साधना सूत्रे

श्रीगुरुदेवदत्त

श्रीगुरूदेवदत्त : (माउली ,जुलै१९५९)

प्रात:स्मरणीय, केवल अवधूत श्री जगद्गुरू न्यायरत्न डॉ.धुं.गो.विनोद यांचा `माऊली-श्रीगुरूदेवदत्त' अंकास कृपाशिर्वाद.

-----------------------------------

 

चित्रं वटतरो र्मूले । वृद्ध: शिष्य: गुरुर्युवा।।

गुरोस्तु मौनं व्याख्यानम्। शिष्यस्तु च्छिन्न संशय:।।

आद्य शंकराचार्य

श्रीनाथ विद्येमध्ये, आदिनाथ श्रीशंकराचे त्रिनेत्र - हे दत्तात्रेयांच्या त्रि-शिर स्वरूपाचे मूल आहे.

श्रीशंकराचा त्रिशूल म्हणजे श्रीदत्त तंत्रातील शक्तिपाताचे तीन अंकुश होत. `शब्द, नेत्र व स्पर्श या तीन अंकुशानी तीन तर्‍हेने दीक्षा दिली जाते.'

प्रत्येक दीक्षा दिल्यावर `दत्तम', `दत्तम', `दत्तम' असा उच्चार श्रीसद्गुरू तीन वेळा करतात. `निज स्वरू पं दत्तं' हा येथे दत्त शब्दाचा अर्थ होय.

धृतम, धृतम, धृतम किंवा ओम्, ओम्, ओम् किंवा अल्लख, अल्लख, अल्लख असा त्रिवार उच्चार संप्रदाय प्रविष्ट शिष्याने करावयाचा असतो.

दिगंबर म्हणजे आकाशाचे वस्त्र धारण करणारा.

आकाश हे शून्याचे प्रतीक आहे.

ज्याचे पंचकोशात्मक देहबंध सुटले आहेत - जो कोश-अतीत आहे तो दिगंबर. 

शिव म्हणजे पवित्र व मंगल.

देह हा अपवित्र, अमंगल आहे.

देहातीत आत्मतत्त्वालाच शिव ही संज्ञा योग्य आहे.

दिगंबर म्हणजे सुद्धा देहातीत तत्त्व. ज्याला अंबर वस्त्र किंवा देह उरला नाही तो दिगंबर. 

दिगंबर तंत्र व शिवतंत्र यांतील ऐक्य स्वयंस्पष्ट आहे.

दिगंबर गाथेत ती श्री दत्तात्रेयांना तीन मुखे नसून फक्त एकच त्रिनेत्रात्मक मुख आहे. सर्व गृहीतकृत्ये, सर्व संकेत व सर्व विधी दत्त-तंत्रात उपलब्ध होतात.

श्रीनाथ संप्रदायांत भगवान दत्त हे आदिनाथ शंकर यांचे संचारी अवतार मानले जातात.

एकमुखी दत्त हे श्रीशंकराच्या तृतीय पण मध्यनेत्राचा अवतार होत.

दक्षिण, वाम आणि ऊर्ध्व ही श्री शंकराच्या त्रिनेत्रांची नावे आहेत.

`मिळविले' नाही.

मिळविणे म्हणजे तद्रूप होणे, मीलन करणे, मालक बनणे नव्हे.

`अवधूत' शब्दाचा अर्थ `पूनीत' करणे असा आहे. अव म्हणजे खालच्या श्रेणीचा, स्थूल, धूत म्हणजे धुतलेला, अवधूत म्हणजे ज्याचा स्थूल देह, खालच्या श्रेणीचा देह, जड देह, धुतला गेला आहे, स्वच्छ झाला आहे, जे विशुद्ध चैतन्यमात्र तत्त्व मग उरते ते अवधूत-तत्त्व.

नाथ विद्येत, हे अवधूत स्वरूप आदि-चैतन्य आदिनाथ म्हणून ओळखले जाते. नवनाथांचे स्फूर्तिस्थान म्हणजे भगवान दत्तात्रेय होत.

अवधूत तंत्र हे त्रिगुणातीत व त्रि-वर्णातीत तंत्र आहे, म्हणूनच दत्तोपासना अत्यंत पवित्रतम, अत्यंत शुचिर्भूत अशी असून देखील चातुर्वर्ण्याने मर्यादित झाली नाही.

एकंदर मानव कुटुंबाचे सहजसिद्ध उपास्य दैवत म्हणून दत्त भगवान यांचाच आविष्कार व स्वीकार झालेला आहे. 

श्रीदत्त हे शुचिर्भूतांचे, त्याचप्रमाणे पतितांचे ही, आराध्य दैवत असल्यामुळे लोकशाहीचे अधिकृत दैवत म्हणून त्याची प्रतिष्ठा सर्वमान्य झाली आहे. 

दत्तोपासना हे अत्यंत प्रभावी असे शक्ती-तंत्र आहे. मंत्रविद्या, यंत्रविद्या व तंत्रविद्या ही खरोखर श्रीदत्त विद्येची `तीन शिरे' असून, षड्दर्शनाचे `सहा हात' याच महाप्रतीकाची अखंड पूजा बांधण्यात कृतार्थ झाले आहेत.

`अल्लख' म्हणजे `अलक्ष्य.'

हा आंतर-व्योमात सदैव समुदित होणारा निराकार नाद म्हणजे श्रीदत्त तंत्रातील ओंकार किंवा प्रणव होय.

अ, ऊ, म ही तीन मुखे मानली तर अल्लख नाद ओंकारावरील बिंदूसहीत अर्धचंद्र होय. तत्त्वत; अल्लख शब्दांत ऋग्वेद, यजुर्वेद व अथर्ववेद सामावलेले आहेत.

`अ' हा नाद प्रथम पश्यंतीत काढावयाचा असतो, मध्यमेत त्याचाच द्विगुणित `ल` कार होतो. `स्व' ही वैखरी आहे. वाम नेत्र पहिला, दक्षिण दुसरा व ऊर्ध्व वरचा आणि तिसरा.

ऊर्ध्व नेत्र हा दक्षिण व वाम या दोन्ही नेत्रांची संयुक्त शक्ती तर दर्शवितोच, पण त्यांच्याहून श्रेष्ठतर अशी आतील अतींद्रिय शक्तींचे महापीठ ऊर्ध्व नेत्रांत आहे. 

ऊर्ध्व नेत्राला ज्योतिर्मठ, व्यासपीठ व आदिभान अशी सांकेतिक नावे आहेत.

विधान, प्रतिधान व संधान - थेसिस् ऍंटिथेसिस् व सिंथेसिस् - हेगेल व मार्क्स यांनी उपयोजिलेल्या `डायलेक्टिक्स' या प्रक्रियेत अशीच त्रयी आहे.

श्री गुरूदत्त उपासना हा भारतीय गूढ विद्येचा एक सनातन संप्रदाय आहे.

श्री दत्तभगवान हे प्रतीक म्हणजे एक साकार तत्त्वसंहिता आहे.

संहिता म्हणजे एकत्रीकरण.

उदय, उत्कर्ष आणि उच्छेद या भावत्रयीचे समन्वित स्वरूप म्हणजे श्रीदत्त-आत्रेय ही देवता.

दत्त हे अत्रि - ऋषिंचे अपत्य.

अ-त्रि यांच्या अपत्याचे स्वरूप `त्रि' विश्व प्रकारचे असावे हे एक प्रतीक शास्त्रांतील भव्य कौतुकच नव्हे काय?

पण हे कौतुक न्यायसिद्ध व क्रमप्राप्त आहे. 

अवस्था त्रयाच्या पलीकडे असणार्‍या परात्पर, स्वयंपूर्ण व स्वयंसिद्ध अशा सत्तेच्या अधिष्ठानावरच, विश्वज्ञानाच्या व ज्ञान-विश्वाच्या सर्व त्रिपुटी साकार होऊ शकतात.

अ-त्रि म्हणजे जे तीन नाही, जे कोठल्याही त्रिपुटीने समाविष्ट होऊ शकत नाही, त्यातच, त्या त्रिगुणातीत, तुरीय, केवल तत्त्वामध्ये, सर्व त्रिगुणात्मक त्रैविध्याला आधार व अविर्भाव प्राप्त् होतो.

`दत्त' या शब्दाचा अर्थ जे दिले गेले आहे ते. जे स्व-सत्तेने प्रकट आहे, स्वयंप्रकाश आहे, स्वयंसिद्ध आहे ते `ज्ञान' मिळवायचे असते, उत्पन्न करावयाचे नसते.

`मिळविणे' म्हणजे  स्वत:चे, ज्ञानाशी व ज्ञानात मीलन करणे. 

`केवल' ज्ञान-स्वरूप दत्त भगवानांनी, स्वत:ला कायमचे दिलेले आहे. आपण मात्र त्यांना घेतले नाही. स्वत:मध्ये त्यांचे केवलरूप `मिळविले' नाही.

`अ' हा नाद प्रथम पश्यंतीत काढावयाचा असतो, मध्यमेत त्याचा द्विगुणीत `ल' कार होतो. `ख' ही वैखरी आहे. वैखरीमध्ये द्विगुणीत `ल' कार अंतर्धान पावतो. हे तिन्ही अवयव स-अवकाश म्हणावयाचे असतात. एक अंतर्धान म्हणावयाचे असतात. एक अंतर्धान पावल्यावर दुसरा प्रकटला पाहिजे.

अवधूत रूपांत, म्हणजे निर्देह व निराकार स्वरूपांत, श्रीदत्त भगवान संचार करीत असताना `अल्लख' महामंत्राची दीक्षा, मानवदेही परिणत झालेल्या सिद्धांना प्रसाद म्हणून देत असतात.

अल्लख हा प्रसाद-नाद प्रथम ब्रह्मरंध्रात उमटतो. या नादालाच कुंडलिनीचा पहिला फुत्कार म्हणतात. तो झाल्यानंतर, त्याच्या नंतरचे आविष्कार पश्यंतीपासून, वर सांगितलेल्या क्रमाने होऊ लागतात. केव्हा केव्हा सिद्ध भूमिकेवर आरूढलेल्या मानवी सद्गुरूमाऊलीने स्वत:चे दक्षिण अंगुष्ठ साधकाच्या ब्रह्मरंध्रास स्पर्शिल्याने `अल्लख' नादाचा प्रसाद उपलब्ध होतो. चरण-स्पर्शाचे हे रहस्य आहे.

श्रीसद्गुरूंच्या  वाम अंगुष्ठास साधकाने स्वत:चा दक्षिण नेत्र स्पर्शिल्यानेदेखील `अल्लख' नादब्रह्माचा साक्षात्कार होतो.

ओंकार व अल्लख हे तत्त्वत: एकच आहेत. पण दत्ततंत्रांत अल्लख हे ओंकाराचे मूर्धास्थान किंवा अथर्वशीर्ष समजले जाते कारण - त्यांत ओंकाराची मूर्ती परिणत झाली आहे.

 

४) स्कंदपुराणाच्या उत्तर खंडातील गुरूगीता हे एक `गुं' बीजावरचे महावार्तिक आहे. गुरूमार्गावरील ह्या दीपस्तंभाच्या प्रकाशांत जिज्ञासूंनी व मुमुक्षूंनी आपली पावले निर्धास्तपणे टाकावीत.

गुरूगीता म्हणते की, - `गुरू व्यक्तीच्या ध्यानाने कुणालाही अंत:शांती व अंतिम मुक्ती लाभते.'

प्रात: शिरसि शुक्लाब्जे । द्विनेत्रं द्विभुजं गुरूम्।

वर अभयं युतं शांतम्। स्मरेत्वं नामपूर्वकम्।

न गुरोरधिकम् न गुरोरधिकम्। न गुरोरधिकं।

शिवशासनत: शिवशासनत:। शिवशासनत: शिवशासनत:।

एवं - विद्यं गुरूं ध्यात्वा । ज्ञानं उत्पद्यते स्वयम्।

तत्सद्गुरू - प्रसादेनं। मुक्तोहमिती भावयेत्।।

गुरू म्हणजे सर्वधी - साक्षीभूत, भावातीत व त्रिगुणरहित असे परंतत्त्व होय पण त्याचा प्रत्यय येण्यापुर्वी मानवी गुरूचे ध्यान इष्ट व आवश्यक आहे.

गुरू-पूजा कशी बांधावी याचा सनातन आदर्श श्रीज्ञानेश्वरांनी निर्माण करून ठेवला आहे. श्रीज्ञानेश्वरांची गुरूभक्ती ही अनंतकालपर्यंत अनुपमेय, एकमेवाद्वितीय अशीच राहील.

 

आता हृदय हे आपुले । चौफाळुनिया भले।

वरी बैसवू पाऊले। श्रीगुरूंची।।

माझी तनू आणि प्राण । श्यां दोनी पाडवा लेऊ श्रीगुरूचरण।

करू भोग मोक्ष लिंबलोण। पायां तयां।।

 

श्री दत्तगुरूंनी, भार्गवाला त्रिपुर-रहस्य सांगितले. या गूढ ग्रंथात ज्ञानखंड म्हणून एक विस्तीर्ण प्रकरण आहे.

ज्ञानकैवल्य प्राप्त करून अवधूतरूप कसे होता येईल याचे विवेचन प्रस्तुत ज्ञानखंडात स्वत: दत्त भगवानांनी भार्गवासाठी व सर्व मानवकुलासाठी करून ठेवले आहे.

श्रीपाद श्रीवल्लभ व नृसिंह-सरस्वती यांनी महाराष्ट्रांत, श्रीदत्त संप्रदायाचे सनातन किंवा अमर-स्वरूप गाणगापुरी, अमरजा, कृष्णा संगमाचे काठी कायमचे सिद्ध व प्रसिद्ध करून ठेवले आहे.

या संप्रदायांत, जनार्दन स्वामींचे स्थान म्हणजे ध्रूव स्थानच आहे. श्रीअक्कलकोट स्वामी, साईबाबा, व माणिकप्रभू ही त्रिमूर्ती म्हणजे दत्त भगवंताची मानवी रूपे होत. श्रीवासुदेवानंद सरस्वती हेही साक्षात् दत्तरूप होते.

श्रीदत्त संप्रदाय हा वर्णातीत लोकशाहीचा पुरस्कर्ता आहे.

वर्णाश्रमाचा या संप्रदायात तिरस्कार नाही. पण अवर्णांना, पतिता स्त्रियांना, कोठल्याही तथाकथित पदच्युत मानव समूहाला श्रीदत्त भगवान आत्मीयतेची साद घालीत आले आहेत. हेच दत्त धर्माचे परमश्रेष्ठ वैशिष्ट्य आहे.

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search