You are hereघरचा ज्योतिषी / घरचा ज्योतिषी

घरचा ज्योतिषी


पुस्तकाचे नाव: घरचा ज्योतिषी
लेखक: प्रो. कृष्णराव गोपाळ टोपीकर
प्रस्तावना: प्रो. न्यायरत्न धुं.गो. विनोद, एम्.ए., दर्शनालंकार)

सर ऐझाक न्यूटनच्या फलज्योतिष शास्त्रावरील गाढ श्रद्धेची हॅले नावाच्या एका खगोलशास्त्रज्ञाने एकदा सहज थट्टा केली होती. तेव्हा सर ऐझाकने त्याला उत्तर दिले, “हॅले, मी फलज्योतिषाचा अभ्यासक आहे. वस्तुत: मला त्या विषयाचा गंध नाही. आकाशस्य तेजोगोल आणि पृथ्वीवरील मानवी व मानवेतवर जीवन यामध्ये एक प्रकारची संगति (Harmony) आहे, याचा मला अचूक पडताळा आला व म्हणून अनिच्छया मला फलज्योतिषावर श्रद्धा ठेवणे प्राप्त झाले.” (compelled by my unwilling belief) न्यूटनसारख्या महान शास्त्रज्ञाने ज्या फलज्योतिषाचा सर्वांगीण अभ्यास करून त्याच्या उपयुक्ततेबद्दल ग्वाही दिली आहे त्याविषयीची अल्पज्ञ व अहंमन्य संशयात्म्यांनी उपेक्षा व अवहेलना करणे सर्वथैव गर्हणीय आहे.
आर्य संस्कृतीत, भारतीय परंपरेमध्ये फलज्योतिषाला महनीय स्थान आहे. स्व-ज्योतिष व फलज्योतिष या दोन्ही शास्त्रांचा जन्म आर्यांच्या यज्ञसंस्थेत आहे. यज्ञकालाच्या निश्चितीसाठी ही दोन्ही शास्त्रे उदित झाली. ग्रहगति व फलसिद्धी यामध्ये निसर्गसिद्ध संगति आहे. असा आर्यांचा विश्वास होता. सध्याच्या राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या युगात ज्योतिष, मंत्रशास्त्र व तंत्रशास्त्र या व तत्सम अति-भौतिक शास्त्रांचा अभ्यास आधुनिक प्रयोगप्रधान पद्धतीने होणे अवश्य आहे.
अथर्व-वेदात सांगितलेली नाक्षत्रपद्धती ही फलज्योतिषाचे उगमस्थान होय. नाक्षत्र-गोचरी, राशी गोचरी, ताजिक व त्याचप्रमाणे जर्मनी आणि अमेरिका या देशात अलिकडे प्रसृत झालेली डिरेक्शनल पद्धती या सर्वांचे अधिष्ठान आथर्वण ‘नाक्षत्र’ पद्धतीत आहे. हे तौलनिक पद्धतीच्या अभ्यासकांना सहज पटेल.
अथर्व वेदाचा काल निदान इ.स.पूर्वी सुमारे सात हजार वर्षांचा असलाच पाहिजे असा लोकमान्य टिळकांचा सिद्धांत आहे. इजिप्त व खाल्डिया या देशातील फलज्योतिषशास्त्राचा उगम इ.स.आठशेपूर्वी निश्चित जाऊ शकत नाही. इ.स.पूर्वी ३२७ साली अलेक्झांडरची स्वारी हिंदुस्थानवर झाली व तेव्हापासून ग्रीक व भारतीय संस्कृतीचा संघर्ष सुरू झाला. ग्रीक लोकांनी भारतीय संस्कृतीने निर्मिलेल्या अनेक शास्त्रे आत्मसात केली व वराहमिहिराने म्हटल्याप्रमाणे ग्रीक व इतर राष्ट्रांतून भारतीय विद्वानांनीही अनेक शास्त्रीय सिद्धांतांचा व पद्धतींचा परिचय करून घेतला. पण भारतवर्ष हेच सर्व विद्याचे मूल जन्मस्थान होय. हे सत्य आता सामान्यपणे विवादातीत झाले आहे.
फर्मिकस मॅटर्नस (इ.स. ३३० ते ३५४) व टॉलेमी (Ptolemy - ट्रेटाबिब्लास Tetrabiblos या प्रसिद्ध ग्रंथाचा लेखक - इ.स. १५०) या परकीय ज्योतिर्विदांच्या दोन नावाखेरीज प्राचीन पाश्चिमात्य इतिहासात तिसरे नाव घेण्याची शक्यता दिसत नाही.
पराशर, जैमिनी व वराहमिहीर ही त्रयी म्हणजे भारतीय फलज्योतिषाचे ब्रह्मा, विष्णू व महेश होत.
पराशराचे होराशास्त्र हा ज्योतिषाचा आधार ग्रंथ होय. पराशर हा ज्योतिर्विदांचा आद्य पिता आहे.
पराशराला Curvature theory of space माहीत होती. ग्रहांच्या व नक्षत्रांच्या गति, त्यांचे पृथ्वीवरील जीवनावर होणारे परिणाम व प्रतिक्रिया याविषयी पराशराने प्रस्थापिलेले सिद्धांत व बांधलेली अनुमाने इतकी अचूक व संग्राहक आहेत की, हा महर्षि त्रिकालज्ञ असला पाहिजे असा विश्वास वाटू लागतो.
जैमिनी हा असाच महान ज्योतिर्विद झाला. त्याचे सिद्धांत इतके मूलगामी आहेत की, त्यांचा स्थूलत:देखील परिचय करून देणे सर्वथैव अशक्य आहे.
वराहमिहिर पहिल्या इ.स. शतकात झाला असावा. पाश्चात्य पंडित त्याचा काल चवथ्या किंवा पाचव्या शतकात लोटतात. या विद्वत्श्रेष्ठाचे ज्योतिषविषयक कार्य इतके भव्य व व्यापक आहे की, त्याच्यानंतर त्या शास्त्रात फारच थोडी प्रगति झालेली दिसते.
वराहमिहिराने ‘पंच सिद्धान्त’ नावाच्या आपल्या ग्रंथात गुरुत्वाकर्षणाच्या नियमाचा निर्देश केला आहे. खगोल ज्योतिषाचे त्याचे ज्ञान अत्यंत गाढ व विस्तृत कक्षेचे होते. अनेक आधुनिक शोधांची पूर्व स्वरूपे त्याच्या प्रतिभेने न्याहळली होती.
वराहमिहिराची प्रतिभा इतकी सर्वंकष आहे की, हल्ली चर्चाविषय असलेल्या Inflation Problem वर, वस्तूंच्या किंमती का व कशा वाढतात अथवा कमी होतात याबद्दलही, त्याने स्वत:चे सिद्धांत बसविले होते. National Economy - राष्ट्रीय अर्थकारण, राष्ट्रीय पुनर्रचना या विषयांचा त्याने विचार केला असून, खगोल व फलज्योतिष या शास्त्राचा सूक्ष्म अभ्यास केल्याशिवाय व समन्वय साधल्याशिवाय राष्ट्रीय पुनरवस्थापना अशक्य आहे अशी त्याची श्रद्धा होती.
वराहमिहिराचे निवासस्थान अवन्ती होते. कपिश्यक याक्षेनी त्याने सूर्योपासना केली व साक्षात् सूर्यनारायणाच्या किरणांचे उपयोजन करून त्याने विश्व न्याहाळले व आकाशस्थ गोलाच्या गति व परिणाम निश्चित केले अशी नवलकथा उपलब्ध आहे.
कल्याण वर्मा या राजाधिराजाने वराहमिहिराच्या बृहत्जातकावर एक भाष्य लिहिले आहे. म्हैसूरच्या राजवाड्यातील हस्तलिखितांच्या संग्रहालयात हे भाष्य मला. इ.स. १९२९ च्या डिसेंबर महिन्यात पहावयास मिळाले. या भाष्याचे नाव ‘सारावली’ असे आहे. अगदी अलीकडे ते छापून प्रसिद्धही झाले आहे.
या लहानशा पण उपयुक्त पुस्तिकेचे लेखक श्री.टोपीकर हे ज्योतिषशास्त्राचे एक तळमळीचे उपासक आहेत. शास्त्राच्या अभ्यासाला, शक्य तर प्रत्येक कुटुंबात उत्तेजन मिळावे. या स्तुत्य हेतूने त्यांनी हे पुस्तक सिद्ध केले व श्री.विनायकराव चव्हाण यांनी प्रसिद्ध केले. ‘घरचा ज्योतिषी’ हे नावच वरील हेतू प्रकट करते.
श्री.टोपीकर यांनी फलज्योतिषाचा प्रदीर्घ व्यासंग केला आहे. हे त्यांचे पुस्तक उत्कृष्ट वठले आहे. फलज्योतिषावर इतके सुलभ व जिज्ञासूंना उपयुक्त असे दुसरे पुस्तक क्वचितच आढळेल. भविष्यकथनाची त्यांची एक स्वतंत्र पद्धती आहे. कुंडलीचा शास्त्रीयदृष्ट्या सु-सूक्ष्म अभ्यास ते करतात व नंतर एकदम स्फूर्तिद्वारे आपला अभिप्राय व्यक्त करतात. शास्त्र व स्फूर्ति या दोन्ही पंखांनी ते गति घेतात व त्यामुळे त्यांना भविष्यकाळाच्या विशाल वितानात स्वैर संचार करता येतो. ज्योतिषशास्त्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी प्रत्येक अभ्यासकास माहीत होणे आवश्य आहे म्हणून मी वरील प्रस्ताव केला आहे.
- धुं. गो. विनोद

ॐ ॐ ॐ

Facebook page

We have a page on facebook "Maharshi Vinod Publications.
You can join us.

श्रीगुरुपादुकोदयस्तोत्रम्


आज मुहूर्तवूं या एक नित्योत्सव।
अद्वैत आमोदें, जेणे फुलेल हें विश्व।
क्षणोक्षण प्रभातेल नवोनव महापर्व।
प्रसादचिन्ह श्री-श्री-श्रीविद्येचें।।१।।

परा, परापरा, अपरा।
श्रीगुरूपुजा ही त्रिशिरा।
विमर्शा माऊलीची ही स्तनदुग्धधारा।
ओष्ठविण्याचा समय हा।।२।।

‘अपरा’ आराधनेंत भेद-ग्रह-स्थिती।
‘परापरा’ अवस्थेंत भेद-अग्रह-वृत्ती।
‘परा’ अवस्थानांत अभेद-स्फूर्ती।
श्रीगुरूपुजेची पादुका ही।।३।।

आदिभान हें परात्परगुरुबीज।
विमर्शशक्ती श्रीशिवा गुरूविद्येची गुह्यशेज।
जीवूजीवूचा पहिला परिव्राज।
गुरूपादुकेचें आलोचन ।।४।।

एक उफराटे अ-कुल ब्रह्मपद्म।
तेथ निष्कलेचे निजशक्तीधाम।
निर्झरले व्यापिनीचे श्यामव्योम।
अमृतमेघ वोसंडला।।५।।

चतुष्कोणी देवतात्म्यांचे उगमस्थान।
बिंदुस्थली अमृतसिद्धीचें अनुभावन।
यथाक्रम आंतर अनुभवांचें अनुस्थापन।
श्रीगुरूविद्येचा सहजाचार हा।।६।।

‘विमर्श’ म्हणजे आदिभानस्थित चित्शक्ती।
पादुकोदय म्हणजे शिवशिवेची साम्यरसस्थिती।
गुरूकृपयैव या भाग्यश्रीची समवाप्ती।
‘गुरूकृपा’ ये नामें जीवू जीवूचें निरवस्थान।।७।।

‘चार’ म्हणजे सोपचार आराधन।
‘राव’ म्हणजे विमर्शशक्तीचें उपयोजन।
‘चरू’ म्हणजे द्रव्यगुणांचे संयोगीकरण।
‘मुद्रा’ या नांवे प्रतीकाचा प्रत्यंगभाव।।८।।

चित्गगन-चंद्रिकेची फेसाळली जान्हवी।
श्रीगुरूकृपेची वेल्हाळली की पान्हवी।
प्रकटली वा नीलाब्जाची श्रीसुषमा अभिनवी।
श्रीपादुकोदय स्तोत्र हें ।।९।।

श्रीनवशुक्तिकांचा सम्यक् समुल्लेख।
येथ दशोपनिषद्रहस्याचे महावार्तिक।
आदिकृपेचा जणुं संतताभिषेक।
श्रीगुरूपादुकोदयस्तोत्रम्।।१०।।

।।इति श्री गुरूपादुकोदय स्तोत्रम्।।
------------------------------

You may keep up to date with our updates by subscribing to RSS feed of this website. RSS Feed is available at www.maharshivinod.org/rss.xml