अभंग

चित्त ते पिशाच तुझें झालें। जुन्या आणा सार्‍या विसरूनी गेलीस।..

कां त्यांनीं माजले रान पायाखालीं ।

पाऊस भंवतालीं शिलांचा या ॥

वरी असले ऊन वारा असा उष्ण ।

म्हणूनी तो प्रश्न तुला केला ॥

शिरीं या बसतीस जरी काही वेळ ।

अशी कष्टतीस - कशाला ग ॥६७॥

 

वाग जैसे तुला भावेल तैसेच।

चित्त ते पिशाच तुझें झालें ॥

जुन्या आणा सार्‍या विसरूनी गेलीस।

मला सोडिलेस याच जन्मी ॥६८॥

 

प्रेमलेचा जेव्हा हात हृदयी आला।

तेव्हा जणू झाला जन्म माझा ॥

जगाची श्वासाची सत्यता भासाया।

लागली जीवा या (देहा या) - तत्क्षणींच ॥६९॥

 

गळया भोवतीं पडतां मिठी ती भीतीची।

होते से प्रीतीची - पुरी साक्ष ॥

केवळ प्रेमाचे हात ते लाजुनी।

असे आलिंगनीं - झोंबती न ॥७०॥

 

पहिल्याच भेटीला मला आली शंका।

असें हे होणें का शक्य वाटे ॥

फसवणूक हो ती - माझी सारी असें।

या जन्मि होतसे पुरें ज्ञान ॥७१॥

 

बोललो जें होतो तया आठवूनी।

व्यर्थ कां तूं मनी - कष्टतेस ॥

वाग्बाण तीक्ष्ण तो - जरी होता तेव्हा।

हे तु माझा घ्यावा अंतरांत ॥

प्रेम भावाची ती अपूर्णता आली ।

मनी - म्हणूनी झालीं तशी चूक!!! ॥७२॥

 

सये अनंतते मला तू ध्यावेस।

एक हीच आस मनीं माज्या ॥

शब्द शब्दास त्या - नेत्र किंवा नेत्रीं।

गात्र आणि गात्री मिळो वा न ॥७३॥

 

मृत्यूची पासोडी जीवनाचे तोंडी।

टाकुनी या उघडी - नेत्र माझे ॥

वस्त्र येता आड चामड्याची दृष्टी।

पहावया सृष्टि - अंध होई ॥७४॥

 

जीव चक्षू पुढें मृत्यूचे पटल हें ।

अमृतत्वा खडे करीतसे ॥

काळिमा ही येई ज्वाळेच्या शेवटीं ।

आणि दिवसाकांठीं - रात्र काळी ॥

प्रेमाच्या नंतर - निराशा ही सहन ।

जीविताचे घरी - मृत्यूदेवी ॥७५॥

 

पहावया सृष्टि - अंध होई।

तुझे ते दगडाचे सहज झाले चित्त।

मूर्तिला चिंतित अशा माझ्या ॥

मीच आहे असला हृदय हीन देह।

तयाला तो कुठला - प्रेम भाव ॥७६॥

 

दोघांनी शंकिले तेंच खरे झाले।

एकमेकां नुरे आता मोह ॥

तुझ्या तूं मार्गाने जावे सुखें स्वैर।

माझाहि आचार बंधहीन ॥

चौर्‍यांशी का? अनन्त जन्मांना।

घेऊनी मी मना शांतवीन ॥

नको असले वेड परी अनंतते।

करूं परत फेड (भावनांची) जिवांची या ॥७७॥

 

वैभवाचे झूल घालूनीया जीवना।

व्यर्थ कां यातना घेतल्या या ॥

पाषाण कोरूनी - मूर्ती झाली रम्य।

परी न श्वासांनी - हालणें ती ॥

तसेंच हें झालें - आत्मा न आनंदी।

अशा वाघृ (बाह्य?) छंदी गुंतुनीया ॥७८॥

 

हळू हळू हाले झाडावरी पान ।

आणि सारे रान असें स्तब्ध ॥

वायुची लहर ती एकही फिरकेना ।

गति ही येईना एक चित्तीं ॥७९॥

 

तुझ्या पायावरी वाहुनी हा जीव ।

व्यर्थ मीं अंतरीं कष्टलो कां ॥

तुला त्याची होती मजहुनीही अधिक ।

इच्छाच ना चित्तीं मिळविण्याची ॥

उपकृती करी - देत घेंत प्रेमाच्या।

कोण कोणावरी कसे सांगू ॥८०॥

 

सखे, ये ना आतां स्मितें ती उधळीत ।

जीवास जाचीत नेत्र तेजें ॥

तशीच दूर तू - उभी राहे सदा।

मनाला सर्वदा मोहवीत ॥

एक एक स्पर्श सुखाचा तो होता ।

श्वास हारी हर्ष - व्हावयाचा ॥८१॥

१७-९-५८

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

Dr. Samprasad Vinod - 09373686537

Dr. Mrs. Rujuta Vinod - 09371934520

Copyright 2019. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search