You are hereऐतरेय ब्राह्मणातील राज्यशास्त्रविषयक व समाजशास्त्रविषयक उदात्त कल्पना / ऐतरेय ब्राह्मणातील राज्यशास्त्रविषयक व समाजशास्त्रविषयक उदात्त कल्पना

ऐतरेय ब्राह्मणातील राज्यशास्त्रविषयक व समाजशास्त्रविषयक उदात्त कल्पना


(३)

    ऐतरेय ब्राह्मणाचे संपूर्ण कर्तृत्व महिदास या एकाच व्यक्तीकडे असेल असे चिकित्सक संशोधकांना वाटत नाही. सोमयागाशी संबंध नसलेल्या अनेक विषयाचे विवेचन सहा, सात व आठ या पंचिकांमध्ये झाले आहे. एकंदर आठ पंचिकापैकी या तीन पंचिका प्रक्षिप्त असाव्यात अशी उपपत्ती, कीथ, वेबर व मार्टिन हौग यांनी सुचविली आहे. या उपपत्तीस चार क्षेत्र आंतर व बाह्य प्रमाणेही उपलब्ध होतात. पण महिदासाने काही तत्कालीन जिव्हाळयाच्या प्रश्नांची मीमांसा करण्यासाठी ऐतरेय ब्राह्मण हा एक संग्राहक प्रबंध लिहिला असणेही सर्वथैव शक्य आहे.
    सोमयाग हा मध्यवर्ती विषय विवेचितांना दुसर्‍या काही सामाजिक व राजकीय प्रमेयांचाही उहापोह त्याने सहेतुक केला असेल. विषय वैविध्यामुळे लेखक अनेकच असले पाहिजेत असा निष्कर्ष न्यायत: उपलब्थ होत नाही. काही शब्दप्रयोग व वाक्ये प्रक्षिप्त असतील, नव्हे आहेतच पण सबंध तीन पंचिका प्रक्षिप्त् महिदासाच्याच आहेत याबद्दल मात्र दुमत नाही.
निरुक्तकार ‘यास्क’ (इ. स. पूर्वी सुमारे ६५० वर्षे) व त्याच्याही पूर्वीचा ‘शाकल्य’ यांना ऐतरेय ब्राह्मण परिचित होते. ‘आश्वलायन’ सूत्रे व ‘सांख्यायन’ सूत्रे यातही ऐतरेयाचा संदर्भ आढळतो. या सर्वांचा काल इ. स. पूर्वी ६५० वर्षाच्या अलीकडे नाही. अतएव हे ब्राह्मण इ. स. पूर्वी साडे सहाशे वर्षांच्या मागे सुमारे ७५० वर्षाचे सुमारास लिहिले गेले असावे.
    जनमेजय राजाच्या अभिषेकाचा या ब्राह्मणात उल्लेख आहे. त्यावरूनही हाच रचनाकाल निश्चित होतो.
    ऐतरेय ब्राह्मणाची संस्कृत भाषाशैली वैदिक व स्मार्त भाषेहून अगदी निराळी आहे. ऋग्वेद संहितेची सह्जता, स्फूर्तिमत्ता व ओजस्विता येथे आढळत नाही, पण शब्दप्रयोग मार्मिक आहेत; वाक्यरचना भाववाचक आहे व विवेचन पद्धति न्यायनिष्ठ आहे. ‘शुन:शेप’ (अ. ७), ‘प्रजापति’ (अ. ३) व ‘नामनेदिष्ट’ (अ. ५) यांच्या आख्यायिकांतील काही गद्य-पद्य स्थले, शब्दसौंदर्य, अर्थवत्ता व ध्वनिनिक्षेप या तिन्ही दृष्टींनी उत्कृष्ट ठरतील अशी आहेत.
    ऐतरेय ब्राह्मणाने तत्कालीन यज्ञविषयक व वैचारिक जीवनांत एक अभिनव क्रांतियुग निर्माण केले. शूद्रापुत्र कर्णाला गुणकर्म विकासाने ब्राह्मणत्वच नव्हे, तर ऋत्विजत्व मिळवता आले ही कथा उल्लेखून महिदासाने एका उदात्त विचारसरणीचा पुरस्कार केला आहे. शब्दप्रामण्याच्या मर्यादा ओळखून नवनवीन पाठभेद, प्रयोगभेद व आचारभेद महिदासाने स्वतंत्र प्रज्ञेनें सुचविले आहेत; आणि अशा तर्‍हेने बुद्धी-स्वातंत्र्याचे महत्त्व विशद केले आहे. त्याच्या मते अग्निहोत्र विधुरा्वस्थेतही चालविण्यास हरकत नसावी, क्षत्रियांनी सोमपान करू नये. कारण त्यामुळे क्षात्रतेज कलंकित होण्याचा संभव असतो.
    स्थिरप्रज्ञ पुरोहिताचे प्रभावी मार्गदर्शन स्वीकारल्यास प्रत्येक राजा धर्मनिष्ठ, नीतिपुष्ट व यश:पुष्ट राहील. हा महिदासाचा सिद्धान्त वाचताना तर प्लेटोच्या रिपब्लिकमधील काही विधानांची आठवण होते आणि ऐतरेय ब्राह्मणांतील राज्यशास्त्रविषयक व समाजशास्त्रविषयक कल्पना किती उदात्त भूमिकेवरून निर्देशिल्या असाव्यात याची खात्री पटते.

(४)

    डॉ. मार्टिन हौग यांनी पुणे येथे १८६३ च्या अखेरीस, ‘ऐतरेय ब्राह्मणा’चे पहिले इंग्रजी भाषांतर प्रसिद्ध केले. या प्रकाशनाकरिता त्यांनी आपल्या स्वत:च्या निवासस्थानी काशी क्षेत्राच्या याज्ञिकांकडून काही यज्ञविधाने साक्षात घडवून त्यांचे निरीक्षण-परीक्षण केले. पांच दिवस चालणार्‍या एका ‘पंचाह’ नामक यागाचे अहोरात्र अवलोकन डॉ. हौग यांनी केले व ‘ऐतरेय ब्राह्मणां’तील प्रयोगांची प्रात्यक्षिके अभ्यासून काढली. डॉ. हौग यांची जाज्ज्वल्य जिज्ञासा व तीव्र तितिक्षा आदरणीय नाही, असे कोण म्हणू शकेल? पण प्रो. मॅक्समुल्लर म्हणतात त्याप्रमाणे, “ऐतरेय ब्राह्मणाचा यथायोग्य अन्वयार्थ लावण्यास भारतीय संशोधकांची प्रज्ञाही भारतीयच असणे अवश्य आहे. युरोपीय प्रज्ञेपुढे यज्ञज्वालेचे चलच्चित्र तितक्या ठळकपणे उदित होणार नाही, कारण सांस्कृतिक पार्श्वभूमीचा तेथे अभाव असतो.”
    डॉ. मार्टिन हौग हे स्वत: सायणाचार्यांचे ऋणाईत असल्याची कबुली देतात. बोथलिंग व रॉथ या कोशकारांनी सायणभाष्याची केलेली उपेक्षा ते आक्षेपार्ह समजतात. पण पुन्हा स्वत: मात्र सायणाचार्यांचा व सायणभाष्याचा उल्लेख काहीशा अनादरानेच नेहमी करतात!!
    सायणाचार्य सर्वज्ञ नाहीत हे केव्हाही खरे आहे पण याज्ञिक प्रात्यक्षिके मार्टिन हौग पेक्षा सायणाचार्यांना खात्रीने अधिक माहीत असणार. आयुष्याच्या उत्तरार्धातील चार भिक्षुकांची, पाच दिवसांची याज्ञिकी पाहून मार्टिन हौगला अशी कितीशी यज्ञप्रतिष्ठा प्राप्त झाली असेल? ऐतरेय ब्राह्मणातील काही प्रश्न सोडविताना डॉ. हौगने वेदकालनिर्णय करण्याचाही प्रयत्न केला आहे. त्याच्या मते ख्रिस्तपूर्व दोन अडीच हजार वर्षांपलिकडे ऋग्वेदाचीही प्राचीनता जाऊ शकत नाही!!! एवढा निर्देश लक्षात घेतल्यास डॉ. हौग कोणत्या भूमिकेवरून वैदिक संस्कृतीकडे पाहातात हे स्पष्ट होईल. लोकमान्य टिळक व इतर अनेक पाश्चात्त्य संशोधक सोडले तरी, स्वत: मॅक्समुल्लर देखील वेदकाल इतका अर्वाचीन समजत नाहीत. डॉ. हौग कदाचित स्वत:ला जेतृसंस्कृतीचे प्रतिनिधी समजत असल्यामुळे त्यांच्या अभ्यासात जितांच्या यज्ञविद्येविषयी ‘सत्कार’ वृतीचा पूर्ण अभाव असेल. दीर्घकाल व नैरंतर्य हे अभ्यासाचे महत्त्वाचे घटक आहेत. पण त्याला सत्कार वृतीने पूर्तता यावी लागते, असे भगवान पतंजलि म्हणतात.
    ‘अभ्यासस्तु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारासेवितो दृढभूमि:।’ या सत्कारवृतीच्या अभावी कोणत्याही अभ्यसनीय विषयांच्या हृद्‍गतांचे - अंतस्वरूपांचे - आकलन होणार नाही. डॉ. हौगने स्वत:च लिहिले आहे की, त्याने ऐतरेयविषयक सर्व माहिती मराठीतून मिळविली; कारण काशीच्या याज्ञिकांना इंग्रजी येत नव्हते व मार्टिनला वाग्‌व्यवहार करण्याइतके संस्कृत येत नव्हते. मार्टिनचे इंग्रजी भाषांतर हे खरोखर त्याला अर्धवट समजलेल्या मराठी भाषांतर यज्ञसंस्थेचे रहस्य विशद करण्याच्या दृष्टीने कितीतरी पटीने अधिक यशस्वी वठले आहे. वेबर, कीथ, मॅकडोनाल्ड इत्यादी संशोधकांनीही अल्पाधिक प्रमाणात डॉ. हौगच्याच भूमिकेचा स्वीकार केलेला आहे. कीथचे विवेचन अधिक न्याय्य व संग्राहक आहे.
    दुर्दैवाने भारतीय संशोधकांची विवेचक दृष्टी अद्याप या ब्राह्मणाकडे वळावी तितकी वळली नाही. श्रौताचार्य बापट यांनी १५-२० वर्षांपूर्वीच या ब्राह्मणाचे विचारपूर्वक अवगाहन, अध्ययन, संशोधन सुरू केले. त्यांच्या विवेचनाचे व अभ्यासाचे वैशिष्ट्य म्हणजे जिवंत जिव्हाळा, तीव्र तादात्म्य, जड-बहिर्मुख चिकित्केकडे त्यांचा ऒढा कमी. यज्ञसंस्थेला ते वैदिक संस्कृतीचे उत्तमांग समजतात. आपल्या ‘सत्कार’युक्त विवरणात यज्ञसंस्थेच्या उदात्ततेला ते मध्यवर्ती स्थान देतात. वैदिक यज्ञवेदीवर भारतीय, किंबहुना अखिल मानवी संस्कृतीच्या भवितव्याची कुंडली प्रथमत: उमटली. हे यथार्थत: दीक्षित आहेत. श्रुतिसरस्वतीच्या वीणानादाचे उर्जस्वल पडसाद मराठी जनतेच्या अंत:करणात गेली तीने वर्षे उठविणारा हा उद्‌गाता महाराष्ट्राचे एक वैभव आहे.     ऐतरेयकार महिदास म्हणतो त्याप्रमाणे, “ऋतं वाव दीक्षा, तस्मात‌ दीक्षितेन सत्यमेव वदितव्यम‌” - “या दीक्षिताने ऐतरेयात ‘ऋत’ म्हणजे ‘सामान्य सिद्धान्त’ व ‘सत्य’ म्हणजे ‘विशिष्ट नियम’ आपल्या मराठी भाष्यात यथावत‌ विवेदिले आहेत.” कोणत्याही असत्य अभिनिवेशाने प्रेरित न होता त्यांनी आपले विवेचन केले असून त्याची स्वभावसहज ‘सत्कार’वृत्ती यज्ञरहस्ये उलगडण्यास विशेष साहाय्यक झाली आहे. युरोपियन संशोधकांना अनुपलब्ध असलेला तादात्म्यभाव दीक्षितांचे ठिकाणी त्यांच्या जन्मगुणकर्मामुळे सहजसिद्ध आहे. ते महान याज्ञिक असून आर्ष परंपरेचे एक प्रभावी व प्रतिष्ठित प्रतिनिधी आहेत. अतएव मॅक्समुल्लरने सुचविल्याप्रमाणे दीक्षितांसारखा अधिकारी भाष्यकारच ऐतरेयाचे महत्त्वमापन करू शकेल. दीक्षितांची भाषा ओघवती व आकर्षक आहे. त्यांचे भाष्य मर्मग्राही आहे. ही हृद्‌गते त्यांनी आपल्या स्फ़टिकशुद्ध वृत्तिदर्पणात प्रतिबिंबित केली आहेत. विश्वविद्यालयीन विद्यार्थ्यांना जिज्ञासू समीक्षकांना व चिकित्सक संशोधकांना श्रौताचार्यांचे हे भाष्य अत्यंत उपयुक्त व उपकारक वाटेल यात संदेह नाही. विशेषत: विद्यापीठस्थ अभ्यासकांना ऐतरेय ब्राह्मणाचे अध्ययन या भाष्यामुळे सहजसुलभ हो होइल.
    ऐतरेय महिदासाची आख्यायिका छांदोग्य उपनिषदांत (अ.३. खं.१७) पुन: अवतीर्ण झाली आहे. मानवी जीवन हाच एक महायाग आहे अशी क्रांतिकारक उपपत्ती या उपनिषत्काराने सुचविली आहे. आदर्श अभ्यासक्रमापुढे एकादे निश्चित ध्येय असते. जीवनाला यागमय अर्थात त्यागमय बनविणे हे निश्चित ध्येय प्रत्येक व्यक्तीने आपणापुढे ठेवावे - या ध्येयनिश्चितीतच वैदिक संस्कृतीचे पुनरुज्जीवन आहे. आद्य श्री शंकराचार्यांनी वरील उपनिषद प्रकरणाचे तात्पर्य एका प्रसन्न पंक्तीत सांगितले आहे. त्या पंक्तीचे पुण्यस्मरण करून हा पुरस्कार संपवितो.

निश्चित हि विद्या फ़लाय।

- धुं. गो. विनोद

ॐ ॐ ॐ

Facebook page

We have a page on facebook "Maharshi Vinod Publications.
You can join us.

श्रीगुरुपादुकोदयस्तोत्रम्


आज मुहूर्तवूं या एक नित्योत्सव।
अद्वैत आमोदें, जेणे फुलेल हें विश्व।
क्षणोक्षण प्रभातेल नवोनव महापर्व।
प्रसादचिन्ह श्री-श्री-श्रीविद्येचें।।१।।

परा, परापरा, अपरा।
श्रीगुरूपुजा ही त्रिशिरा।
विमर्शा माऊलीची ही स्तनदुग्धधारा।
ओष्ठविण्याचा समय हा।।२।।

‘अपरा’ आराधनेंत भेद-ग्रह-स्थिती।
‘परापरा’ अवस्थेंत भेद-अग्रह-वृत्ती।
‘परा’ अवस्थानांत अभेद-स्फूर्ती।
श्रीगुरूपुजेची पादुका ही।।३।।

आदिभान हें परात्परगुरुबीज।
विमर्शशक्ती श्रीशिवा गुरूविद्येची गुह्यशेज।
जीवूजीवूचा पहिला परिव्राज।
गुरूपादुकेचें आलोचन ।।४।।

एक उफराटे अ-कुल ब्रह्मपद्म।
तेथ निष्कलेचे निजशक्तीधाम।
निर्झरले व्यापिनीचे श्यामव्योम।
अमृतमेघ वोसंडला।।५।।

चतुष्कोणी देवतात्म्यांचे उगमस्थान।
बिंदुस्थली अमृतसिद्धीचें अनुभावन।
यथाक्रम आंतर अनुभवांचें अनुस्थापन।
श्रीगुरूविद्येचा सहजाचार हा।।६।।

‘विमर्श’ म्हणजे आदिभानस्थित चित्शक्ती।
पादुकोदय म्हणजे शिवशिवेची साम्यरसस्थिती।
गुरूकृपयैव या भाग्यश्रीची समवाप्ती।
‘गुरूकृपा’ ये नामें जीवू जीवूचें निरवस्थान।।७।।

‘चार’ म्हणजे सोपचार आराधन।
‘राव’ म्हणजे विमर्शशक्तीचें उपयोजन।
‘चरू’ म्हणजे द्रव्यगुणांचे संयोगीकरण।
‘मुद्रा’ या नांवे प्रतीकाचा प्रत्यंगभाव।।८।।

चित्गगन-चंद्रिकेची फेसाळली जान्हवी।
श्रीगुरूकृपेची वेल्हाळली की पान्हवी।
प्रकटली वा नीलाब्जाची श्रीसुषमा अभिनवी।
श्रीपादुकोदय स्तोत्र हें ।।९।।

श्रीनवशुक्तिकांचा सम्यक् समुल्लेख।
येथ दशोपनिषद्रहस्याचे महावार्तिक।
आदिकृपेचा जणुं संतताभिषेक।
श्रीगुरूपादुकोदयस्तोत्रम्।।१०।।

।।इति श्री गुरूपादुकोदय स्तोत्रम्।।
------------------------------

You may keep up to date with our updates by subscribing to RSS feed of this website. RSS Feed is available at www.maharshivinod.org/rss.xml