महर्षीची अर्धांगी मैत्रेयी

बालपणच्या जीवनातील महत्वाचे-मजेशीर प्रसंग प्लेग १९१५ साली पुण्यात भयानक प्लेग झाला होता. आळ्याच्याआळ्या ओस पडल्या होत्या. मोठ मोठ्या वाड्यांच्या दरवाजांना कुलपे पडली होती. लोकं गाव सोडून झोपडीत अगर परगावी गेली होती. दररोज दारावरून ४०-४५ प्रेते जात. ’ राम बोलो भाई राम ’ असे ओरडत प्रेतयात्रा जात. रात्रीच्या वेळी तो आवाज मोती चौकापासून तो प्रेत लकडीपुलावर पोचेपर्यंत ऐकू येई. मग काय ? भीतीने घाबरगुंडी उडे.गावाबाहेर झोपडी मिळाली नाही तर नातेवाईकांकडे जावे लागे. स्वस्ताई: तो काळ अतिशय स्वस्ताईचा होता. खाली नमूद केलेल्या गोष्टींवरून त्या स्वस्ताईची कल्पना येईल. एका रूपयाचे सहा पायली म्हणजे चोवीस शेर झोंधळे मिळत. दोघांच्या अन्नधान्याचा खर्च एक दीड रूपयात भागे. दूध,तूप,साखर,तेल,लाकडे या दैनंदिन गरजेच्या गोष्टी अत्यंत स्वस्त म्हणजे दोन ते तीन आणे पर्यंत मिळत. घरभाडे चार आणे, मग चौदा रूपयांत दोन माणसांचा संसार भागे. सोने चाळीस रू. तोळ्यापर्यन्त मिळे; तर चांदी पन्नास ते साठ रू. किलो मिळे. -- चलन --- १) चार कवड्या = एक गंडा २) दोन गंडे = एक टोली ३) दोन टोल्या = एक दमडी ४) चार दमड्या = एक पैसा ५) एक पैसा = १/६४ रूपये लग्न-समारंभ त्याकाळात घरदार, जमिनजुमला, शेतीवाडी, कुटुंब व शील या गोष्टींना विवाहात महत्त्व दिले जाई. मुलगा स्वावलंबी व मिळवता असण्याची गरज नसे. मुलाला आई-वडील, भाऊबहिनी व इतर नातलग भरपूर असले म्हणजे झाले. म्हणून मुलगे शालेय शिक्षण घेत असताना त्यांची लग्ने होत. त्या काळात मध्यमवर्गीयांचे लग्नसमारंभ ५-५ दिवस चालत. कसबा गणपतीला व जोगेश्वरीला अक्षतही वाजतगाजत व मिरवणुकीने जाऊन दिली जाई. विहिणी नथ, बुगड्या, गोठपाटल्या, सरी-वाकी, टिका-ठुशा, तोडे, चंद्रहार, पुतळ्यांची माळ आदि सुवर्णालंकारांनी भरलेल्या असत. अंगावर मोठ्मोठे बुट्ट्यांचे शेले पांघरीत. त्यांच्यावर नक्षत्रमाळा, अबदागिरी धरल्या जात व चवर्‍या ढाळल्या जात. प्रत्येक मिरवणुकीचा थाट म्हणजे सर्वात पुढे चौघडा असे, त्याच्यामागून सजवलेले घोडे चालत. मागाहून बॅंड, ताशे व शेवटी वाजंत्री, शिंगवाला असा क्रम असे. श्रीमंतांच्या मिरवणुकीत पट्टेवाले, शिपाई असत. त्यांच्यामागे डोलत चालणार्‍या विहिणी व मानकरणी. सर्वात मागे पुरूष असत. त्याकाळी पुरूषही अलंकार घालीत. कानात भिकबाळी, हातात सलकडी व गळ्यात गो्फ आणि बोटात अंगठ्या घालून आलेले अनेकजण मिरवणुकीत दिसत. अशा प्रसंगी करवतीकाठी धोतरे, जरीची उपरणी, डोक्याला झिरमिळ्याची पगडी व पायात पुणेरी जोडे अशा पोषाखात पुरूष दिसत. सर्वांत मागे चार-सहा टांगे किंवा बग्या लहान मुले व म्हातारी मंडळी यांच्याकरीता असत. प्रत्येक विवाहसमारंभात अक्षत, सीमांतपूजन, तेलफ़ळ, रूखवत, नवरामुलगा व वरात अशा पाच मिरवणुका काढल्या जात. याशिवाय उष्टी हळद, अंबोण यासारख्या छोट्या मिरवणुकी ४-६ तरी असत. व्याही व विहिणींना मिरवणुकीने जेवावयास नेले जाई. मिरवायला जाणे हा मराठीतील वाकप्रचार अशा मिरवणुकीवरूनच निघाला असावा. जावई व विहिणी यांना हवा असेल तो मान देऊन त्यांचा रूसवा काढला जाई. एकंदरीत लग्न म्हणजे ८-१० दिवसांचा भरघोस कार्यक्रम असे. मध्यमवर्गातील गृहिणीचे जीवन: तो काळच असा होता की शेजा़ऱ्या पाजाऱ्यांना स्वयंपाकात मदत करणे, एकमेकांकडे पंक्तित वाढावयास जाणे; गव्हले,पापड आदी गोष्टी एकत्र येऊन करणे ही सर्वमान्य रुढी होती.

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search