साधना सूत्रे

श्रीदत्तात्रेय व नाथ-विद्या

श्रीदत्तात्रेय व नाथ-विद्या

पश्यंती (२४), (डिसेंबर १९६३)

नाथ विद्येत अवधूतस्वरूप हे आदिचैतन्य, आदिनाथ म्हणून ओळखले जाते. नवनाथांचे स्फूर्तीस्थान म्हणजे दत्तात्रेय होत.

अवधूत तंत्र हे त्रिगुणातीत व त्रिवर्णातीत तंत्र आहे. म्हणूनच दत्तोपासना अत्यंत पवित्रतम, अत्यंत शुचिर्भूत अशी असूनदेखील, चातुर्वर्ण्याने मर्यादित झालेली नाही.

एकंदर मानवकुटुंबाचे उपास्य दैवत म्हणून दत्त भगवान यांचाच परिष्कार व स्वीकार झाला आहे.

श्रीदत्त हे शुचीर्भूताचे त्याचप्रमाणे पतीतांचेही आराध्य दैवत असल्यामुळे लोकशाहीचे अधिकृत दैवत म्हणून त्याची प्रतिष्ठा सर्वमान्य झाली आहे.

दत्तोपासना हे एक अत्यंत प्रभावी असे शक्तीतंत्र आहे. मंत्रविद्या व यंत्रविद्या, तंत्रविद्या ही खरोखर दत्तविद्येची "तीन शिरे" असून, परदर्शनाचे "सहा हात" याच महाप्रतीकाची अखंड पूजा बांधण्यात कृतार्थ झाले आहेत.

'अल्लख` म्हणजे 'अलक्ष्य`.

हा आंतर्व्योमांत सदैव समुदित होणारा नाद म्हणजे श्रीदत्त तंत्रांतील ओंकार म्हणजे प्रणव होय.

अ,उ,म ही तीन मुखे मानली तर अल्लख नाद, ओंकारावरील बिंदूसहीत अर्धचंद्र होय.

'अल्लख` शब्दांत वैखरी, मध्यमा आणि पश्यंती या तीन वाणी समन्वित असून त्यानंतरच्या अवकाशांत 'परा` अवतीर्ण होत असते.

तत्वत: अल्लख शब्दांत ऋग्वेद, यजुर्वेद व अथर्ववेद सामावलेले आहेत.

'अ` हा नाद प्रथम पश्यंतीत काढावयाचा असतो. मध्यमेत त्याचाच द्विगुणीत 'ल` कार होतो. 'ख` ही वैखरी आहे. वाम नेत्र पहिला, दक्षिण दुसरा व उर्ध्व म्हणजे वरचा आणि तिसरा.

उर्ध्व नेत्र हा दक्षिण व वाम या दोन्ही नेत्रांची संयुक्त शक्ती तर दर्शवितोच. पण त्याच्यातून श्रेष्ठतर अशा अतीत, अतींद्रीय शक्तींचे महापीठ उर्ध्व नेत्रांत आहे.

उर्ध्व नेत्राला ज्योतिर्मठ, व्यासपीठ व आदिभाव अशी सांकेतिक नावे आहेत. विधान, प्रतिघाव, व संधान, थेसिस् अँटिथेसिस् व सिंथेसिस्, हेगेल व मार्क्स यांनी उपयोजिलेल्या डायलेक्टिस् या प्रक्रियेस अशीच 'त्रयी` आहे.

श्री गुरूदत्त उपासना हा भारतीय गूढ विद्येचा एक सनातन संप्रदाय आहे.

श्री दत्तभगवान हे प्रतीक म्हणजे एक साकार तत्त्व-संहिता आहे.

संहिता म्हणजे एकत्रीकरण.

उदय, उत्कर्ष व उच्छेद या भावत्रयींचे समन्वित स्वरूप म्हणजे श्री दत्त आत्रेय ही देवता.

दत्त हे अत्रि ऋषींचे अपत्य.

अ-त्रि तीन नाही ते, यांचय अपत्यांचे स्वरूप 'त्रि` विध प्रकारचे असावे हे प्रतीक शास्त्रांतील भव्य कौतुकच नव्हे काय?

पण हे कौतुक न्यायसिद्ध व क्रमप्राप्तच आहे.

अवस्था त्रयाच्या पलीकडे असलेल्या परात्पर, स्वयंपूर्ण व स्वयंसिद्ध अशा सत्तेच्या अधिष्ठानावर विश्व-ज्ञानाच्या व ज्ञान विश्वाच्या साकार होऊ शकतात.

'अ + त्रि` म्हणजे जे तीन नाही, जे कोठल्याही त्रिपुटीत समाविष्ट होऊ शकत नाही. त्या त्रिगूणातीत तुरीय, केवळ तत्त्वामध्ये, सर्व त्रिगुणात्मक त्रैविध्याला आधार व आविर्भाव प्राप्त् होतो.

'अ` हा नाद प्रथम पश्यन्तीत काढावयाचा असतो. मध्यमेत त्याचा द्विगुणित 'ल` कार होतो. 'ख` ही वैखरी आहे. वैखरीमध्ये द्विगुणित ल्ल कार अंतर्धान पावतो. हे तिन्ही अवयव सावकाश म्हणावयाचे असतात. एक अंतर्धान पावल्यावर दुसरा प्रकटला पाहिजे.

अवधूत रूपांत म्हणजे निर्देह व निराकार स्वरूपांत श्री दत्त भगवान संचार करीत असताना 'अल्लख` महामंत्राची दीक्षा, मानवदेही परिणत झालेल्या सिद्धांना प्रसाद म्हणून देत असतात.

अल्लख हा प्रसाद-नाद प्रथम ब्रह्मरंध्रात उमटतो. या नावालाच कुंडलिनीचा पहिला फूत्कार म्हणतात. तो झाल्यानंतर त्याच्या नंतरचे आविष्कार पश्यंतीपासून वर सांगितलेल्या क्रमाने होऊ लागतात. केव्हा केव्हा सिद्ध भूमिकेवर आरूढलेल्या मानवी सद्गुरू माऊलीने स्वत:चे दक्षिण अंगुष्ठ साधकाच्या ब्रह्मरंध्रात स्पर्शिल्याने ''अल्लख`` नादाचा प्रसाद उपलब्ध होतो. चरणस्पर्शाचे हे रहस्य आहे.

गोरखनाथजीकी छुरी म्हणजे सुरी कानाचे पाळीत भोसकण्यात येते. मंत्रशक्तीने रक्तस्त्राव थेंबभरही न होताही 'नाथन` सिद्ध करता येते.

'नथ` धातूचा अर्थ भोक पाडणे असा आहे. 'नाथन' विधीचे नंतर नऊ दिवसाचे आंत गोरक्षनाथ अपेक्षित, इष्ट स्वरूपांत दर्शन देतात. बेचाळीस दिवस हा नाथन विधी सुरू रहातो. या बेचाळीस दिवसांत स्वप्न ही अवस्था अत्यंत महत्त्वाची असते. स्वप्नांत आपल्या कारण-देहास श्रीअवधूत स्पर्श करतात. जागृत अवस्थेतही विशिष्ट अनुभव येत असतात.

बेचाळीस दिवसानंतर जगद्धारणेत आपल्या वाट्याचे कार्य करण्याची आज्ञा होते. नाथसंप्रदाया प्रमाणे चौर्‍यांशी महापुरूष, व्यक्त कार्य करीत आहेत. त्यांतील काही हिंदुस्थानाबाहेर आहेत.

नाथ संप्रदाय हे एक महा-विज्ञान शास्त्र आहे; Occultism आहे. केवळ गूढवाद नाही. 

गूढवादाची mysticism ची तत्त्वे या संप्रदायांत फारच थोड्या प्रमाणांत आहेत. सिद्ध-मानव, पूर्ण-मानव म्हणजेच अवधूत, किंवा परमतत्त्व मूर्तिमय किंवा ब्रह्म-विष्णू-महेश ही प्रतीके नाथपंथीय तत्त्वज्ञ, मानीत नाहीत. दत्तमूर्ती हे एक बहिर्वर्तुलांतील प्रतीक आहे. दत्त म्हणजे अवधूत नव्हे. अवधूत म्हणजे शुद्ध झालेले मानव्य.

मानव्याचे अहमास्मि भान स्व-रूपाचा धारावाही साक्षात्कार हा नाथ संप्रदायातील मोक्ष.

नाथन झाल्यावर क्रिया, कर्तव्य काहीच उरत नाही.

महाराष्ट्रांत निवृत्तीनाथ व ज्ञानेश्वर हे अवधूतांश होऊन गेले.

लोक म्हणजे plane भूमिका. सेवा म्हणजे सेवन किंवा ग्रहण. लोकसेवा म्हणजे 'भूमिका स्पर्श` लोक ग्रहण म्हणजे भूमिकांचे सं-व्यवस्थापन. `organization of inner planes.`  नाथ सांप्रदायिकांचा भूमिकांशी planes संबंध असतो. व्यक्तीशी नसतो. अर्थात भूमिका या व्यक्तीमध्येच आविष्कृत झालेल्या असतात. पण विशिष्ट व्यक्ती किंवा राष्ट्र हे अभिप्रेत नसते.  स्वास्थ्य शास्त्र (hygiene) हे वाटेल त्या देशांतल्या शारिरीक अवस्थांचा विचार करत, त्याचप्रमाणे हा संप्रदाय मानण्याचा आंतर अवस्थांचा विचार करतो. काही अवधूत जड देह वरही विशिष्ट संस्कार करीत आहेत. किंवा विशिष्ट संदेह-शिक्षा देत संचारत आहेत.

विंधलेल्या कानात एक कुंडल घालण्यात येते. हिंदू मात्र स्वत:स विंधून घेतो, याचे कारण तो नाथ संप्रदायी असतो. हिंदू व नाथ हे समव्याप्त् शब्द आहेत. संप्रदायातील तपोविधान अतिशय अवघड असल्यामुळे ते प्रत्येक हिंदूस सांगण्यात येत नाही. पण नाथ-संप्रदाय भारतवर्षांत या दृष्टीने जागृतच आहे.

राष्ट्रीय स्वातंत्र्य इत्यादी विषयांकडे नाथपंथीय एका विशिष्ट दृष्टीने बघतात. पारतंत्र्य, राष्ट्रीय व वैयक्तीक अंतरअवस्थेमुळे उत्पन्न होते. स्वरूपाचा व्यावहारीक भूमिकेत पडलेला विसर म्हणजेच राजकीय किंवा सामाजिक पारतंत्र्य, आंधळी मूर्तिपूजा व भाबडे उत्सव करून शक्तीचा अपव्यय करीत राहिले तर व्यक्ती किंवा राष्ट्र कधीही स्वतंत्र होणार नाही. विमानाची शक्ती प्रचंड आहे. पण तिचा दुरूपयोगही आजची पाश्चात्य राष्ट्रे प्रचंड प्रमाणांत करीत आहेत.

नाथ-संप्रदायांत महा-विज्ञान आहे. शक्तीरहस्य आहे, पण ते सार्वत्रिक झाल्यास त्याचाही भयानक प्रमाणात दुरूपयोग होईल. विद्या गुप्त ठेवण्यात दुसरा कोठलाच हेतू नाही.

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search