अभंग

पाकळयांचे ओझें कशाला हे व्हावें। सौरभे हिंडावे - स्वयंसिद्ध।

होई ना कां माझा देह भस्मीभूत।

जरी आत्म ज्योत - चिर स्थायि ॥

पाकळयांचे ओझें कशाला हे व्हावें।

सौरभे हिंडावे - स्वयंसिद्ध ॥३२॥

 

तेजाळ विश्व हे भोवताली होतां।

उघडिते ही लता पुष्पनेत्र॥

तुझ्या शेजाराचीं मनीं येता दीिप्त्।

अशी गीत - स्फूर्ति - फुले माझी ॥३३॥

 

झळके स्मित प्रभा तशी ती लाजरी ।

लाज कां हासरी - कसें सांगू ॥

स्मितांचें लज्जेचें मधुर हें मीलन।

पाहतांच मनन बंद होई ॥३४॥

 

सदा व्हावा प्राप्त् वनामधला वास।

मनामधला भास-खरा व्हावा ॥

जगाच्या बाजारी-करोनी हिंडन।

अंतरींचें स्वप्न-कसे मोडूं ॥३५॥

 

चकचकाट झाला मेघ पटला वरतीं।

तोच आली भरती -तुझ्या हास्य ॥

होतीस पूर्वी कां उदासीन इतुकी।

शीण गेला कसा एका एकी ॥३६॥

 

इच्छांच्या कांष्टांनी नुकत्याच मेलेल्या।

पेट अंत:करणीं-घेतला हा ॥

त्याच जाळा मध्ये-जळ ना कां देव।

नुरे देव-घेव-आता त्याशी ॥

एक इच्छा हीच तया भेटण्यांची।

जन्म जन्मीं साची मनीं होती ॥

तीही आतां नुरो-पुरे तसलें वेड।

नको भाडभीड-कुणाची हो ॥३७॥

 

करीतात आशा सदा लंगडधीन ।

पाउले पुढें न-परी त्यांची ॥

जागच्या जागींच वरी खालीं पाय।

करुनीया काय-प्राप्त होई ॥

सांत तेचे माझ्या इवलेसे अंगण।

तेथे लंगडधीन असें चाले ॥३८॥

 

ओठांचे किसलय शब्द पवनें हाले।

गाल हे रागेले-क्रोध योगें, आसवांनी॥

रागांत अनुराग, वियोगामध्ये योग मिळे मजला

त्यागांत उपभोग-होई सिद्ध, तिच्याभासे ॥

कित्येक जन्मांत भेटलों मीं नाही।

म्हणूनीच होई-सखी क्रुद्ध ॥

कोपनेचे व्हावे सौंदर्य दर्शन।

पुनर्जन्म मरण-सुखें यावे ॥३९॥

 

ऐकतां ऐकतां असे सलिलोग्दार।

जीव हें शरीर सोडुं पाहे॥

निर्झराचे चाले गीत जें हें येथे।

चित्त भग्न होतें त्यामुळेंच ॥

ठेविली उत्संगी तुझी केव्हा मान।

तयाचे सं स्मरण नुरे मजला ॥

पुनर्जन्मीं सुद्धा असाच राहुं दे।

या क्षणी जाउदे-जीव माझा ॥४०॥

 

चित्त माझे हेंच-तुझें क्रीडाशैल।

येथ तूं फिरशील-चिरंतन॥

नको तू फिरशील-चिरंतन नको टाकूं दृष्टि स्वैर इकडे तिकडे ।

पाऊल वाकडे पडायाचे ॥४१॥

 

अभंगांचा माझा चढूनी सोपान।

तुझे वंद्य चरण-आले चित्ती ह्या ॥

तेथ झाला त्यांचा जरी स्थायी भाव ।

करीन वर्षाव-सुखाश्रूंचा ॥

शरीर नी आत्मा-होऊनी या नष्ट।

चित्त हे अवशिष्ट सदा राहो ॥

जयांत अवतरे तुझी असली मूर्ती ।

आणि इच्छा पूर्ति-होत माझी ॥४२॥

 

सत्य तर्कज्ञेय देव बुद्धि ध्येय।

भाव शब्दाख्येय कसा व्हावा ॥

प्रेम हें अचिंत्य-सौदर्य अदृश्य।

हृदय हें अस्पृश्य-अलिंगनीं ॥

संगीत नि:शब्द, सौंदर्य अदृश्य।

प्रेम हे अवश्य-अकारण ॥४३॥

 

पाथेय गीतांचे सवें घेऊनी या ।

मार्ग चालावया लागलो की ॥

परी हे वाढतें गीतांचे वैभव।

आणि आत्म-देव-अ-संतुष्ट ॥

संपेल जेव्हा तेव्हाच प्राण ।

पावती निर्वाण-शान्तिब्रह्म ॥४४॥

 

तुझा उष्णोच्छ्वास जर जवळी येतां ।

जाई निश्चेष्टता-अशी दूर ॥

प्रीतिने फुलेलें दगडाचें हृदय हें।

गीत गंध वाहे तयांतुनी ॥

तुझा श्वास लोभे त्याच गंधावरी ।

म्हणूनी अंतरी पुन्हा वससी ॥४५॥

५-११-५८

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

Dr. Samprasad Vinod - 09373686537

Dr. Mrs. Rujuta Vinod - 09371934520

Copyright 2019. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search