(२)
ऐतरेय ब्राह्मण या ग्रंथाला यज्ञसंस्थेच्या इतिहासात विशेष महत्त्वाचे स्थान आहे.
यज्ञकर्मात वेदमंत्रांचा विनियोग निश्चित करणार्या ग्रंथाला ब्राह्मण ही संज्ञा आहे. ‘विनियोजक वाक्य ब्राह्मणम्।’ योगशास्त्रात ‘भूमिषु विनियोग’ अपेक्षित असतो. प्रत्येक वेदाच्या मंत्रसंहितेलाही विनियोग शास्त्राची आवश्यकता आहे. वेदमंत्रांचे हे विनियोग शास्त्र म्हणजेच ब्राह्मण.
‘नैरूक्तं यस्तु मंत्रस्य विनियोग: प्रयोजनमो प्रतिष्ठानं विधिश्चैव ब्राह्मणं तदिहोच्यते।’ - (वाचस्पत्य)
हा विनियोग सांगताना मंत्राची व्युपत्ति, उद्देश, प्रतिष्ठा, विधि इत्यादी गोष्टींचाही निर्देश केला जातो. या मंत्रपरामर्शाला ब्राह्मण असे म्हणतात.
प्रत्येक वेदाला स्वतंत्र ब्राह्मण ग्रंथ आहेत. कृष्ण यजुर्वेदाचे ‘तैत्तिरीय’ ब्राह्मण, शुक्ल यजुर्वेदाचे ‘शतपथ’ ब्राह्मण, सामवेदाची ‘पंचविंश’ व ‘षडविंश तांड्य’ ब्राह्मण व आणखी सहा ब्राह्मणे, अथर्ववेदाचे ‘गोपथ’ ब्राम्हण. त्याचप्रमाणे ऋग्वेदसंहितेतील मंत्रांचा विनियोग सांगणारी दोन ब्राह्मणे उपलब्ध आहेत. ऐतरेय हे कौषीतकीहून प्राचीनतर असावे असे वाटते. पण ऐतरियात ‘कौषीतकी’चा व ‘पैंग्य’ नामक एका ब्राह्मणाचाही उल्लेख आढळतो. (७,११) कीथच्या मते हा उल्लेख प्रक्षिप्त आहे. ऐतरेयात पुष्कळसा भाग कौषीतकीहून जुना असावा हे नि:संशय.
मंत्रशास्त्राला अधिष्ठानभूत असलेल्या तत्वज्ञानाची रूपरेषा या ऐतरेय ब्राह्मणांत प्रथमत: स्पष्टविषयात आली. ‘मंत्रसिद्ध अक्षरे ही शक्तीची केंद्रे आहेत’, हा सिद्धांत ऐतरेयाची तात्विक पार्श्वभूमी होय. मंत्राक्षरांच्या शास्त्रपूत उच्चारणाने भौतिक व्यवहारातही इष्ट परिणाम निष्पन्न करता येतात हे या ग्रंथातल्या विवेचनाचे आद्य गृहीतकृत्य आहे.
कौषीतकी ब्राह्मणाला मंत्रशास्त्राच्या दृष्टीने ऐतरेयाइतके महत्त्व नाही.
‘होता’ या ऋत्विजाने आपल्या होतृकर्मांत वेदांतील विशिष्ट मंत्राचा उपयोग; विशिष्ट यज्ञविधानात करावयाचा असतो. होत्याने करावयाचे हे मंत्र विनियोग विशेषत: सोमयागांत कशा स्वरूपाचे असावेत हे ऐतरेय ब्राह्मणांत सांगितले आहे. याचे चाळीस अध्याय असून आठ पंचिकांत त्यांचा समावेश केलेला आहे.
पहिल्या सोळा अध्यायात ‘अग्निष्टोम’ नामक सोमयागाकरिता युक्त असलेले मंत्र विनियोग निर्देशले आहेत. सतरा व अठरा या दोन अध्यायात एका संवत्सर सत्राचा ‘गवामयन’ यज्ञाचा विचार केला आहे. एकोणीस ते चोवीस पर्यंतचे अध्याय ‘द्वादशाह’ म्हणजे बारा दिवस चाल्रणार्या यज्ञाच्या विवेचनाला दिले आहेत. वैदिक ऋषि वर्षानुवर्षे, असली सत्रे चालू ठेवीत एक हजार वर्षे चालणार्या एका ‘इष्टाकृत’ नामक सत्राचा उल्लेख महाभारतात आढळतो. (३-१०५-१३)
अग्न्रिहोत्र या दीक्षेविषयी चोवीस ते बत्तीस अध्यायात विचारणा झाली असून तेहतीस ते चाळीस अध्याय साम्राज्याभिषेक व राजपौरोहित्य या विषयांच्या परामर्शाला उपयोजिले आहेत. सोमयोग, अग्निहोत्र व राजपौरोहित्य हे तीन विषय ऐतरयात आस्थेने चर्चिले आहेत. या विवेचनाचा अन्वयार्थ लावण्यास एखादा सोमयागी अग्निहोत्री व राजपुरो्हिततुल्य पंडित पाहिजे. श्रौताचार्य बापट हे सोमयागि व अग्निहोत्री आहेतच. शिवाय बडोदे, मिरज, औंध, इंदूर, देवास इत्यादी संस्थानांत त्यांना राजपुरो्हिततुल्य प्रतिष्ठेचे विविध प्रकारचे पौरोहित्यस्थान लाभलेले आहे. ऐतरेयाचा अर्थ सांगण्यास आवश्यक अशा विविध अधिकारांचा प्रयागराज त्यांचे ठिकाणी स्वत:सिद्ध आहे.