महर्षीची अर्धांगी मैत्रेयी

वेणू अभ्यंकर तथा मैत्रेयी विनोद

मैत्रेयी विनोदांच्या जीवनाचा आढावा:

मैत्रेयी विनोदांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यतच्या काळातील ठळक प्रसंगांचे वर्णन. जन्म : २ सप्टेंबर १९०८, निर्वाण : २७ जून १९८१, अवघे ७३ वर्षांचे आयुष्य. २००७-२००८ हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष.
त्यांच्याविषयी वाटणारे प्रेम-आदर-कृतज्ञता अशा प्रकारे व्यकत करण्याचा प्रयत्न.
Image
वेणू अभ्यंकर (पूर्वाश्रमीचे नाव):

मातृभकत,
पितृभकत,
श्री रामेश्वर भक्त,
आचार्य-शिक्षक यांची कृतज्ञ,
पुण्याच्या हुजुरपागेतील, प्रथम आलेल्या विद्यार्थिनींचा वारसा चालवायचा, या जिद्दीने अभ्यास करून, संपूर्ण मुंबई जिल्ह्यात "सर्वप्रथम" येण्याचा विक्रम केलेली षोडशा,
६-१० व्या वर्षी लग्न होण्याच्या काळामध्ये, संस्कृत घेऊन बी.ए., बी.टी., एम.ए.पर्यंत, हिमतीने शिकणारी कॉलेज युवती,
पुण्यात धाडसानं फर्ग्युसनपर्यंत सायकल चालवणारी पहिली युवती,
तरूण वयात वडिलांबरोबर चार धाम, बारा ज्योतिर्लिंग,सप्त मोक्षपुऱ्य़ा, प्रसिध्द कारखाने-खाणी पहाणारी ईश्वरनिष्ठ व जिज्ञासू,
भावंड-भाचरं यांच्यावर माया करणारी बहिण व आत्या-मावशी,
मैत्रिणींवर जीव लावणारी तरूणी,
भारताच्या उत्तरेकडील परमुलखामध्ये, सावधपणे राहून, आपला पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करणारी स्वावलंबी आत्मनिर्भर युवती,
परमुलखामध्ये आपले काम चोख करणारी शिक्षिका,
----------------------------------------
मैत्रेयी विनोद

२८ व्या वर्षी स्वतंत्रपणे मुंबईत न्यायरत्नांची भेट घेऊन, त्यांच्याशी साधक-बाधक चर्चा करून, शिवाय घरातल्या पोक्त माणसांचा सल्ला घेऊन, तिजवर असणाऱ्य़ा परंतु अतिशय बुध्दिमान व तत्वज्ञानी, संवदनशील, परा पातळीवर असणाऱ्या विद्वानाला आपले सर्वस्व देण्याचे धाडस करणारी प्रौढ वधू, आपल्याच माहेरच्या माडीवर, नोंदणी पध्दतीने सगोत्र विवाह करून, जमलेल्या विद्वान-संन्यासी-यशस्वीपणे संसार केलेल्या अनुभवी हितचिंतकांच्या साक्षीने, विनोदांची झालेली त्यांची गृहलक्ष्मी, सावत्र मतिमंद मुलावर प्रेमाची सावली धरणारी सहनशील व संयमी माता, विधवा वयस्कर नणदेला समंजसपणे व मानानं वागवणारी भावजय, गोवर्धन संस्थेच्या, गोवध-बंदीच्या राष्ट्रीय कार्याला वाहून घेतलेल्या, आपल्या जोडीदाराला, विविध प्रभावी राजकीय पुढाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी, देशभर प्रवास करायला, आनंदाने मोकळीक देणारी नवी नवरी.

सर्व घरकाम करणे, ६ मुलांना वाढवणे, शाळेत शिक्षिकेची नोकरी करणे, आपल्या पगारावर घर काटकसरीने चालवून, शिवाय शिल्लक बाजुला टाकणे, सर्व कुळधर्म-कुळाचार व अनेक व्रत-वैकल्य वेळच्या वेळी आणि अतिशय श्रध्देने करणारी सुपरवुमन, आपल्या मुलांचे सोळा संस्कार, पहिले सर्व सण- बोरनहाण, संक्रांत-हलव्याचे दागिने, फुलांची वाडी भरणं इ. हौशीनं करणारी माऊली, अडल्या-पडल्याला मदतीचा हात सहजतेने देणारी उदार गृहिणी,  ओळखीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी घर उपलब्ध करून देणारी उदारा, विश्व-शांति-दूत म्हणून, ६ महिन्यांसाठी गेलेल्या न्यायरत्नांना सर्व देशांना भेटी द्यायला व अतिंद्रिय शक्तींवर संशोधन करायला, ३ वर्षे लागली.

या कठीण काळात, आसपासच्या माणसांचे खरे रूप दिसल्यावर, न डगमगता आंतरिक सामर्थ्याच्या व ईश्वरनिष्ठेच्या पाठबळावर सर्व संसार करणारी धुरंधर, वडिलांच्या कडक शिस्तीत बालपण-तारूण्य घालविल्यानंतर, अतिशय मृदू अंतःकरणाच्या समंजस व परिपक्व न्यायी जोडीदाराच्या सहवासात, सर्वांगानं फुललेली विवाहिता, गोवर्धन महिला परिषद व पुना विमेन कौन्सिल या संस्थांमध्ये, आपले आजीवन योगदान दिलेली सामाजिक कार्यकर्ती, शिक्षणखात्यातील अधिकाऱ्याचा अन्याय, ही, अधिक चांगले काम करण्याची संधी मानणारी, धैर्यशाली शाळा-तपासणी-अधिकारी, रोज पहाटे उठून, नृसिंहाच्या देवळात, श्री. गणेशशास्त्री जोशींची ज्ञानेश्वरीवरील प्रवचने अभ्यासण्यासाठी जाणारी हरिभक्त, ट्रेनिंग कॉलेज फॉर विमेन मधून, प्रिन्सिपॉल म्हणून सेवा-निवृत्त झाल्यावर, पुणॆ बहिःशाल व्याख्यानमालेत, सर्व खानदेशभर, "गीतार्थ व गीता-तत्वज्ञान" या विषयावर प्रवचने करणारी व्याख्याती.

चाळीशी नंतर, आपल्या जोडीदाराला गुरूस्थानी मानणारी व त्याची सेवा करायला वेळ मिळत नाही आणि त्यांची अ-लौकिक प्रतिभा आपण समजू शकत नाही, म्हणून हुरहुरणारी, मुमुक्षू, पाचही मुलांना विविध क्षेत्रांत पदव्युत्तर शिक्षण देणारी सबल माता, पुण्यात, भली मोठी कार चालविणारी पहिली महिला, आपल्या लोक-विलक्षण पतीच्या आकस्मित निधनानंतर घायाळ झालेली शोकविव्हल पत्नी, आपल्या प्रेमळ जोडीदाराबरोबरचा आपला सहवास व संवाद अपुरा राहिल्याची खंत, शेवटपर्यंत बाळगणारी विरहिणी,  वाढत्या महागाईला, आपल्या तुटपुंज्या पेन्शनने कसे तोंड द्यावे, या विवंचनेत पडलेली व सायकलने जाणारी, वृध्दा, काही नास्तिक समाजकंटकांनी दुष्टबुध्दीने न्यायरत्नांच्या अतिंद्रिय शक्तीची केलेली विटंबना मुकाट्यानं सोसणारी क्षमाशील, पतिमागे, अमेरिकेतील दोन मुलगे व पुण्यातील दुसरी मुलगी यांचे विवाह पाहिलेली व नातवंडांत रमलेली आजी, न्यायरत्नांप्रमाणेच शक्य तेव्हढी पृथ्वी-प्रदक्षिणा केलेली पर्यटक, अखेरचे दिवस जवळ आल्यावर, मायदेशात देह ठेवण्यासाठी आलेली स्वदेशाभिमानी.

आपल्यासाठी कोणाला आर्थिक व देहाचे कष्ट होऊ नयेत म्हणून जपणारी, स्वावलंबी व स्वाभिमानी पेशंट, सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे मिळाले ती "ईश्वरकृपा", व त्याबद्दल कृतज्ञता बाळगणारी, आणि, जे सोसले ते, प्रारब्ध, असे मानणारी खरी गीताभ्यासू, अतिशय शांतपणे व समाधानाने, परमेश्वराचे नामस्मरण करीत, मृत्यूला सामोरं गेलेली, व, अवघ्या जन्माचे सोनं झालेली, भक्तियोगी.
वेणू अभ्यंकर

जन्म : २ सप्टेंबर १९०८


व्यक्तिमत्व 

अतिशय अभ्यासू, दांडगे वाचन असणारी, संस्कृत-इंग्रजी-हिंदी-उर्दू वर उत्तम प्रभुत्व असलेली, उच्चविद्याविभूषित, तरीही अतिशय साधी रहाणी असलेली

सर्वसाधारण वृत्ती

मोकळ्या मनाची, सरळ, नम्र, विनयी, निरलस, निगर्वी, सडेतोड, जिददी, मेहनती, स्वावलंबी, काटकसरी, स्वाभिमानी, प्रेमळ, देवभीरू, पापभीरू, कनवाळू, धार्मिक, कुटुंबवत्सल, हौशी, कृतज्ञ, दुस-यामधील गुण शोधणारी व स्वतःतील दोष हुडकून ते कमी करण्याचा प्रयत्न करणारी, ईश्वराला शरण जाणारी, गीता-ज्ञानेश्वरीतील तत्वज्ञानाचा रोजच्या जगण्यात अंतर्भाव करणारी.

व्यावसायिक गुण 

चोख, प्रामाणिक, विश्वासार्ह, बाणेदार, धाडसी, परखड, सचोटीची, कष्टाळू, इमानदार, अतिशय जबाबदारीने आणि आनंदाने काम करणारी
.....


न्यायरत्नांच्या पश्चात शांतिमंदिराची परंपरा कशी चालणार याबाबत मैत्रेयींना फार काळजी वाटत होती. १९७० मध्ये "महर्षि विनोद सिद्धाश्रम सेवा मंडळाची" स्थापना झाली होती. व्यास पूजा महोत्सव, दत्तजयंतीचा उत्सव, विवेकानंद जयंती उत्सव, बुद्ध जयंती व शंकराचार्य पुण्यतिथीचा उत्सव असे चार कार्यक्रम वर्षात मोठ्या उत्साहाने करण्याची वर्षानुवर्षांची परंपरा होती. व्यास पूजा महोत्सवाने पुण्यात एक व्यासपीठ निर्माण केले होते. त्याला स्वतंत्र दर्जा प्राप्त झाला होता.त्या पद्धतीने तो कार्यक्रम पार पाडण्याची फारच मोठी जबाबदारी मैत्रेयीबाईंवर होती. न्यायरत्नांच्या निर्वाणानंतर पंधराच दिवसांनी व्यासपूजामहोत्सव आला. न्यायरत्नांच्या शिष्यवर्गाने ह्या उत्सवात मनापासून भाग घेतला होता. न्यायरत्नांच्या मुंबईच्या भक्तांनी मोठमोठे कार्यक्रम केले. न्यायरत्नांच्या नावाने प्राथमिक शाळा सुरू करण्याच्या उद्देशाने त्यांच्या जन्मगावी (केतकीचा मळा, ता.अलिबाग)’महर्षि विनोद प्राथमिक विद्यामंदिर’ या नावाने शाळा सुरू केली. शांतिमंदिर न्यायरत्नांच्या वास्तव्याने पवित्र झालेले होते परंतु त्यांचे एखादे तैलचित्र असावे अशी मैत्रेयीबाईंची इच्छा होती. त्यांनी श्री. डी.डी.रेगे यांना विनंती केली. डी.डी.रेगे यांना न्यायरत्नांबद्दल अत्यंत आदर होता. त्यांनी अत्यंत अल्प मानधनात न्यायरत्नांचे एक पूर्णाकृती पण बसलेले तैलचित्र काढले.तेच तैलचित्र मैत्रेयीबाईंनी न्यायरत्नांच्या पलंगावर ठेवले. तसेच श्री.बी.आर.खेडकर यांनी मैत्रेयीबाईंच्या आग्रहावरून न्यायरत्नांचा एक अर्धाकृति ब्रॉंझचा पुतळा तयार केला. तो शांति-मंदिरमधील हॉलमध्ये विधिपूर्वक प्रस्थापित करण्यात आला. त्यावेळी महर्षींचे जवळचे शिष्य गुजराथेतील चांदोद पीठाचे परिव्राजकाचार्य अनिरुध्दाचार्यमहाराज जातीने उपस्थित होते. शेवटची काही वर्षे मैत्रेयीबाई अमेरिकेत आपल्या मोठ्या मुलाकडे (ह्र्षीकेश)होत्या. तेथे मैत्रेयीबाई ह्रदयविकाराने आजारी पडल्या. त्यांच्यासाठी अमेरिकेतलं आजारपण हा एक विलक्षण आणि चमत्कारिक अनुभव होता. त्यावेळी ह्र्षीकेश, उदयन, संप्रसाद व दोन्ही सुना- डॉ. अरुंधती व डॉ. शीला यांनी त्यांची खुपच काळजी घेतली. मृत्युला सामोरं जाऊन येण्याचा तो अनुभव होता. त्या तृप्त होत्या परंतु आपल्याला अमेरिकेत मृत्यु यावा अशी त्यांची इच्छा नव्हती. भारतात मृत्यु आला तर भारतातच पुनर्जन्म मिळेल असा त्यांचा विश्वास होता. प्रकृति चांगली नसतानाही त्यांनी भारतात येण्याचा निर्णय घेतला व त्या भारतात आल्या.
प्रकाशित साहित्य: सिध्दाश्रम प्रकाशन:



१) अहो सॉभाग्यम्

२) सावित्री-आख्यान

३) सिध्दाश्रम-नित्यपाठ

४) महर्षी-विनोद स्मृति-संहिता

जन्मशताब्दी वर्ष :

२ सप्टेंबर २००७ - २ सप्टेंबर २००८

झालेले कार्यक्रम:

२ सप्टेंबर २००७ - स्मरण, प्रतिमा-पूजन
जन्म-तिथी :

२१ नोव्हेंबर २००७ - गुजराथेतील मातृगया (सिध्दपूर) येथे चंद्रबिंदू सरोवराकाठी मातृ-श्राध्द
उपस्थित : श्री. उदयन विनोद, सौ. अदिती वैद्य, डॉ. सौ. ऋजुता विनोद
एप्रिल २००८ पासून -
महर्षींची अर्धांगी मैत्रेयी या लिंकमध्ये फोटो व माहिती संकलित करून ती देणे.

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search