अभंग

ममत्व एवढे मला कां देहाचें। नातें न कायमचें - शरीराशी।

वेज करितां - होती मौक्तिक उपयुक्त।

काजळा दे ज्योत - दिव्याची ह्या ॥

चंद्रकोर होई कलंकें मोहक।

दु:ख योगे सुख - दुणावते ॥

देहभावे येई आत्म्यास श्रेष्ठता।

जीवना मर्त्यता - देई शोभा ॥७२॥

 

रांग ही तार्‍यांची खावया बैसली।

निशा भातूकली खेळु लागे ॥

चद्रिकेचें पेय पडता पानावरी।

तारा तारा करी पान त्यानें? ॥७३॥

 

नको इकडे पाहूं नको मजला ध्याऊं ।

नको गीत गाऊ सये असले॥

प्रीतिच्या भावांनी रसरसे तो नयन ।

तया माझे मन नसे योग्य ॥

निष्प्रेम, जीव हा - तयाला प्रार्थुनीं ।

व्यर्थ का जीवनीं - कष्टतेस ॥७४॥

 

हास तो हासूस (हासून?) अश्रु तो गाळून ।

प्रेम ते सांडून - दूरी टाक ॥

माझ्या मूर्तीवरी फुले ते सत्प्रेम वाहून ।

नको अंत:करण कष्टवू तें ॥७५॥

 

हात हा ओठांशी हळूच नेऊनी।

तयाला शिकवुनी सांग कांही चुंबुनी ॥

पुन्हा माझ्या हृदयी येतांच या जीव।

तुझ्या प्रेम भावा सांगु दे त्या ॥७६॥

 

शिरास स्कंधी या हळूच ठेवूनीं।

भिजव त्या अश्रूंनी - सखे आज ॥

संसार ओझ्याने - कष्टला तापला।

अश्रुच्या त्या जला - सांड स्कंधी ॥७७॥

 

मला वाटले हें! जवळी तुझा ओंठ ।

येऊनीया भेट - अशी झाली ॥

तुलाही वाटले!! होऊनीया धीट ।

ओठ माझा निकट - तुझ्या आला ॥

खरे मी सांगु कां ओठ हे दोघांचे ।

सहज भेटायाचे नकळतांही ॥७८॥

 

नेत्र माझे दमले रडूं लागे भाला।

अश्रु बिंदु जाल दिसे येथें ॥

ऊर हा थांबला धड धडूनी आतां।

ऒठ हा बोलता असो झाला ॥७९॥

 

इवलाली लाट रही उठते अशी सलिली।

स्वप्न हास्य गालीं तुझ्या जैसें ॥

हळू हळू वाढे गती या जलाची।

स्फूर्ती ही गाण्याची - तशी माझी ॥८०॥

 

वार्‍याचें कर्ज जे, श्वासांनी घेतलें।

सव्याज तें दिले, उसाशांनी ॥

संख्येत वागलो, जीवनाचे कालीं।

शून्यता वरियेली, मृत्यूलोभें ॥

चामड्याचा लेप मांस रुधिराभंवती ।

देउनी हे घडती देह सारे ॥

ममत्व एवढे मला कां देहाचें।

नातें न कायमचें - शरीराशी॥८१॥

 

निसर्ग गीत जेथ तेथे नाचें।

त्यांत ह्या वाचेचे मिळो सूर ॥

अंतरात्मा माझा न राहो गीतांत।

विरुनी शुन्यांत जाणे तया ॥८२॥

 

अमावस्येचे ते, काळोख चोरुनी ।

मनाला चित्रूनी, काढिलें त्या ॥

एकली तिथी ती, मनाच्या महिन्यांत ।

चांदणे अज्ञात, सदा राहे ॥८३॥

 

निराश आत्म्यांनी सोडितांची प्राण।

हासती सैतान आनंदानें ॥

हंसे ते जमवूनी रंगली पौर्णिमा।

म्हणूनी ही सुषमा तेजहीन ॥८४॥

 

पावसाळया जवळी मागुनी या अश्रु।

तयांनी मीं गाळी सदा काळीं ऐसे ॥

उन्हाळयाचा ताप घेउनीया उसना।

दिला या जीवना सदा काळी ऐसा ॥८५॥

 

काळोख भोंवती, एकला हा सूर ।

चित्तांत काहूर, उठे ऐसें ॥

नभाच्या पोटांत, होतसे तो लुप्त ।

परि अंतरांत दुणावतो ॥८६॥

 

मरुनी जातीस (जातेस?) तरीच आनंद।

होउनीया छंद सुटे तुझा ॥

निसर्गात गेला मिळूनी तुझा आत्मा।

तयांस श्वासांनी अलिंगितो ॥८७॥

 

वृक्षशाखा इथल्या या वृक्षांच्या अलिंगया मला।

सिद्ध कां झाल्या या सर्व आज ॥

डोंगराचें कडे होउनीया उंच। (माझ्या मूर्तीकडे पाहती कां!)

असे माझ्याकडे पाहती का ॥८८॥

 

कावळयांची चाले स्मशानी ओरड ।

मनीं माझ्या रड आसूयांची ॥

आनंद पाहणे दुसऱ्याचिया गाली ।

हें न माझ्या भाली मुळी लिहिले ॥

कुणी केव्हा हसो - क्षुद्र माझे मन ।

होतसे विषण्ण - तयामुळे ॥८९॥

 

संख्या असो किती माय त्यांची ‘एक’।

पृथ्विचेच लेक प्रदेश हे ॥

तूं-मीं सारें जग एकाच शुन्याची ।

लेकरे कां साची - जन्मली ही ॥९०॥

 

माझी गुरे ढोरे अंतरींच्या वृत्ति।

तयांच्या मागुती फिरे आत्मा ॥

असा मी गोपाळ जन्मोजन्मीं फिरे ।

सदा तुला वाहे अनंतते ॥९१॥ (अनंततेच्या ग्रामी - वास माझा।)

 

शेकडों हे दगड तयामध्ये हिरा।

एक आहे खरा जातिवंत येथे ॥

तयांस पाहण्यास नेत्र ऐसे व्हावे।

(जयांना दिसावे हिरे सर्व)दगड ज्या दिसावे - हिरे जैसे ॥९२॥

 

मरुं द्या एकदां - आस आणि श्वास ।

चित्तास देहास साहवेना ॥

ज्ञात नाही झाला जीवनीचा हेतु।

देव तोही दिसला - बुद्धिनेत्रा ॥९३॥

 

शोक गंगा वाहे दु:खा रुपाने।

संशयाचा राहे हिमालय ॥

प्रतिच्या तापाने वितळेनि पर्वत।

येत ना नाचे ते हंसू कैसे? ॥९४॥

१८-९-५८

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

Dr. Samprasad Vinod - 09373686537

Dr. Mrs. Rujuta Vinod - 09371934520

Copyright 2019. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search