पुस्तकाचे नाव: प्रात:स्मरणीय नाम-योगी
लेखक: बाल-ब्रम्हचारी प्रल्हादबुवा सुबंध
प्रस्तावना: श्री जगद्गुरु न्यायरत्न डॉ. धुं. गो. विनोद
(लेखकाचे मनोगत: माझ्या सर्व ग्रंथांना परमपूज्य गुरूदेव न्यायरत्नाचे दैवी आशीर्वाद लाभले आहेत. काही आशीर्वाद मूक-नि:शब्द आहेत व काही, प्रत्यक्ष त्यांच्या लेखणीतून उतरलेले आहेत. प्रस्तुत आशीर्वादाने नामायोगातले मूळ रहस्यास त्यांनी प्रकट करून ठेवले आहे.श्री नामदेवाप्रमाणे व त्यांच्याच आशीर्वादाने श्री जगद्गुरू विनोद यांनीही संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा करून जगातल्या बहुतेक देशात, भारतीय अध्यात्म-विद्येचा प्रचार केला आहे़. --- प्र.सी. सुबंध) श्री नामदेव हे महाराष्ट्राच्या नाम-विद्येचे आद्य प्रणेते आहेत. नाम व नामी या द्विपुटीचे, आंतर अव्दैत, श्री नामदेवांनी स्वानुभवाने व स्वत:च्या चतुर्विध वाणीने सिद्ध व प्रसिद्ध केले आहे. परा, पश्यन्ती, मध्यमा व वैखरी या चतुर्वेदीवर श्रीनामदेवांची नामज्वाला, अखंडतेने प्रस्फुरत होती. कर्म-किंकर होऊन चौर्याशी लक्ष योनि हिंडणार्या जीवाला नाग-योग समजला की, तत्क्ष्रणीच त्याला महा-जागर येतो, महामोक्ष लाभतो; स्वयं सच्चिदानंदस्वरूप अस्रणारे स्व-स्वरूप त्याच्या अनुभवास येते. कर्म-नियतीचे बंध, एका झटक्यात तोडण्याचे सामर्थ्य एका नाम-साक्षात्कारात आहे. नाम एकदाच घ्यावयाचे असते, दोनदा नव्हे. मात्र ते घेता येण्यासाठी अनेक जन्मांची संसिद्धी लागते. ‘नाम’ हाच देव, आणि त्या देवाचे प्रत्यक्ष दर्शन, त्याचा साक्षात्कार श्री नामदेवाच्या शरीर धारणेने, महाराष्ट्राला व भारताला झाला. श्री नामदेवांचा अवतार म्हणजे नामयोगाचा अवतार होय. नाम व नामी यांचे अद्वैत अनेक तर्हेने प्रकट होत असते, अनेक तर्हेने अनुभवायचे असते. नामाकडून नामीकडे - असा प्रवास सहज सिद्ध आहे. ‘नाम’वंत व भगवंत यांचे मधले अंतर खरोखर काल्पनिकच आहे. नामवंत क्षणार्धात भगवंत होतो. ‘नाम’ एकदाच व क्षणमात्र घेता आले की ती व्यक्ती ‘देव’रूप होते, देवत्व पावते. ‘नाम’ कोट्यावधी वेळा घ्यावयाचे नसते. अगदी एकदाच, दोनदा नव्हे व पुनश्च कधीही नव्हे. नाम एकदा घेतले, घेता आले, की दुसरे काहीच घेता देता येत नाही. कारण, नंतर ‘नाम’ आपणास घेते, आपण ‘नामाला घेत नाही, आपण शिल्ल्रकच उरत नाही. नाम म्हण्रजेच नामी असल्यामुळे नाम घेणे म्हणजे ‘नामी’ घेणे, देव घेणे देवत्व पावणे, असे नव्हे काय? देवत्व पावणे ही क्रिया हा अनुभव एक्रदाच यावयाचा असतो. हजारो वेळा देवत्व कसे पावता येईल? एकदा नामी म्हणजे देव मिळाल्यावर त्याला पुन: कसे मिळ्वता येईल? एकदा देव मिळाल्यावर तो देव हरवावा लागेल व तरच त्या देवाला पुन: मिळ्वता येईल दोन वेळा ‘नाम’ घेणे दोन वेळा नामी मिळ्वणे शक्यच नाही. न्यायदर्शनाप्रमाणे प्राक अ-भाव असेल तरच भाव शक्य होतो. देव मिळवण्यापूर्वी, न मिळालेला असला पाहिजे मिळालेली वस्तु पुन: मिळविता येणार नाही. ती हरवली तर मात्र पुनष मिळविणे शक्य होते. एकदा देव मिळाल्यावर तो हरवता येत नाही. एकदा देव मिळवल्यावर फक्त स्वत:ला हरवता येते. स्वत:ला शिल्लक रहाता येत नाही. जे काही रहाते ते देवच. असे नसले तर देवाकडे अल्पत्व येईल व भक्ताकडे बृहत्+त्व जाईल. देव हा अंश व भक्त ‘पूर्ण’ असा व्यत्यास होईल. देव मिळवणे म्हणजे एखादी ‘वस्तु’ मिळविणे नव्हे. स्वत:ची देवांत मिळवणी करणे म्हणजे देव मिळविणे. माझ्यात देव मिळवावयाचा नाही. मी देवात मिळवून व मिळून जावयाचे. नाम योगाची प्रक्रिया अशी विल्रक्षण आहे! नाम-योग म्हणजे ज्ञानयोग, भक्तियोग व कर्मयोग यांचा व यावत् शक्य सर्व योगांचा, समन्वय-योग आहे. कारण सर्व योगांची मूल्रतत्त्वे नामयोगात अंतर्भूत व अनस्यूत असून शिवाय त्या सर्व योगांचा तो लघुतम विभाग आहे. नामयोग ही बीजविद्या आहे, शाखा शास्त्र नव्हे. नामयोग साधला किंवा नामाचा एकदाच योग झाला की, विश्वाभास मावळलाच. नवलचंडांशूचा उदयच तो! एकदा, अगदी एकदाच नाम घेतल्यावर ‘नाम’ आपणास घेऊन ग्रासून टाकते. आपण ‘नाम’ घेण्यास शिल्लकच उरत नाही. हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. साहित्य शास्त्रातला अलंकार नव्हे, शाब्दिक कोटी नव्हे व अर्थ चमत्कृती नव्हे. श्रीमंत तुलसीदास यांनी एका मातेला हाच उपदेश केला होता. तिचे बालक मृत झाले होते. तुल्रसीदास म्हणाले, ‘एकदाच रामनाम घे, म्हणजे ते मूल जिवंत होईल. बिचारीने रामनामाचा लक्ष-घोष केला, मूल जिवंत झाले नाही. तुल्रसीदासांनी एकदाच राम्रनाम घेतले व त्या बाईचे मृत मूल एकदम हसू खेळू लागले! श्री नामदेवांनी निर्व्याज, निरागस व अखंडार्थ वृत्तीने दुधाबरोबर स्वत:च्या सर्वस्वाचा ‘नैवेद्य दाखवून एकदाच पांडुरंगाचे नाव घेतले, याचा अर्थ - पांडुरंगाने हा नैवेद्य स्वीकारला व नामदेव अंतर्धान पावून त्यांचे ठायी पांडुरंग जिवंत झाला. नाम्याचा श्वास सरला त्यानंतर, देवाचा सुरू झाला. नाम-नामी एक झाले. नाम म्हणजेच देव, हा सिद्धांत महाराष्ट्रात मानव देहाने वावरू लागला. ज्ञानाची, ज्ञानराजाची साथ करीत करीत सह्रवास घेत घेत, उत्तर भारतात हा सदेह सिद्धांत, संचार करून परत पांडुरंगाचे पायी आला. नामदेव हे नाम-देह होते. त्यांचा देह हे साक्षात् व साकारलेले नाम होते. नामदेवाची देववाणी, बालसरस्वतीला, सरल-सुंदर शब्द साज भक्तराज बाल प्रल्हादाने चढविला आहे. ही कलाकृती इतक्या हळुवारपणे, दुसरे कोण करू शकेल? प्रक्रर्षाने ‘ल्हाद’ म्हणजे आनंद देणारे, हे प्रल्हाद बालक, महाराष्ट्र संतांच्या शब्द शारदेचे एक लाडके लेणे आहे. प्रल्हादबुवा हे आंतर-बाह्य शुद्ध आणि म्हणून वाचेचे रसाळ आहेत. त्यांनी केलेले नामदेवांच्या अभंगांचे सहज सुंदर शब्दांतर व रूपांतर इतके यथार्थ व भावार्थ दीपक आहे की मूळ अभंगांची अवीट गोडी त्यात अविरतपणे झिरपून राहिली आहे. श्री नामदेवावरील त्यांचे हे चार खंडात प्रसिद्ध झालेले सायण भाष्य महाराष्ट्र संतवाङ्मयांत अमर होईल अशी माझी निष्ठा आहे. बाल-ब्रम्हचारी प्रल्हादबुवा सुबंध यांचे जीवन हे एक हरिदारसकुळाचे भाग्य-भूषण आहे. त्यांना, म्हणजे त्यांच्या लेखनरूप वाग्वंशाला ‘आकल्प आयुष्य’ श्री नामदेवांनीच प्रार्थिले आहे. आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा। माझिया सकळा हरिच्या दासा। श्री प्रल्हादबुवांचे अंत:करणपूर्वक अभिनंदन करून हे मंगलाचरण संपवितो.
- धुं.गो. विनोद
पंच पंच उष:काल अनंत चतुर्दशी,
शनिवार भाद्रपद शके, १८७९
ता. ७ सप्टेंबर १९५७
ॐ ॐ ॐ