You are hereमाझी डायरी / माझी डायरी

माझी डायरी


पुस्तकाचे नाव: माझी डायरी
लेखक: अंमळनेर - विद्यार्थी
प्रस्तावना: न्यायरत्न विनोद, एम्.ए.पी.एच्.डी.

‘माझी डायरी’ हा आत्मगत लेखनाच्या मराठी भाषेतील एक उत्कृष्ट नमुना आहे.
असले तत्त्वगर्भ लेखन मनोव्यापारांच्या चिकित्सक व अंतर्मुख ‘विद्यार्थ्यालाच’ शक्य असते. आत्मगत लिखाणाचा लेखक स्वत:च्या अनुभवांचा पुन: प्रत्यय घेत असतो व असे करताना त्याला अनुभवांचे मूल्यमापन साधावयाचे असते. मनोदेहाचे नागडे सत्य स्वत: पुढे व जगापुढे धरणे हे त्याचे उद्दिष्ट असते व म्हणून आत्मगत लेखकाकडे जरा जागरूक दृष्टीने पहावे लागते. मानवी जीवनातील गुण व दोषही भडक रंगाने रेखाटण्याची त्याची सहजप्रवृत्ति असते.
प्रस्तुत ‘डायरीत’ वैगुण्यांचे निवेदन क्वचित अतिरंजित भासले तरी मूल्यमापन करताना लेखकाने साक्षित्वाची पक्षातीत भूमिका अढळ ठेविली आहे. सूक्ष्म मनोवृत्तींची गुंतवळ लेखकाने हळुवार स्पर्शाने विंचरली असून तंतूतंतूची उकल व वेगळीक मोठ्या कुशलतेने केली आहे.
आत्मगत लेखनाच्या यशस्वितेचे मर्म हे की, वाचकाला स्वत:च्या अनुभवाची पडछाया तेथे तरंगताना दिसली पाहिजे. कलावान् लेखकाजवळ प्रतिभेची प्रभातरल ज्योति असते - त्याची संवेदन-शक्ती प्रखर असते ही गोष्ट खरी पण कलाकार व रसिक हे दोघेही मानव्याच्या समान पातळीवर असल्यामुळे दोघांच्या अनुभवांतले आंतर-अर्थ (Contents) सारखेच असतात.
आविष्काराच्या पद्धतीत तेवढा भेद ‘डायरीत’ प्रत्येक वाचकाला स्वत:च्या मुखवट्याचे प्रतिबिंब अल्पाधिक प्रमाणात दिसून येईल. स्वत:च्या अंतरंगातल्या स्मृतिशेष झालेल्या पूर्वकालीन हालचालींची चाहूलही सारखी ऐकू येत राहील. लेखकाने मनोव्यापारांची चैत्रागौर अशा सजावटीने मांडली आहे की, वाचकाला आपल्या आंतरगृहातील वस्तुचित्रे तेथे ओळखू यावीत.
माझे बाबतीत वस्तुस्थिती अशी आहे की, लेखकाचे व माझे बौद्धिक ऋणानुबंध ज्या काळात प्रथम विणले गेले तेव्हाचे त्याने ‘डायरी’ मुंबईच्या विविधवृत्त साप्ताहिकात क्रमश: प्रसिद्ध केली. परस्परांच्या स्वाभाविक आकर्षणामुळे ‘विद्यार्थ्याचे’ व माझे जीवन काही काल, बौद्धिकदृष्ट्या एकत्रित झाले होते. ‘विद्यार्थ्यांच्या’ कौतुकास्पद निरीक्षणशक्तीची मला त्यावेळी पूर्ण प्रतीती आली.
‘माझी डायरी’ हा एका तपापूर्वीच्या त्यांच्या निरीक्षणशक्तीचा मार्मिक पण अनुपदवी लीलाविकास आहे. त्या काल्पनिक जीवनपत्रातली खळबळ व खळबळ, अवतरण चिन्हाच्या मर्यादेत अविष्कृत करून, लेखकाने, जणू काय ते आत्मगत आवाज आहेत असे महाराष्ट्र जनतेस भासविले आहे.
‘डायरीच्या’ भाषेतली क्वचित दुर्बोधता वगळल्यास तिच्यातले विदारक पृथ:करण, भेदक परीक्षण व सूचक महत्त्व मापन हे त्रैगुण्य खरोखरच आल्हादजनक आहे.
‘विद्यार्थी’ हे माझे समव्यासंगी स्नेही आहेत. पौर्वात्य व पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा त्यांचा व्यासंग मोठा आहे. प्रत्युपन्न प्रज्ञेने व काटेकोर शब्द योजना करून तात्त्विक विषयांचा परामर्ष ते अत्यंत यशस्वितेने घेऊ शकतात.
माझ्याच स्नेह्याबद्दल अधिक लिहिणे म्हणजे आत्मप्रशंसा करीत राहणे आहे - मला अर्थातच ते आवडेल, पण तुम्हाला?
- धुं.गो. विनोद, ८६४, सदाशिव पेठ, पुणे, तारीख : १४-११-१९४१

ॐ ॐ ॐ

Facebook page

We have a page on facebook "Maharshi Vinod Publications.
You can join us.

श्रीगुरुपादुकोदयस्तोत्रम्


आज मुहूर्तवूं या एक नित्योत्सव।
अद्वैत आमोदें, जेणे फुलेल हें विश्व।
क्षणोक्षण प्रभातेल नवोनव महापर्व।
प्रसादचिन्ह श्री-श्री-श्रीविद्येचें।।१।।

परा, परापरा, अपरा।
श्रीगुरूपुजा ही त्रिशिरा।
विमर्शा माऊलीची ही स्तनदुग्धधारा।
ओष्ठविण्याचा समय हा।।२।।

‘अपरा’ आराधनेंत भेद-ग्रह-स्थिती।
‘परापरा’ अवस्थेंत भेद-अग्रह-वृत्ती।
‘परा’ अवस्थानांत अभेद-स्फूर्ती।
श्रीगुरूपुजेची पादुका ही।।३।।

आदिभान हें परात्परगुरुबीज।
विमर्शशक्ती श्रीशिवा गुरूविद्येची गुह्यशेज।
जीवूजीवूचा पहिला परिव्राज।
गुरूपादुकेचें आलोचन ।।४।।

एक उफराटे अ-कुल ब्रह्मपद्म।
तेथ निष्कलेचे निजशक्तीधाम।
निर्झरले व्यापिनीचे श्यामव्योम।
अमृतमेघ वोसंडला।।५।।

चतुष्कोणी देवतात्म्यांचे उगमस्थान।
बिंदुस्थली अमृतसिद्धीचें अनुभावन।
यथाक्रम आंतर अनुभवांचें अनुस्थापन।
श्रीगुरूविद्येचा सहजाचार हा।।६।।

‘विमर्श’ म्हणजे आदिभानस्थित चित्शक्ती।
पादुकोदय म्हणजे शिवशिवेची साम्यरसस्थिती।
गुरूकृपयैव या भाग्यश्रीची समवाप्ती।
‘गुरूकृपा’ ये नामें जीवू जीवूचें निरवस्थान।।७।।

‘चार’ म्हणजे सोपचार आराधन।
‘राव’ म्हणजे विमर्शशक्तीचें उपयोजन।
‘चरू’ म्हणजे द्रव्यगुणांचे संयोगीकरण।
‘मुद्रा’ या नांवे प्रतीकाचा प्रत्यंगभाव।।८।।

चित्गगन-चंद्रिकेची फेसाळली जान्हवी।
श्रीगुरूकृपेची वेल्हाळली की पान्हवी।
प्रकटली वा नीलाब्जाची श्रीसुषमा अभिनवी।
श्रीपादुकोदय स्तोत्र हें ।।९।।

श्रीनवशुक्तिकांचा सम्यक् समुल्लेख।
येथ दशोपनिषद्रहस्याचे महावार्तिक।
आदिकृपेचा जणुं संतताभिषेक।
श्रीगुरूपादुकोदयस्तोत्रम्।।१०।।

।।इति श्री गुरूपादुकोदय स्तोत्रम्।।
------------------------------

You may keep up to date with our updates by subscribing to RSS feed of this website. RSS Feed is available at www.maharshivinod.org/rss.xml