साधना सूत्रे

श्री समर्थ रामदास

श्री समर्थांचे चरणी अखिल मानव कुलाचे अखंड व अनंत प्रणाम आहेत. 

तुम्ही उद्घोषिलेला महाराष्ट्र-धर्म हा निखिल मानवतेचा सनातन धर्म होय. महाराष्ट्र-धर्म हा शब्द म्हणजे शाश्वत धार्मिक सत्यांची एक संहिताच आहे.

‘चिंता करितो विश्वाची’ ही आपल्या शैशवावस्थेतली, नेणीवेतल्या जाणिवेची अनुभूती होती.

जातिवाद, समूहवाद व राष्ट्रवाद यांच्या सीमारेषा आपल्या विश्व-भावाला व विश्व-वादाला केव्हाही मर्यादा घालू शकणार नाहीत.

आपला प्रत्येक उद्गार सर्व मानव्याला कवटाळणारा आहे. आपल्या आंतर संकेताचा निनाद, अनंत अवकाशामध्ये एक अमर भूपाळी गात गात संचार करीत आहे. आपल्या विराट हृदयाकाशांत जे जे संकेत साकार झाले त्या सर्व संकेतांत अखिल मानवतेचे भाग्य व भवितव्य सामावले आहे.

आपले अवतार-कार्य महाराष्ट्रापुरते नव्हते, महाराष्ट्राने ते कार्य मर्यादित केले नाही, शत-गुणित, सहस्त्र-गुणित केले आहे.

आपला संदेश महाराष्ट्रापुरता नव्हता, महाराष्ट्र आणि आम्हा मराठ्यांच्या इतिहासाचा तो कालखंड ही एक ज्योतीखालची समई होती.

ज्योती, समईमध्ये फक्त आश्वारित असते, प्रकाशाचे किरण सर्वव्यापी असतात, सर्वत्र संचारतात.

महाराष्ट्र ही आपली जन्मभूमी व कर्मभूमी असली तरी आपल्या ऊर्जस्वल उद्गीथाचा, उद्घोष अथांग द्यावा, पृथ्वीमध्ये अनंत काल तेजाळत राहणार. 

प्रथम, अध्यात्मविद्या नंतर तिच्यावर आधारलेले राजकारण व सर्व-सर्व विषयीचे सुसूक्ष्म सावधपण हा त्रिदल आदेश केवळ मराठ्यांना आहे, महाराष्ट्रापुरताच आहे, असे कसे म्हणता येईल?

आजचे अध्यात्म-विन्मुख, जागतिक राजकारण, मानवांचा सर्वनाश करू पहात आहे. आजच्या मानवाला विवेक उरला नाही, विरागाची तर ओळखाणच नाही. 

मानवी संशोधक बुद्धी स्वैर वासनांची बटीक झाली आहे. विविध वासनांच्या वातचक्रांत गुरफटून निष्प्राण झालेला मानव, एखाद्या शुष्कपर्णाप्रमाणे, शेवटी जमिनीवर पडणार व मातीत मिळून जाणार, नामशेष नव्हे, नि:शेष होणार.

अशा या क्षणी, सर्वथैव संरक्षक व आजच्या सर्व जागतिक यक्ष प्रश्नांना उत्तर देणारी त्रि-स्कंधा आकाशवाणी आपणच उच्चारली आहे.

मुख्य हरिकथा निरूपण ।

दुसरे ते राजकारण ।

तिसरे ते सावधपण ।

सर्व विषयी।

हरिकथेचे, ईश्वरनिष्ठेचे अधिष्ठान प्रथम हवे, त्यावरच, यु.नो. सारख्या विश्वसंस्थेने आपली राजकीय आयोजने आधारली पाहिजेत आणि महत्त्वाचे मौलिक तत्व म्हणजे अविच्छिन्न महाजागृती. 

तुमच्या शब्दांत महाजागर देण्याचे सामर्थ्य आहे. तुम्ही निजलेल्या महाराष्ट्राला आपल्या शब्द शक्तीने जागे केले. 

तुम्हा समर्थांचे सामर्थ्य एका एका शब्दांत पूर्णांकाने प्रकट झाले आहे. आपल्या आवाजांतून व लेखणींतून अवतरलेल्या शब्दाशब्दाला, विशेषत: महाराष्ट्र-धर्म, स्व-धर्म, साक्षात्कार, भक्ती, विवेक, क्रिया व उपासना या सात शब्दांमधल्या प्रत्येक शब्दाला सप्त् सागरांची एकवटलेली शक्ती लाभली आहे. या समर्थ-संस्कारीत सात शब्दांच्या मननाने व नित्य ध्यासाने, कुणालाही याच देही, पुनर्जन्म मिळेल, ‘द्वि-जन्मा’ होता येईल.

प्रत्येक शब्दाला सात दिवस द्यावेत. श्री समर्थांनी निक्षिप्त केलेल्या अभिनव अर्थछटा समजावून घ्याव्यात, त्यांनी केलेल्या प्रत्येक शब्दाचा उपयोग व त्याचे पार्श्वसंगीत  समजावून घ्यावे. असे सात सप्ताह केले तर अ-विद्यानाश होईल. अवघ्या एकूणपन्नास दिवसांचे हे एक पुरश्चरण आहे. एकदा मी ह्याचा अनुभव घेतला आहे. 

ब्राह्ममुहूर्ती प्रत्येक शब्द बारा वेळा लिहावा. सर्व दिवसभर त्या शब्दाकडे वारंवार चित्त नेत असावे. समर्थग्रंथाची केवळ संगति हीच एक रामरक्षा  आहे. मनाचे श्लोक या ४९ दिवसात नेहमी जवळ ठेवावे. ग्रंथराज दासबोध तर असलाच पाहिजे. त्यांच्या संगतीचे व संगतीत मला अनेकवेळा व विलक्षण अनुभव आले आहेत.

झोपी जाण्यापुर्वी ग्रंथराजाला दंडवत घालावा. ग्रंथराज आपण झोपल्यावर उशीचे पलीकडे उच्च्स्थानी पण अगदी जवळ ठेवावा. या प्रयोगाचा अनुभव सांगणे श्रीसमर्थांना मान्य नाही म्हणून मी सांगू शकत नाही.

अखंड नाम स्मरावे। परि दुसरीयासी कळो नेदावे।

काही साक्षात्कार झाला। सांगो नये दुसरीयाला।

जरी आळकेपणे सांगितला । तरी  पुन्हा होणार नाही।। - जुना दासबोध, समास १५

श्रीसमर्थ ‘सावधान’ हा शब्द ऐकून विवाह मंडपातून निघून गेले, तेव्हा त्यांना बारावे वर्ष होते. नंतर बारा वर्षे पुरश्चरण, व बारा वर्षे भारतांतल्या बहुतेक सर्व प्रमुख तीर्थांचे दर्शन-स्नान त्यांना घडले. ३६ वर्षे वयाला पूर्ण झाल्यावर, ते पुन:श्च जांबेला स्वत:च्या माऊलीचे २४ वर्षांनंतर दर्शन घेण्यास आले.सर्व तीर्थांचा पूर्ण-विराम म्हणजे माऊलीचा अंक. त्या अंकाचा आश्रय घेण्यासाठी समर्थ २४ वर्षांनी घरी आले व उद्गारले : 

‘जय जय रघुवीर समर्थ’

तो आवाज, ती अनंत अवकाशापलिकडून आलेली अशारीरिणी वाक् घरांतल्या कुणाच्याही लक्षांत आली नाही. कुणालाही ओळख पटली नाही. कशी पटणार? 

पण माऊली निद्रिस्थ होत्या. त्यांना गाढ सुषुप्तींत देखील ‘जय जय रघुवीर समर्थ’ हा मंत्र व त्याचा उद्गाता यांची ओळख पटली.

जणू काय श्रीसमर्थांच्याच ‘माऊली’ ने आज दासनवमीला तोच महामंत्र महाराष्ट्रात पुन:श्च मुद्राक्षेपित केला आहे. 

जय माऊली, ‘जय जय रघुवीर समर्थ’.

.......

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search