महर्षीची अर्धांगी मैत्रेयी

न्यायरत्नांच्या स्वभावात अनेकविध आकर्षक पैलू होते, त्यांचा मैत्रेयींबाईंवर खुपच परिणाम झाला.
क्रोध न करता झालेल्या चुकीबद्दल शिक्षा न करता ती का झाली हे हळूवारपणे समजून सांगणे, सर्वांना आपलेपणाने वागवणे,कोणत्याही अपप्रवादावर विश्वास न ठेवणे,संगतीच्या मनुष्याची किंमत स्वत: पारखून ठरवावी, दुसर्‍याच्या भल्याबुर्‍यावर विसंबू नये , कोणाचीही निंदा ऐकून न घेणे या सर्व गोष्टी त्यांना न्यायरत्नांकडून शिकावयास मिळाल्या.

१९३७ जुलै मध्ये विवाह झाल्यापासून न्यायरत्नांनी पुण्याबाहेर अनेक दौरे केले. त्यांच्या सहजीवनात मैत्रेयींबाईंना आपल्या जोडीदाराच्या स्वभावातील निरनिराळे नवनवीन आकर्षक पैलू अनुभवास येत.

१९३८ च्या जुलै-ऑगस्ट मध्ये न्यायरत्न व मैत्रेयीबाई, अप्पा बळवंत चौकामध्ये अभ्यंकरांच्या वाड्यात राहायला गेले.
मैत्रेयी सावकार कन्या असल्यामुळे माझे पैसे, तुझे पैसे अशी भाषा व वागणुक मैत्रेयींची होती, परंतु यातील धोके न्यायरत्नांनी मैत्रेयींना पटवून दिले.

न्यायरत्नांजवळ क्रोधाला कधीच प्रवेश नसे. थोड्याच क्षणात अत्यंत मृदु शब्दांत व हळुवारपणे ते पुढच्याच्या चुकीचे विश्लेषण करत व ती का घडली याची कारणे शोधली जात. न्यायरत्नांचा एक सिद्धांत होता, की चूक होता क्षणी रागावण्याने काहीच फायदा होत नाही. त्याऐवजी चूक करणारा व वडीलधारी रागावणारी व्यक्ती दोघे शांत झाल्यावर चुकीबद्दल चर्चा करावी व निर्णय द्यावा. शिक्षा कशाकरता करायची तर ती चूक लक्षात आणून देऊन पुन्हा तशी चूक होऊ नये म्हणून. परंतु सुज्ञ व्यक्तीला नुसत्या विश्लेषणाने जर चुकीचे कारण लक्षात आले तर त्याबद्दल काहीही शारिरिक अगर मानसिक शिक्षा कशाला हवी ? असा न्यायरत्नांचा विश्वास होता. मैत्रेयीबाईं मुलांना शिक्षा करीत असता न्यायरत्नांनी मुलांची बाजू कधीही घेतली नाही. त्याबाबत काय सुनवायचे असे ते नंतर केव्हातरी एकीकडे सांगत, मुलांसमोर नाही. ते मुलांसमोर मैत्रेयीबाईंचा योग्या तो मान ठेवत.

भारतीय धर्मशास्त्राप्रमाणे, ’स्त्री’ ला पती हाच गुरू म्हणून विहित आहे. मैत्रेयीबाईंचे पती न्यायरत्न विनोद हेच त्यांचे अध्यात्मगुरू ठरले. आणि पती पत्नी भाव जाऊन त्या जागी गुरूशिष्य भावाचा उदय झाला. श्रीगुरूदेवांनी म्हणजेच न्यायरत्नांनी त्यांना घडवले असेच मैत्रेयीबाईंचे नेहमी मत होते.

मैत्रेयीबाईंच्या लग्नाच्यावेळी मैत्रेयीबाईंना व्यावस्थित मराठी लिहिता येत नव्हते. परंतु न्यायरत्नांचे लिखाण वाचून, भाषणे ऐकून व लेख लिहून त्यांचा मातृभाषेचा शब्दसंग्रह खुपच वाढला.

गृहखात्याची पूर्ण जबाबदारी विश्वासपूर्वक मैत्रेयीबाईंवर टाकून, न्यायरत्नांनी त्याना ’कर्मसु कौशला’ चा वस्तुपाठ देण्याचा प्रयत्न केला.

न्यायरत्नांनी आपल्याकडे येणार्‍या-जाणार्‍या मंडळींच्या खाजगी कामाचे स्वरूप मैत्रेयीबाईंकडे कधीही सांगितले नाही. दुसर्‍याने विश्वास टाकला तर त्यास कसे पात्र व्हावे याचे ते प्रत्यक्ष धडे होते. न्यायरत्नांनी सांगितल्याशिवाय, न्यायरत्नांकडे दिवसभर कोण आले कोण गेले याची चौकशी करावयाची नाही असा अलिखित नियम त्यांच्या घरात होता.
त्यामुळे सामान्य स्त्रिया, संस्थानिक, त्यांच्या बायका व इतर प्रसिद्ध नटनट्यांपैकी मैत्रेयीबाईंनी कोणाबद्दलही कधीही आपणहून चौकशी केली नाही. सांगण्यासारखी जुजबी माहिती म्हणजे नाव-गाव इत्यादी, न्यायरत्न स्वतःहून मैत्रेयीबाईंना सांगत. कोणी माणूस भेटावयास आला की त्याला मोकळे वाटावे म्हणून न्यायरत्न मैत्रेयीबाईंना तत्काल दुसरीकडे जावयास सांगत.

मैत्रेयीबाईंच्या घरात विधवा नणंद आणि सावत्र मुलगा ही संसारात मतभेद निर्माण करणारी दोन बीजे होती. परंतु न्यायरत्नांनी मोठ्या कौशल्याने नणंदेबरोबरचे मतभेद कसे टाळावेत हे मैत्रेयीबाईंना सुचवेले होते. दुसर्‍या व्यक्तीने जर आपल्याबद्दल अनुदार उद्गार काढले, तर आपण त्याच्यावर रागावून त्याच्या उखाळ्या-पाखाळ्या काढीत राहाणे योग्य नव्हे. अशामुळे आपली मनःशांती आपण विनाकारण हरवून बसतो. आपल्याबद्दल अपलाप काढणार्‍या व्यक्तींशी न भांडता, त्याच्या अज्ञानाची कीव करणे हाच मतभेदांवरील रामबाण उपाय होय अशी न्यायरत्नांची मैत्रेयीबाईंना शिकवण होती.

अण्णांबद्दल मैत्रेयीबाईंच्या मनात इतरेजणांकडून केलेल्या कुत्सित टीकेमुळे सावत्रभाव जागा होऊ नये म्हणून न्यायरत्नांनी ’मातृत्वाची भिक्षा मागण्यास आलेला भिक्षेकरी’ असे सांगून त्यांना मैत्रेयीबाईंकडे सुपूर्त केले.
तदनंतर आपणास अण्णा नावाचा कुणी मुलगा आहे व तो आपल्या पत्नीचा सावत्न मुलगा आहे हे ही ते विसरून गेले.
अण्णांबरोबर मैत्रेयीबाई कशा वागतात याबद्दल ते कधीही रागावले नाहीत. एकंदरीत न्यायरत्नांच्या कुशलतेमुळे मैत्रेयीबाईंच्या व न्यायरत्नांच्या जीवनात केव्हाही मतभेद निर्माण झाले नाहीत.

आपल्याला निष्कलंक चारित्र्याचा, उदार अन्तःकरणाचा, समुद्रासारखा खोल गंभीर वृत्तीचा, ईश्वरनिष्ठ पती लाभला आहे याची मैत्रेयीबाईंना पूर्ण जाणीव होती. तसेच न्यायरत्नांच्या अध्यात्मिक उंचीची, सिद्ध जीवनाची, कनवाळू स्वभावातून अधून-मधून प्रयुक्त केल्या जाणार्‍या सिद्धीची मैत्रेयीबाईंना जाणीव झाली.

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search