महर्षीं विषयी

शालेय जीवन
अतिशय लहानपणापासूनच न्यायरत्नांच्या कुशाग्रबुद्धीचा प्रत्यय सर्वांना आलेला होता. गुरूजींना न सुटणारे उदाहरण चौथ्या इयत्तेतच त्यांनी सोडवून दाखवले होते. विविध विषयांवरील पुस्तकांचे लेखक, प्रकाशन, पुस्तकामध्ये मांडलेले विषय या विषयीची त्यांची स्मृती विस्मयजनक होती. पुढे मोठेपणी एखाद्या पुस्तकातील संदर्भ पाहिजे असेल तेव्हा वीसेक वर्षांपूर्वी वाचलेल्या पुस्तकाचा आकार, रंग, नाव आणि कुठल्या पानावर तो संदर्भ आहे हे ते सहजपणे सांगत.

कॉलेज जीवन

कॉलेजमध्ये असताना सर्वसामान्य विद्यार्थ्यांहून अगदी मोकळी अनौपचारिक आणि स्वतंत्र अशी त्यांची वागण्याची पद्धत होती.
दडपण, संकोच अशा गोष्टींचा त्यांच्या ठिकाणी मागमूसही नव्हता. त्यांच्या वागण्याला उचित मर्यादा अवश्य होत्या व त्या ते स्वयंप्रेरणेने पाळत असत.
त्यांच्यामध्ये केवळ बौद्धिक विषयांतच नव्हे तर वेगळी अशी अभिजात रसिकता आणि कलांविषयी मार्मिक जाणही होती. त्या काळात मुंबईच्या सांस्कृतिक क्षेत्रांत होणारे अनेक जलसे, संगीताच्या मैफली, नाटके, कला प्रदर्शने यांचा आस्वाद ते घेत असत.
एल्फिस्टन कॉलेजात वसतिगृहात विनोद आणि त्यांचे मित्रवर्य प्रो. दामले यांचे रात्रीच्या जेवणानंतर सुरू झालेले चर्चासत्र पहाटेपर्यंत रंगलेले असायचे. चर्चेचे विषय.. अभ्यासक्रमाबाहेरचे, अनेक ग्रंथांवर - कूट प्रश्नांवर थोडक्यात म्हणजे Everything Under the Sun असे असत. विश्वाच्या पसाऱ्यातील कोणतीही क्षुल्लक वाटणारी घटना किंवा कल्पना पूर्णपणे समजून घ्यायची असेल तर तिच्या मुळाशी जाऊन अधिकाधिक विचार करायला लागते. नंतर आपोआपच इतर अनेक महत्त्वाच्या व आनुषंगिक गोष्टींचा विचार करायला लागतो, हे लक्षात घेऊन त्यांची चर्चा सांगोपांग होत असे.
श्रेष्ठ संस्कृत वाङ्मयामधल्या आवडलेल्या ओळी मोठ्यांदा येता-जाता म्हणणे हा त्यांचा आवडता उद्योग होता.
चर्चा करताना आपले म्हणणे ते काहीसे अतिशयोक्तिपूर्ण आणि Paradoxical पद्धतीने बोलायला सुरूवात करीत व मुद्दे मांडीत. कुणी जर मत विचारले तर ते स्पष्ट, मनमोकळं, नि:संकोच आणि दिलखुलास, कौतुक आणि टीका असे दोन्ही व्यक्त करीत असत.
त्यांना खेळाची आवड नव्हती पण संध्याकाळी समुद्रकिनारी फिरायला जाणे त्यांना आवडत असे.

कॉलेजमध्ये असताना प्राध्यापकांची व्याख्याने ते नियमितपणे ऐकत असत. याशिवाय क्रमिक पुस्तके आणि इतर पूरक पुस्तके ते भराभर वाचून काढत. परंतु प्रत्यक्ष परीक्षेसाठी फार थोडा अभ्यास ते करीत. पाठांतराचा त्यांना कंटाळा असे.
त्याऐवजी अभिजात इंग्रजी काव्य, प्रेमाने आणि भावनोत्कटतेने गुणगुणणे त्यांना आवडे. अवांतर वाचन मात्र अफाट व मर्मग्राही असे.
कॉलेजमध्ये एखादा चांगला वक्ता यायला असला किंवा दुसरी काही मनोरंजक पण वैचारिक साहित्यिक चर्चा असली तर अभ्यास सोडून ते तिकडे जात.
अत्यंत विनोदी आणि मिष्किल स्वभाव हे महर्षिंचे अगदी आगळे, दुर्मिळ आणि अनेकांना अपरिचित असे वैशिष्ट्य होते. त्यांची विनोदबुद्धी सदासर्वकाळ जागी असे.
एका इष्ट मर्यादेपर्यंत ते बोलण्या-वागण्यात गंभीर, सौजन्ययुक्त, साधे व सरळ पद्धतीने संभाषण करीत. पण अनेक वेळेला अशा चर्चांमधून त्यांची थट्टा मस्करी चालू असे.
कोकणातील एका खेड्यातून आलेले म्हणून न्यायरत्न भोळे-गरीब स्वभावाने असतील असे सुरूवातीला त्यांच्या सहाध्यायांची अथवा परिचितांची समजूत असे. परंतु न्यायरत्नांना मनुष्य स्वभावाचे सूक्ष्म ज्ञान होते. बारीक निरीक्षणशक्ती आणि परिस्थितीचे तात्काळ आकलन त्यांच्या ठिकाणी होते. मिष्किल आणि व्यवहार-चतुरसुद्धा असे ते होते.
लहानथोर-कुणीही त्यांच्याशी बोलायला आले तर त्याच्या मनावरचे दडपण ते काढून टाकत असत. आणि स्वत:च्या सहज अकृत्रिम वागण्याने आणि उत्स्फूर्त विनोदाने निर्मळ आनंदाचे वातावरण निर्मित असत.
त्यांना नाट्याचेही चांगले अंग होते. गडकरी, कोल्हटकर, खाडिलकर यांच्या नाटकातील बरेचसे प्रवेश त्यांना तोंडपाठ होते.
एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याची, वावरण्याची सही सही नक्कल ते करीत असत.
शाब्दिक कोट्या आणि प्रसंगनिष्ठ विनोद करताना तो बोचरा किंवा हीणवणारा मात्र कधी नसे.

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search