प्रकाशित साहित्य

सर्व-ब्रह्मभाव, सर्वत्र-सर्वात्म-भाव सिद्धवू शकणारी संस्कार-प्रणाली म्हणजे संस्कृती.

(५)

सर्व-ब्रह्मभाव, सर्वत्र-सर्वात्म-भाव सिद्धवू शकणारी संस्कार-प्रणाली म्हणजे संस्कृती.

संस्कृती म्हणजे सत्-संस्कारांचा समुदाय. सत्-संस्कारांनी जीवनाला धवलिमा येतो व अनुभवाची उत्तुंगता वाढत राहते आणि स्वयंसिद्ध सत्यांचे, धवल-गिरीचे दर्शन सुलभतर होते.

हे सत्-संस्कार म्हणजेच संस्कार निर्माण करण्याची एक अनुभवप्रधान व शास्त्रपूत अशी पद्धती किंवा प्रक्रिया आहे. तिला धर्म, अधात्म, योग, ब्रह्मविद्या ही सर्व नावे समुचित आहेत. सध्या धर्म, अध्यात्म, ब्रह्म, योग हे शब्द फारच बुरसट झाले आहेत. हे शब्द पाहिल्याबरोबर, सामान्यत: मोडकळीस आलेल्या एखाद्या डोंगरकिल्ल्याच्या, आतून अडसर घट्ट ओढलेल्या, दिंडी-दरवाज्यापुढे आपण उभे आहोत, असे वाटते. हे शब्द सहजसिद्ध सत्यांची प्रवेशद्वारे, निदान आज तरी राहिली नाहीत.

पण याला उपाय काय? शब्दांची ही प्रवेशद्वारे पुन:पुन: स्वच्छ करावी लागतात; कोळीष्टके झाडून टाकावी लागतात, जीर्णोद्धार करावा लागतो. कधीकधी तर नवीनच रचना करावी लागते ... दुसरा मार्गच नाही.

‘धवल-गिरी’ हा एक ‘चित्र-शब्द’ आहे. त्यात ‘शब्द-चित्रे’ व ‘शब्द-रुपके’ही अनेक आहेत. मला स्वत:ला ‘धवल-गिरी’ हा शब्द अगदी लहानपणापासून अत्यंत आकर्षक वाटत आला आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात, लहानपणी काही शब्द मनावर स्थिर संस्कार करून राहतात. ऋग्वेदातला ‘प्रज्ञान’ हा शब्द, आद्य श्रीशंकराचार्यांचा ‘वैलक्षण्य’ हा शब्द, विद्यारण्यांचा ‘ज्ञप्ती’ हा शब्द, ‘निवृत्ती’ हा शब्द ... आणखीही ‘झपूर्झा’ सारखे आठदहा शब्द गेली पंचेचाळीस वर्षे जसे काही माझ्या रक्तातूनच वाहत आले आहेत. त्यांचे नुसते स्मरण झाले की, माझे अंतर्विश्व त्या शब्दांच्या व त्या अर्थांच्या तेजोरसांत न्हाऊन निघते. अशा तर्‍हेचे अनुभव सर्वांनाच असणार.

असल्या शब्दस्मृती प्रत्येकाच्या जीवनाला आकार देणार्‍या व विकार आणि विचार जागविणार्‍या अत्यंत प्रभावी अशा शक्ती आहेत. डॉ.टागोर यांना, ‘फ्रीडम’, ‘परफेक्शन’, ‘जॉय’ आणि ‘लिबरेशन’ हे इंग्रजी शब्द त्यांच्या लहानपणापासून स्फूर्तीदायक ठरले, असे त्यांनी स्वत: मला अनेकदा सांगितले होते. कवी यीटस् यांना Deep हा साधा शब्द, तर लॉर्ड हॉल्डेनला ‘न्यूक्लिअस’ हा शब्द प्रतिभा जागृत करणारा, समाधी लावणारा असा वाटे, असेही डॉ.टागोर मला म्हणाले होते.

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search