You are hereप्लेटोची आदर्श राज्यघटना / प्लेटोची आदर्श राज्यघटना

प्लेटोची आदर्श राज्यघटना


पुस्तकाचे नाव: प्लेटोची आदर्श राज्यघटना
लेखक: जनार्दन गणेश जोगळेकर
प्रस्तावना:
न्यायरत्न धुं.गो. विनोद

सध्याच्या नाजूक आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे भारतवर्षाला साहित्यिकापेक्षा सैनिकांची, कलेपेक्षा कर्तृत्वाची व सुरेल संगीतापेक्षा धीरगंभीर रणरागिणीची अधिक आवश्यकता आहे.
प्लेटोने आपल्या आदर्श राज्यघटनेत कवी व कलावन्त यांना हद्दपार केले आहे! ‘काव्य व कला ही वस्तुस्थितीपासून दुप्पट दूर असतात’, असे प्लेटो म्हणतो. ईश्वर प्रत्येक आदर्श वस्तू निर्माण करतो; त्या वस्तूचे विकृत स्वरूप म्हणजे व्यावहारिक वस्तू व हिचे पुनर्विकृत स्वरूप म्हणजे चित्र, नाटक किंवा काव्य.
ईश्वर निर्मित वस्तु म्हणजे वस्तूचे मूलतत्त्व किंवा आदर्शभूत परिपूर्ण स्वरूप. हे पूर्णपणे व्यक्तदशेस कधीच येत नाही. आदर्श वस्तूंची सृष्टी स्वतंत्र व स्वयंपूर्ण आहे. व्यावहारिक जगात आदर्श वस्तूंची विकृत उपलब्ध होत असतात.
व्यावहारिक वस्तू ही आदर्श सद्वस्तूपासून एकपट दूर असते. कलात्मक वस्तू सद्वस्तूपासून दुप्पट दूर असते. कलेचे आविष्कार व आदर्श सद्वस्तु, यांमधील अंतर अशा रीतीने द्विगुणित झाले असल्यामुळे कवि व कलाकार हे प्रतिभासिक, मायावी, अवास्तव, काल्पनिक जगात वावरणारे वेडेपीर असतात. आदर्श राज्यघटनेत त्यांना थारा देणे हे मूर्खपणाचे व आत्मघातकीधोरण होय असे प्लेटोचे स्पष्ट म्हणणे आहे.
रशियातील साम्यवादी लेखक व तत्त्वज्ञ मॅक्झिम गॉर्की यानेही असेच विचार एके ठिकाणी प्रकट केले आहेत. काल्पनिक व अवास्तव (Unreal) आनंदाच्या निर्मितीत जीवनशक्तीचा वेच करणे हा गुन्हा आहे.
शिवाय सर्व कलांमध्ये अनुकरणाचे तत्त्व अंतर्भूत असते. चित्र, कविता व गायन ही घेतलेल्या पूर्वानुभवाचे प्रतिध्वनी किंवा अनुकृति होत. अनुकरणात्मक आचार-विचार मनुष्याला परावलंबी, पंगु व निर्जीव करतात. इमर्सन म्हणतो, “Imitation is suicide - अनुकरण म्हणजे आत्महत्या होय.” “What good have they done? - ललित कलांनी आजपर्यंत जगाचे काय कल्याण केले आहे?”, असा स्पष्ट प्रश्न प्लेटो विचारतो.
भारतीय व विशेषत: महाराष्ट्रीय तरुणांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीत क्षात्रतेज, युद्धशास्त्र व संघटित राष्ट्रीयत्व यांची उपासना करणे आवश्यक असल्यामुळे त्यांना प्लेटोचे रिपब्लिक अभ्यसनीय वाटेल. आपल्या राष्ट्राच्या सद्य:स्थितीविषयी, भवितव्याविषयी व संघटनेविषयी प्लेटोच्या या ग्रंथाच्या वाचनाने तरुण महाराष्ट्रीयांच्या मानत एक नवजागृती निर्माण होईल. आजच्या भारतवर्षाकरिता आदर्श राज्यघटना कोणती याविषयी सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. अशाप्रसंगी रिपब्लिकाचे सहाय्य फार मोलाचे व प्रासंगिक ठरेल.

राज्यघटनेचे आदर्श स्वरूप कसे असावे या विषयाची पद्धतशीर व शास्त्रीय मीमांसा करणारा प्लेटो हा पहिला तत्त्वज्ञानी होय. वाल्मीकाच्या रामायणात रामराज्याविषयीची रुपरेषा वाचताना प्लेटोच्या रिपब्लिकची आठवण होते. पण प्लेटोच्या रिपब्लिकमधील विवेचन रामायणापेक्षा अधिक व्यावहारिक व शास्त्रीय स्वरूपाचे आहे.
प्लेटोनंतर रिपब्लिकच्या धर्तीवर आदर्श राज्यव्यवस्थेची अनेक कल्पनाचित्रे रेखाटण्यात आली. सिसेरो, सेंट ऑगस्टिन, डांटे, सर थॉमस मूर, बेकन, क्रॅम्पानेला व अगदी अलीकडे एच्.जी. वेल्स् यांनी आपापल्या दृष्टीकोनाने आदर्श राज्यस्थितीचे चित्रण केले आहे. पण प्लेटोच्या भव्य कलाकृतीचा-रिपब्लिकचा - ताजमहाल अद्याप अद्वितीय, अनुपमेयच आहे.
रिपब्लिकमध्ये प्लेटोने काही सनातन, त्रिकालबाधित सत्यांचा उच्चार केला आहे. त्याच्या प्रत्यक्ष अनुभवाचे क्षेत्र फार विस्तृत नव्हते. दोन तीन शतकांपलिकडे त्याला ऐतिहासिक ज्ञान नसावे. त्याचप्रमाणे दोन-तीन ग्रीकसंस्थानातील राजकारणापलिकडे त्याच्या राजकीय अनुभवांचाही विस्तार गेला नसणार, असे प्लेटोचा मल्लिनाथ डॉ. जोवेट म्हणतो.
आजचे राजकारण जागतिक आहे. आजची हिंदुस्थानातील राजकीय प्रगति आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा परिणाम आहे. आज कोणत्याही देशाला स्वतंत्र व स्वयंपूर्ण राजकारण नाही. आंतरराष्ट्रीय आर्थिक व व्यापारविषयक परिस्थिती हीच प्रत्येक राष्ट्राचे भवितव्य निश्चित करीत आहे. अर्वाचीन जीवनातील अर्थकारण, धर्मकारण व समाजकारण यांचे तपशील (details) प्लेटोच्या प्रतिभेच्या आवाक्याबाहेर आहेत हे खरे. तथापि प्लेटोची प्रतिभा सर्वस्पर्शी, मूलगामी व संग्राहक असल्यामुळे रिपब्लिकमध्ये उपलब्ध होणारे सिद्धांत कोणत्याही देशात व युगात उपयुक्त, प्रासंगिक ठरतील.
प्लेटो व भारतीय तत्वज्ञ यांच्यात काही विलक्षण साम्ये आहेत. याज्ञवल्क्याचा आत्मवाद, मनूची वर्णाश्रम व्यवस्था, कपिलाचे सत्व, रज हे गुणत्रय, आचार्याचा विवर्तवाद, व्यासाचा राजर्षि-या सर्व कल्पनांच्या स्पष्टास्पष्ट प्रतिमा प्लेटोच्या तत्त्वमंदिरांत पहावयास मिळतात.
प्लेटो व सॉक्रेटिस यांचा अन्योन्य संबंधही जणू काय भारतीय गुरुसंस्थेचेच उज्ज्वल उदाहरण आहे. सद्गुरूच्या जीवनाशी समरस होऊन स्वत:च्या व्यक्तित्वाला अंधारात ठेवण्याची भारतीय तत्त्वजिज्ञासूंची व मुमुक्षूंची प्रथा प्लेटोनेही आदरिलेली दिसते.
याज्ञवल्क्याचे ‘आत्मा वा अरे मन्तव्य:’ हे सूत्र व प्लेटो-सॉक्रेटिसाचे ‘Know thyself’ हे तत्व ही दोन्ही स्थूलत: एकच होत. स्मृति वाङ्मयातील ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य हे वर्णत्रय व प्लेटोचे गार्डिअन्स (ज्ञानप्रेमी), ऑक्झिलिअरीज (युद्धप्रेमी) व प्रोड्यूसर्स (अर्थप्रेमी) या आदर्श राज्यघटनेतील तीन मानवजाती यात काय भेद आहे? कपिलसांख्याचे सत्व, रज, तम हे त्रेगुण्य व प्लेटोने रिपब्लिकमध्ये सांगितलेले लॉजिस्टिकॉन, थ्यूमॉस आणि एपिथ्यूमिय हे व्यक्तिमात्रांतील गुणविशेष या दोहोंमधील साम्य स्पष्ट आहे.
आद्य श्री शंकराचार्य हे ‘विवर्तवाद’ अंतिम मानतात. विवर्तवाद म्हणजे रज्जूवर ज्याप्रमाणे सर्पाचा भास होतो. त्याप्रमाणे मूलब्रह्मावर जगताचा आभास म्हणजे ‘विवर्त दिसणे’. प्लेटोच्या Theory of ideas किंवा चिद्वस्तुवाद या उपपत्तीप्रमाणे विश्वातील विविध वस्तू स्वयंपूर्ण व आदर्श अशा मूलतत्वांची विकृत प्रतिबिंबे होत; याचाही ध्वन्यर्थ जग हे सत्यस्वरूप नसून आभासमय आहे. या दृष्टीने प्लेटो व शंकराचार्य एकाच भूमिकेवर आहेत असे म्हणता येईल.
आचार्याच्या ‘हस्तामलकांतील’ बिंबप्रतिबिंबवाद हा प्लेटोच्या उपपत्तीचे मूलसूत्रच वाटते. प्लेटोचे Ideas विषयीचे संवाद म्हणजे या लघुस्तोत्रावरील भाष्येच होत.
गौडपादांच्या कारिकेतील ‘अजातवाद’ ‘अवच्छेदवाद’ व विशेषत: ‘कल्पनावाद’ यांचे स्मरण प्लेटो वाचताना वारंवार होते.
योगवसिष्ठात ‘ब्रह्म व जगत् यांचा संबंध रत्न व त्यांची प्रभा यांच्या संबंधाप्रमाणे आहे’ असे एक रूपक आढळते या भूमिकेस ‘चिद्विलासवाद’ असे म्हणतात. रत्न व त्याची प्रभा यामध्ये कार्यकारण संबंध नसून स्वभावविष्कार आहे. त्याप्रमाणे जगत् म्हणजेही चैतन्याचा विलास आहे, आविष्कार आहे, प्रभा आहे. प्लेटोच्या फीड्रस्, फीडो, फिलेबस, लॉज या चार संवादात या भूमिकेचाही स्पष्टास्पष्ट निर्देश आढळतो.
त्याचप्रमाणे व्यासांनी वर्णिलेली राजर्षींची कल्पना व प्लेटोने रिपब्लिकमध्ये चित्रिलेली ‘फिलॉसफर-किंग’ ही कल्पना यातील रहस्यार्थ एकच आहे. कठोपनिषदात अंतिम आत्मतत्वाला ‘सूर्यो यथा’ (३, २, ११) म्हणजे सूर्याची उपमा दिली आहे. प्लेटोनेही आपल्या `सद्वस्तू-विश्वातील' (World of eternal ideas) परमश्रेयाला (The Good) सूर्याचीच उपमा दिली आहे. नैयायिकांच्या जातिवादावर (Doctrine of Universals) शंकराचार्यांनी केलेल्या टीकेचे स्मरण, प्लेटोचा चिद्वस्तुवाद व त्यावरील पारमेडिसचे आक्षेप, वाचताना झाल्याशिवाय राहात नाही.
प्लेटो मानवी आत्म्याचे तीन विभाग करतो - बुद्धिप्रधान, वीर्यप्रधान व वासनाप्रधान. प्रत्येक विभागाला अनुरूप अशी तीन प्रकारची धारणातत्त्वे, तीन प्रकारची सुखे व तीन प्रकारच्या आकांक्षाही त्याने मानल्या आहेत. भगवद्गीतेतही सात्त्विक, राजस व तामस अशी तीन प्रकारची सुखे, धृति व स्वभाव सांगितले आहेत.
प्लेटोने केलेला मत व सत्यज्ञान (Opinion and Knowledge) यांमधील फरक व मुंडकोपनिषदातील अपराविद्या व पराविद्या यांतील भेद हे दोन्ही एकाच दृष्टीकोनाने करण्यात आहेत. प्लेटोच्या ‘फीड्रस्’ नामक संवादांतील सारथी व अश्व यांचे रूपक व कठोपनिषदातील ‘विज्ञानसारथीर्यस्तु मन:प्रग्रहवान्नर:’ ही कल्पना यांच्यामध्ये तंतोतंत साम्य आहे.
रिपब्लिकमधील गुहेचे सुप्रसिद्ध रूपक (Parable and Knowledge) आणि छंदोग्य उपनिषदात आलेली गांधार देशातील डोळे बांधलेल्या एका पुरुषाची हकीकत यामध्येही पुष्कळसे साम्य आहे. जगाच्या तात्त्विक वाङ्मयात प्लेटोच्या गुहारूपकाला (Allegory of the cave) मानाचे स्थान आहे. गुहेतील ब्रह्मजीवास सत्सूर्याचे दर्शन कधीच होत नाही. त्यांचा परिचय फक्त पडछायेशी असतो. ज्ञानी मनुष्याच्या सहाय्याने काही कालानंतर, बद्ध जीवाच्या अंधारास सरावलेला दृष्टीला सत्यदर्शन घडते.
“राजकारणाचे मर्यादित वर्तुळ हीच जणू काय एक गुहा” (डॉ.जोवेट) विशाल दृष्टी असलेला तत्त्वज्ञानी या गुहेत गेल्यावर काही वेळ साहजिकच आंधळयासारखा वागतो. पण लवकरच त्याला त्यागुहेचे संपूर्ण ज्ञान होते. गुहेमध्ये वास्तव्य करणाऱ्या अल्पज्ञ व्यक्ती एका अर्थी अंधच असतात. त्यांना तत्त्वज्ञानी म्हणजे एक उपहासाचा विषय वाटतो. काही वेळ भांबावून गेलेला तत्त्वज्ञानी चिद्वस्तूंचे त्याला ज्ञान असल्यामुळे लवकरच निर्भय होते व गुहेतील अल्पज्ञ लोकांस मार्गदर्शक ठरतो. छंदोग्य उपनिषदात असाच एक दृष्टांत आहे. गांधार देशाच्या एका रहिवाशास चोर लुबाडतात; त्या डोळे बांधतात (अभिनद्वाक्ष:) व त्याची दिशाभूल करून त्याला रानावनात सोडतात तेथे. त्याला एक चांगला पांथस्थ भेटतो, तो त्याचे बांधलेले डोळे सोडतो व त्याला योग्य मार्ग दाखवितो. या रूपकात चोर म्हणजे क्षूद्र मानवी विकार व वासना, पांथस्थ म्हणजे तत्त्वज्ञानी सद्गुरु; गांधार देश म्हणजे स्थितप्रज्ञा अवस्था. प्लेटोचे रूपक व छंदोग्य उपनिषदांतील रूपक स्थूलत: एकाच स्वरूपाची आहते. अज्ञानाने होणारी डोळेझाक हे दोन्ही रूपकाचे रहस्य आहे.
प्लेटोच्या वाङ्मयात त्याने स्वत: केलेला भारतीय तत्त्वज्ञानविषयक प्रत्यक्ष असा एकही निर्देश, संदर्भ अगर उल्लेख नाही. प्लेटो व पौर्वात्य तत्त्वज्ञान यांच्यामध्ये असलेली विस्मयकारक अप्रत्यक्ष साम्ये लक्षात घेतली की, एक कल्पना साहजिक मनात येते; पुनर्जन्मावर विश्वास ठेवणार प्लेटो, हा अखिल विश्वास आर्य करण्याची आकांक्षा धरणार्‍याअ (‘कृण्वन्तु विश्वमार्यर्म्’) एखाद्या प्राचीन वैदिक ऋषीचा अथेन्समधील अवतार असेल काय?

प्लेटोला सामान्यत: गूढवादी (Mystic) समजण्यात येते. पण मला वाटते प्लेटो हा गूढवादी नव्हता, वास्तववादी होता. अर्थात प्लेटोचा वास्तववाद व कार्लमार्क्सचा वास्तववाद यांच्यामध्ये महत्त्वाचा भेद आहे. प्लेटोचा वास्तववाद अनुभवाच्या ‘वास्तविक’ यथार्थ स्वरूपावर आधारला आहे, कार्लमार्क्सचा केवळ ब्राह्मवस्तूवर आधारला आहे.
प्लेटोच्या मते अनुभवामद्ये, व्यक्ती व वस्तू, ज्ञेय व ज्ञाता या दोन्ही पदांना सारखेच महत्त्व आहे. कार्लमार्क्सच्या साम्यवादात मानवी इतिहासाचा केवळ भौतिक दृष्टीने अन्वयार्थ लावला जातो. यालाच Materialistic Interpretation of history असे म्हणतात. ज्ञेयाकडे, ब्राह्मवस्तूकडे, भौगोलिक व भौतिक परिस्थितीकडे, संपूर्ण कारकत्व असून ज्ञाता, व्यक्ती, मनुष्य हा एक बाह्यत: निर्णित असा जड परिणाम आहे; ही साम्यवादाची भूमिका. भौतिक शक्ती ही खरी निर्णायक, शासक शक्ती. प्लेटोला ही भूमिका मान्य नाही. अनुभव म्हणजे बाह्य भौतिक परिस्थितीची मनावर होणारी केवळ प्रतिक्रिया नव्हे. अनुभव म्हणजे व्यक्ती व वस्तू, ज्ञाता व ज्ञेन, द्रष्टा व दृश्य यांच्या एकमेकांवर होणाऱ्या क्रिया-प्रतिक्रिया. वस्तूमुळे, त्याप्रमाणे व्यक्तिंमुळेही अनुभवाचे स्वरूप ठरत असते. दर्शनाच्या क्रियेत बदल केला की दृश्यही बदलते. डोळयावरील चामडी किंचित दाबली तर एका वस्तूऐवजी दोन वस्तू दिसू लागतात. कावीळ झालेल्या डोळयांना सर्व पिवळेच दिसते; इंद्रियदोषाने प्रत्यय-दोष निर्माण होतो. प्लेटोच्या वास्तववादात अनुभवाचे वास्तविक स्वरूप व्यक्त झाले आहे. प्लेटोच्या भूमिकेत वस्तू व व्यक्ती या दोन्ही पदांचा समन्वय झाला आहे. म्हणून प्लेटोला समन्वयनिष्ठ वास्तववादी Synthetic Realist म्हणता येईल.

प्लेटोच्या रिपब्लिकमधील वास्तववादास ‘व्यवहारवाद’ हे नाव अधिक शोभेल. त्याच्या निर्भीड व्यवहारी दृष्टीला सर्वसामान्य व रुढ तत्त्वज्ञानाचे त्याने अवास्तव स्तोम माजविलेले नाही. तरुणांना तर तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात उतरण्याची त्याने मनाईच केलेली आहे. तत्त्वज्ञान हे पन्नास वर्षांच्या पलीकडील वृद्धांकरता असून त्याचा अभ्यास चालू असताही लोकसंग्रहाचे व्रत अव्याहतपणे सुरू पाहिजे असा प्लेटोचा कटाक्ष आहे.
स्त्रिया व पुरुष यांमध्ये स्वभावत: भेद नाही; स्त्रिया-पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात कार्य करू शकतील. त्यांना पुरुषांच्या बरोबरीने व्यायाम, शिक्षण, युद्धकला ही शिकवण्यात यावी असे प्लेटोचे स्पष्ट मत आहे. आधुनिक साम्यवादाप्रमाणे प्लेटोच्या मते स्त्रिया व मुले यांवर समाजाची मालकी असून समाजोत्कर्षाकरिता त्यांच्या जीवनाचे स्वामित्व समाजाकडेच असावे. सुप्रजाजनन शास्त्राचा प्लेटो हा आद्य प्रणेता दिसतो. चांगली प्रजा निर्माण व्हावी म्हणून उत्तम स्त्री-पुरुषांना मुद्दाम एकत्र आणण्यात यावे, वीरपुत्र अधिक निर्माण व्हावे म्हणून कर्तृत्ववान व झुंजार तरुणांना स्वैरगमनाची अपवादात्मक परवानगी देण्यात यावी, युद्धनीतीपुढे, सामाजिक नीतिपुढे वैयक्तिकनीतीने नमते घेतलेच पाहिजे, अशी मते रिपब्लिकमध्ये प्लेटोने प्रकट केली आहेत.
विवाहसंस्थेबद्दल त्याला आदर आहे, पण ती एक उपयुक्त संस्था म्हणून. विवाह संस्थेच्या धार्मिकतेविषयी त्याला विशेष उत्साह किंवा आस्था नाही.
सख्यभाव (Friendship) त्याला मानवी जीवनात अत्यंत महत्त्वाचा वाटतो. मित्रत्व ही जवळजवळ विवाहाइतकी महत्त्वाची संस्था त्याला वाटते. परस्परस्नेहभावाच्या प्रगतीत, वृद्धीत अनेक अडचणी असतात हे तो जाणतो. प्लेटोच्या मते Loyalty म्हणजे निष्ठा हे मित्रांच्या प्रतिरसायनाचे रहस्य आहे.
प्लेटोची संवादात्मक पद्धती मनोरंजक व उद्बोधक आहेच पण संवादाच्या रूपाने त्याने एका अभिनव बौद्धिक प्रक्रियेला (Dialectical Method) जन्म दिला आहे. या प्रक्रियेचा पाश्चिमात्य विचारसरणीवर अव्याहतपणे परिणाम होत आहे. प्लेटोचे ईश्वरविषयक विचार तर्कशुद्ध आहेत. सत्यापरता नाही “धर्म - सत्य तेचि परब्रह्म।” ही भूमिका त्याला मान्य आहे - We are more certain of our ideas of Truth and Right, than we are of the existence of God, and are led on, in the order of thought, from one to other.

प्लेटोच्या आदर्श राज्यघटनेत समाजशास्त्रदृष्ट्या, नीतिशास्त्रदृष्ट्याही अनेक दोष आहेत. शिवाय ही घटना पूर्णांशाने सत्यसृष्टीत उतरणे सर्वथैव अशक्य आहे. प्लेटोच्या व्यावहारिक दृष्टीला या आदर्श राज्यघटनेची असंभवनीयता, अव्यवहार्यता स्पष्ट दिसली होती, पण a noble lie - एक उदात्त असत्य, ध्येयमूर्ती म्हणून दृष्टीसमोर ठेवणे हितप्रद ठरेल अशी प्लेटोची श्रद्धा आहे.
आजच्या जागतिक अस्वास्थ्याचे एक कारण - पाश्चात्य जगास प्लेटोच्या संदेशाचे ध्वन्यर्थ समजले नाहीत हे होय. इतिहास म्हणजे प्रामुख्याने महनीय व्यक्तींचे चारित्र्य. आजच्या जागतिक संस्कृतीच्या व्य्क्त, प्रकट इतिहासामागे ज्या महनीय व्यक्ती पार्श्वभूत आहेत. त्यात प्लेटोचे स्थान पहिले नसले तरी पहिल्या रांगेतले निस्संशय आहे. विशेषत: पश्चिम गोलार्धाची आजची संस्कृती प्लेटोच्या तत्त्वप्रणालीचाच एक परिणाम काही अंशी विकृत परिणाम आहे. ही विकृती नष्ट करण्यास प्लेटोची भूमिका यथार्थत:, स्वभावत: आकलन झाली पाहिजे.
‘रिपब्लिक’ या प्लेटोच्या ग्रंथात उच्चोदात्त ध्येयदृष्टी व कटुकठोर वास्तव सृष्टी यांचा सुंदर समन्वय उपलब्ध होतो. या ग्रंथांत सामाजिक समतेवर प्लेटोने दिलेला भर आजच्या भांडवलशाही संस्कृतीने लक्षात ठेवणे अवश्य आहे.
रिपब्लिक हा शिक्षणशास्त्रावरीलही एक प्रमुख ग्रंथ समजला जातो. मिल्टन्, लॉक, रुसो, जोन पॉल व गटे यांच्या शिक्षणविषयक विचारावर रिपब्लिकची चांगलीच छाया आहे. गणित, खगोलशास्त्र, भूमिती व तर्कशास्त्र या विषयांवर प्लेटो विशेष जोर देतो. मानवी आत्म्याच्या बुद्धिप्रधान अंगाची शक्य तितकी वाढ करण्याविषयी त्याचा आग्रह आहे. वाङ्मय विषयक अभ्यासास तो फारसे महत्त्व देत नाही. स्वयंशिक्षण (self education) हे प्लेटोचे ध्येय आहे. प्लेटो पूर्व व पुनर्जन्मवादी असल्यामुळे व्यक्तिमात्रात सुप्त असलेल्या स्वााभाविक शक्तीचा विकास करणे हेच शिक्षणाचे खरे कार्य होय असे त्याचे मत आहे. तथापि, प्लेटोचा शैक्षणिक दृष्टीकोन वैयक्तिक नसून राष्ट्रीय आहे.
राष्ट्राच्या स्वातंत्र्याचे संरक्षण कसे होईल, राष्ट्रीय वर्चस्व व संघटना कशी टिकेल, व्यक्तीचे स्वभावसिद्ध गुणविशेष राष्ट्राला अधिकांत अधिक उपयुक्त कसे होतील, या दृष्टीने प्लेटोने शिक्षणशास्त्राचा विचार केला आहे. हीच दृष्टी हिंदुस्थानातील जनतेस आज आवश्यक नाही काय?
मुसोलिनीने इटलीत सुरू केलेली शिक्षण योजना राष्ट्रीय दृष्टीची व प्लेटोच्या शिकवणीवर आधारलेली अशीच आहे. महाराष्ट्रात तरी प्लेटोचे राष्ट्रीय शिक्षणविषयक व क्षात्रवृत्तीला उत्तेजक असे विचार प्रसृत होणे अतिशय आवश्यक आहे.

दिलरुब्याच्या छेडलेल्या एका तंतूवरून दुसर्‍या तंतूवर संबद्ध पण स्वतंत्र असे वेधक ध्वनि प्रकट होतात, तसा काहीसा अनुभव प्रो.जोगळेकर यांचा अनुवाद वाचताना येतो; हा अनुवाद मूलार्थप्रापक तर आहेच पण त्यात एक स्वतंत्र नादवत्ता आहे, कारण तो जिव्हाळयाने लिहिण्यात आला आहे. प्लेटोच्या उत्तुंग मानससरोवरात डुंबत डुंबत, त्याच्या तत्त्वशास्त्राशी पुन: पुन: समरस होऊन प्रो.जोगळेकर यांनी आपला अनुवाद प्रकट केला आहे. कित्येक मराठी शब्दांच्या अर्थप्रापकतेविषयी त्यांनी माझ्याशी केलेले प्रदीर्घ वादप्रवाद स्मृतींतून अद्यापीही ओघळले नाहीत. तत्त्वज्ञानाच्या आवडीने प्रो.जोगळेकरांचे अंत:करण, सामान्यत: गेली पंधरा वर्षे प्लेटोच्या वाङ्मयवाटिकेत रमून राहिले आहे. तेथील मनोज्ञ पुष्पांचे गंधगर्भ लुटणे, लुटविणे हा प्रो.जोगळेकरांच्या बुद्धीचा कित्येक वर्षांचा सहजसिद्ध लीलाविलास आहे ते स्वभावत: कठोर सत्यनिष्ठेचे, चिकित्सक वृत्तीचे समीक्षक, टीकाकार आहेत. या मनोरचनेच्या वैशिष्ट्याचा परिणाम त्यांच्या या लाडक्या कलाकृतीवरही झाल्याशिवाय राहिला नाही. त्यांच्या अनुवादात प्रसादापेक्षा अर्थनिष्ठा अधिक आहे - कल्पकतेपेक्षा प्रामाण्यावर, सजावटीपेक्षा सत्यावर व शब्दसमारंभापेक्षा वस्तुदर्शनावर अधिक भर आहे आणि अनुवादात ही प्रवृत्ति गुणस्थान आहे - वैगुण्य नव्हे हे काय सांगितले पाहिजे?
प्रो.वामन मल्हारांचे प्लेटोचे भाषान्तर (सॉक्रेटिसाचे संवाद) वाचताना वाचकाला बौद्धिक जाग येते. प्लेटोने उपस्थित केलेली प्रमेये वाचकाच्या विचारशक्तीला, संत्रस्त सैतानाप्रमाणे भंडावून सोडतात. त्याच्या बौद्धिक स्तब्धतेस जोराचा धक्का देऊन त्याला वेडापिसा करतात. रिपब्लिक सारख्या बुद्धीप्रधान ग्रंथाला तरी हीच प्रतिक्रिया इष्ट व आवश्यक आहे आणि ती निष्पन्न करण्याचे सामर्थ्य प्रो.जोगळेकरांच्या अनुवादात स्पष्ट असल्यामुळे त्यांचे अंगीकृत कार्य स्पृहणीय यशस्वीतेने पार पडले आहे. याबद्दल त्यांचे स्नेहस्निग्ध अभिनंदन करून हा पुरस्कार पूर्ण करतो.
- धुं. गो. विनोद

ॐ ॐ ॐ

Facebook page

We have a page on facebook "Maharshi Vinod Publications.
You can join us.

श्रीगुरुपादुकोदयस्तोत्रम्


आज मुहूर्तवूं या एक नित्योत्सव।
अद्वैत आमोदें, जेणे फुलेल हें विश्व।
क्षणोक्षण प्रभातेल नवोनव महापर्व।
प्रसादचिन्ह श्री-श्री-श्रीविद्येचें।।१।।

परा, परापरा, अपरा।
श्रीगुरूपुजा ही त्रिशिरा।
विमर्शा माऊलीची ही स्तनदुग्धधारा।
ओष्ठविण्याचा समय हा।।२।।

‘अपरा’ आराधनेंत भेद-ग्रह-स्थिती।
‘परापरा’ अवस्थेंत भेद-अग्रह-वृत्ती।
‘परा’ अवस्थानांत अभेद-स्फूर्ती।
श्रीगुरूपुजेची पादुका ही।।३।।

आदिभान हें परात्परगुरुबीज।
विमर्शशक्ती श्रीशिवा गुरूविद्येची गुह्यशेज।
जीवूजीवूचा पहिला परिव्राज।
गुरूपादुकेचें आलोचन ।।४।।

एक उफराटे अ-कुल ब्रह्मपद्म।
तेथ निष्कलेचे निजशक्तीधाम।
निर्झरले व्यापिनीचे श्यामव्योम।
अमृतमेघ वोसंडला।।५।।

चतुष्कोणी देवतात्म्यांचे उगमस्थान।
बिंदुस्थली अमृतसिद्धीचें अनुभावन।
यथाक्रम आंतर अनुभवांचें अनुस्थापन।
श्रीगुरूविद्येचा सहजाचार हा।।६।।

‘विमर्श’ म्हणजे आदिभानस्थित चित्शक्ती।
पादुकोदय म्हणजे शिवशिवेची साम्यरसस्थिती।
गुरूकृपयैव या भाग्यश्रीची समवाप्ती।
‘गुरूकृपा’ ये नामें जीवू जीवूचें निरवस्थान।।७।।

‘चार’ म्हणजे सोपचार आराधन।
‘राव’ म्हणजे विमर्शशक्तीचें उपयोजन।
‘चरू’ म्हणजे द्रव्यगुणांचे संयोगीकरण।
‘मुद्रा’ या नांवे प्रतीकाचा प्रत्यंगभाव।।८।।

चित्गगन-चंद्रिकेची फेसाळली जान्हवी।
श्रीगुरूकृपेची वेल्हाळली की पान्हवी।
प्रकटली वा नीलाब्जाची श्रीसुषमा अभिनवी।
श्रीपादुकोदय स्तोत्र हें ।।९।।

श्रीनवशुक्तिकांचा सम्यक् समुल्लेख।
येथ दशोपनिषद्रहस्याचे महावार्तिक।
आदिकृपेचा जणुं संतताभिषेक।
श्रीगुरूपादुकोदयस्तोत्रम्।।१०।।

।।इति श्री गुरूपादुकोदय स्तोत्रम्।।
------------------------------

You may keep up to date with our updates by subscribing to RSS feed of this website. RSS Feed is available at www.maharshivinod.org/rss.xml