय हा एवढाच आहे.

म्हणून या तीन गोष्टी अत्यंत दुर्लभ असून ईश्वरी कृपेनेच प्राप्त् होतात, असे श्री शंकराचार्य म्हणतात - 

 

दुर्लभं त्रयमेवैतद्दैवानुग्रह हुतुकम्।

मनुष्यत्वं मुमुक्षत्वं महापुरूषसंश्रय:।।

(विवेक चूडामणी)

 

पण असा महापुरूष मिळावा कसा?

तो आपल्या शेजारी देखील असतो.

उत्कट इच्छा असेल तर, तोच आपणांस येऊन भेटतो! पण आपण त्याची वाट पहात स्वस्थ बसू नये.

आपण स्वत: पावले टाकण्यास सुरूवात केलीच पाहिजे.

त्याची आपली भेट झाल्यावर, मग कोडे उलगडते - दोघेही एकमेकांना शोधीत होते, पण महापुरूषाची उत्कंठा अधिक तीव्र होती!!!

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search