पुस्तकाचे नाव: वृत्तिप्रभाकरप्रवेशिका
लेखक: श्री.प्र.स.सुबंध
(मूळ पुस्तक: वृत्तिप्रभाकर; लेखक: साधु श्री निश्चलदासजी)
प्रस्तावना: प्रो. धुं.गो.विनोद, एम्.ए. न्यायरत्न
-१-
दर्शने मननप्रधान आहेत. बौद्धिक, वैचारिक भूमिकेवरून श्रौत सिद्धांतांचे परीक्षण व समन्वय करणे हे दर्शनकारांचे ध्येय आहे. तत्त्वशास्त्र म्हणजे अनुभवाची संगति लावणारे शास्त्र, प्रत्यक्ष अनुभव नव्हे. श्रुति हा प्रत्यक्ष अनुभव आहे. दर्शन ही अनुभवाची मीमांसा आहे. `मीमांसे'नेच दर्शनवाङ्मयाला प्रारंभ झाला. श्रुति हे मंत्रवाङ्मय आहे व दशने हे सूत्रवाङ्मय आहे. सूत्राची व्याख्या मध्व भाष्यात (१/११ प्रस्तावना पृ.१३) खालीलप्रमाणे केली आहे -
अल्पाक्षरमसंदिग्धम् सारवद्विश्वतो मुखम्
अस्तोभमनवद्यं च सूत्रं सूत्रविदो विदु:।
स्तोम म्हणजे अर्थशून्यो गानादिस्वरपरिपूरणार्थ: शब्दविशेष:।
सूत्रात अर्थशून्य अशी एक मात्राही आढळणार नाही, मग निरर्थक शब्द किंवा वाक्य याविषयी बोलणेच नको. अल्पाक्षरत्व, असंदिग्धता, सारग्रहण, विश्वतोमुखम् म्हणजे जातिवाचक अथवा सामान्य सिद्धांत सांगणे की ज्यांचा विनियोग एकदेशीय नाही, अस्तोमत्व म्हणजे निरर्थक शब्दांचा अभाव व दोषराहित्य (अनवद्यत्व) अशी सूत्राची सहा लक्षणे मध्वाचार्य सांगतात. या सूत्रांचा उपयोग पूर्वाचार्य व्याख्यानांच्या टिप्पणीसारखा करीत. त्या आचार्यांना व त्यांच्या श्रोत्यांना, शिष्यांना जे अर्थ अभिप्रेत असतील तेच नंतरच्या टीकाकारांस उपलब्ध होणे अशक्य झाले. म्हणूनच ब्रह्मसूत्रावर सहा विविध भाष्ये होऊ शकली. असंदिग्धता हा दोष सूत्रवाङ्मयात कालप्रवाहाने निक्षिप्त केला आहे. रचनाकाली ही सूत्रे नि:संदिग्ध होती. किंवा असेही म्हणता येईल की `विश्वतोमुखत्व' हा गुण ब्रह्मसूत्रांत असल्यामुळे सहाच काय सहस्रावधी भाष्ये झाली तरी ती साहजिकच, आवश्यकच आहेत. विविध भाष्ये ही सूत्रांच्या असंदिग्धतेमुळे उत्पन्न झाली नसून त्यांच्या सर्वस्पर्शित्वामुळे निर्माण झाली आहेत. विविधार्थवत्ता हा गुणविशेष आहे, दोषस्थल नव्हे
-२-
दर्शनवाङ्मयाचा विकास शिष्यप्रशिषंच्या परंपरेने सिद्ध झाला आहे. मूल दर्शनसूत्रावर एक भाष्य, त्या भाष्यावर दुसरे, त्यावर तिसरे असा दर्शनसूत्रांचा जाह्नवी प्रवाह अविच्छिन्नपणे वृद्धिंगत झाला आहे. भारतीय तत्त्वज्ञ विद्याविनीत होते. प्रत्येक टीकाकाराची, भाष्यकाराची प्रतिमा स्वयंभू व स्वयंप्रभ असे; पण आपल्या स्वतंत्र व स्वयंप्रभ कृति ते आपल्या परंपरेला व आद्य प्रणेत्याला निवेदन करून आपल्या पूर्वाचार्यांची बिरुदे मिरवीत. स्वत: शंकराचार्य हे व्यासांचे भाष्यकारच आहेत; सुरेश्वर, मधुसूदन, प्रकाशानंद हे भाष्यकारांचे भाष्यकार! न्यायदर्शनाची ब्रह्मपुत्रा म्हणजे स्वतंत्र, स्वयंप्रभ विचारांच्या अनिरुद्ध प्रवाहाचे एक हृदयगंम दृश्य आहे. एकेका टीकाकाराची योग्यता जवळ जवळ आद्य प्रणेत्या इतकीच आहे पण प्रत्येकाने आपापल्या ऊर्जस्वल प्रतिभेच्या प्रभातरल ज्योतीची आरती श्री.गौतममुनींमुळे वितरली आहे. गौतमांच्या न्यायसूत्रावर प्रथम वात्स्यायनाने `भाष्य` लिहिले; त्यावर उद्योतकारांने `भाष्य वार्तिक` लिहिले, नंतर वाचस्पति मिश्राने `वार्तिक तात्पर्यटीका' लिहिली, पुन: उदयनाचार्याने वार्तिक तात्पर्य टीका-परिशुद्धी लिहिली. पुढे `प्रकाशा'वर `वर्धमानेंदु' ही टीका पद्मनाभ मिश्राने लिहिली व या ग्रंथावर `न्यायतात्पर्य मंडळ' हे भाष्य शंकर मिश्राने लिहिले. प्रत्येक टीकेवर प्रतिपक्षी यांकडून आक्षेप उत्पन्न होत व त्या आक्षेपांचे निरसन करण्याकरिता पुन: एकदा सांप्रदायिक मूल टीकेचा अभिप्राय विशद करण्याकरिता नवीन भाष्य लिही. वात्स्यायन भाष्याच्या दिङनागनामक बौद्ध तार्किकाने चिंधड्या उडविल्या व दिङनाथाला प्रत्युत्तर म्हणून उद्योतकारांनी आपले भाष्यवार्तिक लिहिले. प्रत्येक दर्शनाला असे उदंड प्रतिभेचे भाष्यकार लावले. इ.स. पूर्वी ५०० वर्षांपासून तो इ.स.नंतर ७०० वर्षांचा-बाराशे वर्षांचा काल, सूत्रवाङ्मयाने व टीकाग्रंथांनी समृद्ध आहे. ही दर्शनसरस्वती कधी अदृश्य झालेली दिसते. सरस्वति नदीचे पात्र कधी जमिनीखाली असते, पण काही अंतरावर पुन: दृश्यश्रेणीत येते - त्याचप्रमाणे, सतराव्या शतकापर्यंत ही दर्शनसरस्वति अव्याहत, अनिरुद्ध प्रवाहाने वाहत आली आहे.
३
`दर्शन' शब्दाचा तत्त्वज्ञान, यथार्थज्ञान, तत्त्वशास्त्र या अर्थी उपयोग प्रथम कणादाने केला. बौद्ध पीटकामध्ये (इ.स.पूर्वी ४०० वर्षे) `दिट्टी' किंवा `दृष्टी' ही संज्ञा बौद्धेतर तत्त्वपंथांना व मतांना देण्यात आली आहे. इ.स.च्या पाचव्या शतकात झालेल्या ‘हरिभद्राने’ दर्शन हा शब्द कणादांच्या अर्थाने उपयोजिला व तेव्हापासून तत्त्वज्ञानपद्धतीत हा दर्शन शब्दाचा अर्थ निश्चित झाला. दहाव्या शतकात ‘रत्नकीर्तीने’ ‘तत्त्वज्ञान-पद्धती’ या आजच्या अर्थाने दर्शन हा शब्द अनेक वेळा वापरला आहे. चौदाव्या शतकात माधवाचार्यांनी आपल्या तात्त्विक पद्धतींच्या संग्रहास ‘सर्वदर्शन संग्रह’ असे नाव दिले. दर्शन म्हणजे नझारा, देखावा. दर्शन हे वस्तुनिष्ठ असते, त्याचप्रमाणे व्यक्तिनिष्ठ असते. व्यक्तिनिष्ठेवर `दर्शनानुभवा'त अधिक भर असतो. ``Every System of thought is a perspective'', असे इटालियन तत्त्वज्ञ लीलिश म्हणतो. आत्मकेंद्रातच पर सत्याचा अनुभव यावयाचा असतो आणि यामुळे तत्त्वशास्त्राला दर्शन ही संज्ञा अत्यंत समर्पक आहे. दर्शन हा शब्द प्रथम योजूनही त्याद्वारे कणादांनी एकंदर तत्त्वशास्त्राचे रहस्यच प्रकट केले आहे. आस्तिक व नास्तिक असे दर्शनाचे दोन वर्ग आहेत.
द्वौ योगौ द्वेच मीमांसे द्वौ तर्कौ इति षट् बुधा:।
सांख्ययोग व पातंजलयोग, पूर्वमीमांसा व इतर मीमांसा (वेदांत) न्याय व वैशेषिक - अशी सहा `आस्तिक' दर्शने आहेत. चार्वाक, सौत्रांतिक, वैभाषिक, योगाचार, माध्यमिक व अर्हत ही सहा नास्तिक दर्शने आहेत.
४
पदार्थप्रतीती हे तत्त्वशास्त्रातले मध्यवर्ती प्रमेय आहे. `मला पदार्थाची प्रतीती झाली' या अनुभवाचे तीन घटक आहेत. मी, पदार्थ व प्रतीती ही त्रयी म्हणजे व्यक्ती, विश्व व विश्वेश्वर यामा महान त्रिपुटीचे व्यक्त स्वरूप, प्रत्यक्ष दर्शन होय. या त्रयीचा अर्थ समजला, या तीन वस्तूंच्या मूल स्वरूपाचा व परस्पर संबंधांचा उलगडा झाला की तत्त्वशास्त्राचे कार्य संपले. पाश्चिमात्य तत्त्वज्ञानात वस्तुज्ञानाची चिकित्सा अलीकडे सुरू झाली. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी sensa म्हणजे प्रमेय, किंवा ज्ञेय या पदाची चर्चा पाश्चिमात्य तत्त्वज्ञ करू लागले. ज्ञानाचा प्रत्यक्ष विषय असताना वस्तूला जो गुण प्राप्त होतो त्या गुणाला ज्ञेयत्व, प्रमेयत्व असे म्हणतात व त्या वस्तूला ज्ञेय किंवा प्रमेय म्हणतात. यालाच आधुनिक पाश्चात्य तत्त्वज्ञ sensa किंवा sense data असे म्हणतात. अगदी काल परवापर्यंत हा कूट प्रश्न पाश्चात्य तत्त्ववेत्यांना स्पष्टपणे सुचला देखील नव्हता, मग सुटला नव्हता हे सांगणे नकोच. भारतीय दर्शनकारांनी या प्रश्नाची सांगोपांग चर्चा किमान एक हजारवर्षांपूर्वीच केली आहे व ती इतकी अद्यायावत स्वरूपाची आहे की, तुलनात्मक दृष्टीच्या अभ्यासकाची वृत्ती स्थगितच होते. भारतीय दर्शनकारांनी तत्त्वशास्त्रांतले गर्भाकार कोणते ते हुडकले व यामुळे त्यांची दिशाभूल झाली नाही. पदार्थप्रतीतीचे स्वरूप समजल्यावर मानवी अनुभवाचा अंतिम अन्वयार्थ लावणे अगदी सोपे जाईल ही उपपत्ति भारतीय द्रष्टारांना दिसली व तिचा मागोवा घेत ते ब्रह्मानुभवाच्या, अमृतानुभवाच्या धवलगिरीवर विराजमान झाले.
५
प्लेटो, स्पेन्सर व क्रॅट यांच्या मते अंतिम वस्तूंचे, सत्याचे मूलस्वरूप आपणास कधीच समजत नाही. प्लेटोची Ideal World, क्रॅटची Thing in Itself व स्पेन्सरचे unknowable या तिन्ही कल्पना, अंतिम वस्तूचे खरे स्वरूप बुद्धीला कधीच समजत नाही, या सिद्धांतावर अधिष्ठित आहेत. हा त्यांचा सिद्धांत अंतिम वस्तूबद्दल आहे - सामान्य पदार्थज्ञानाची चिकित्सा त्यांनी सूक्ष्मपणे व शास्त्रीय दृष्टीने केलेली नाही व त्यांच्यावरील सिद्धांतास सामान्यज्ञानाच्या पृथ:करणाचे अधिष्ठान नाही. प्रथम सर्वसामान्य वस्तुप्रतीतीचे परिपूर्ण पृथक्करण केले पाहिजे व नंतर उपलब्ध सिद्धांताच्या आधारावर अंतिम वस्तूंविषयी अनुमान केले पाहिजे, अशी यथानुक्रम चिकित्सा पाश्चिमात्य तत्त्वज्ञांनी केली नाही. ज्ञानाच्या यथार्थतेची प्रमाणे प्रथम निश्चित केली पाहिजेत, तरच अंतिम वस्तूचे ज्ञान यथार्थ की अयथार्थ त्याचा निर्णय घेता येईल. यथार्थ ज्ञानाची कसोटी, निकषच आपणाजवळ नसेल तर भ्रम व प्रमा अथवा खरे ज्ञान, यातील भेद कळणार कसा? भारतीय दर्शनकारांच्या या शास्त्रशुद्ध भूमिकेबद्दल प्रो.मॅक्सम्युलरनेही धन्योद्गार काढले आहेत - Such an examination of the authorities of human knowledge (Pramanas) ought, of course, to form the introduction to every system of philosophy, and to have clearly seen this is, as it seems to me, a every high distinction of Indian philosophy. How much useless controversy would have been avoided, particularly among lewish, Mohammedan and Christian philosophers, if a proper place had been assigned in limine to the question of what constitutes our legitimate or our only possible channels of knowledge, whether perception, inference, revelation, or anything else! Supported by these inquiries into the evidences of truth, Hindu philosophers have built up their various systems to philosophy, or their conceptions of the world, telling us clearly what they take for granted and then advancing step by step, from the foundations to the highest pinnacles of their systems. प्रो. मॅक्सम्युलरने भारतीय दर्शनकारांचे वैशिष्ट्य वरील उताऱ्यात विशद केले आहे. प्रमाणचर्चा हा प्रत्येक तत्त्वपद्धतीचा पायाच आहे. प्रमाणचर्चेचे महत्त्व िख्र्चाश्न, महमदी व ज्यू तत्त्वज्ञांच्या लक्षात आले असते तर निष्फल वादविवादात व मतामतांतराच्या गलबल्यांत व्यर्थ शक्तिपात झाला नसता. प्रत्यक्ष, अनुमान, श्रुति इत्यादी ज्ञानसाधनांचे प्रामाण्य प्रथम परीक्षिले पाहिजे. हिंदुतत्त्वज्ञांनी आपल्या तत्त्वज्ञानाचा ताजमहाल शास्त्रपूत अधिष्ठानावर उभारला पाहिजे.
६
प्रमाणविचिकित्सा करण्यात अग्रपूजेचा मान न्यायदर्शनाचा आहे. न्यायदर्शनाला ‘प्रमाणशास्त्र’ असे उपनाव आहे. न्यायदर्शनात जगत्कारणांची व ज्ञानहेतूंची विशद चर्चा झाली असल्यामुळे त्याला ‘हेतुशास्त्र’ अशीही संज्ञा आहे. अविरत शोध करणे, अंतिम सत्याचा ‘अन्वेष’ करणे हे न्यायदर्शनाचे स्वीकृत कर्तव्य असल्यामुळे या दर्शनाला ‘आन्विक्षिकी विद्या’ असेही अभिधान आहे. भारतीय तत्त्वज्ञानाची विशिष्ट पद्धती ही बहुतांशी न्याय-सिद्ध आहे. ‘न्याय’ शब्दाचा निरुक्तार्थच - ‘यथाक्रम जाणे’ असा आहे. अध्यायभ्यायोद्यावसंहाराश्च - पाणिनी, अष्टाध्यायी ३, ३, १२२. न्यायदर्शन हे बुद्धिव्यापाराचे प्रमाणशास्त्र आहे. बुद्धी हे प्रामुख्याने संबंध दर्शविणारे इंद्रिय आहे. (संबंधावछिन्नप्रकारता निरुपितप्रकारितासमानाधिकरण गुणत्वव्याप्यजातिमत्वम् - अशी `लक्षणावली'मध्ये बुद्धीची व्याख्या केली आहे. त्याचप्रमाणे `करणजन्यत्वे सति करणजन्यफलजनकत्वम् व्यापार:’ - अशी व्यापार शब्दांची मीमांसा लौगाक्षिभास्कराने केली आहे. व्यापार म्हणजे योग्य साधनाचे साहाय्याने योग्य फलाची निर्मिती करणे. बुद्धीच्या व्यापाराने वस्तू-वस्तूंमधले संबंध जाणणे व निश्चित करणे ही न्यायदर्शनातली, प्रमाणशास्त्रातली आद्य क्रिया आहे. न्यायदर्शनात पद्धतीचे फार महत्त्व आहे. सिद्धांत कोणता आहे या प्रश्नापेक्षा सिद्धांताची प्रमाणे कोणती आहेत, तो कसा सिद्ध केला आहे ही गोष्ट नैय्यायिकांना अधिक महत्त्वाची वाटते. सर्व दर्शनकारांनी न्यायदर्शनाची पद्धती, प्रक्रिया आत्मसात केली आहे. आद्य शंकराचार्य, सुरेश्वर, मधुसूदन, प्रकाशानंद, चित्सुखाचार्य यांच्यासारख्या वेदांतदार्शनिकांनी आपले सर्व सिद्धांत न्यायघटित पद्धतीने विवेचिले आहेत. भारतीय संस्कृतीत वेदांत-दर्शनाला लाभलेला स्थायीभाव न्यायघटित प्रक्रियेने उपलब्ध केला आहे. न्यायदर्शनाने आपली प्रमाणपद्धती प्रचारून प्रत्येक दार्शनिकाला उपकृत केले आहे. पुरस्कृत पुस्तकाचे कर्ते साधु निश्चलदासजी हे उत्कृष्ट नैय्यायिक होते हे त्यांच्या विवेचनपद्धतीवरून सहज स्पष्ट होते. शांकर वेदान्ताची भूमिका त्यांनी आत्मीयत्वाने पुरस्कारिली असून न्यायदर्शनातील अनेक सिद्धांताचा त्यांनी तिरस्कार केला आहे पण हे करताना देखील न्यायपद्धतीचा अवलंब केल्यामुळे त्यांनी प्रतिपक्षाचा अभावितपणे ऋणनिर्देशच केला आहे.
७
वस्तुज्ञानाच्या अनुभवात स्थूलत: सहा प्रकारच्या घटना संभवतात. वस्तू असेल तशीच मनात किंवा बुद्धीत प्रतीत होणे - वस्तूचे प्रतिबिंब मनात पडणे. वस्तूचे मूळ स्वरूप आपणास न समजता ज्ञान काली तिचे काहीतरी रूपांतर होणे. पदार्थ ज्ञानाचे वेळी अविकृत राहून वस्तूंचे ज्ञानमात्र बुद्धीमध्ये आविस्कृत होणे. बुद्धीत कोणतीही विक्रिया न होता पदार्थाचे ज्ञान होणे. बुद्धीत प्रत्येक पदार्थ प्रतीतीचे वेळेस विशिष्ट विक्रिया, परिणाम निष्पन्न होणे. बुद्धी व पदार्थ दोन्हीही पदार्थप्रतीतीचे वेळेस विकृत होणे.
- धुं. गो. विनोद
ॐ ॐ ॐ