प्रस्तावना

अनुभवामृत दीपिका

पुस्तकाचे नाव: अनुभवामृतदीपिका

लेखक: श्री. प्र.स.सुबंध

प्रस्तावना: अनुभवामृताची सजीव मूर्ती, प्रात:स्मरणीय व नित्य दर्शनीय श्री जगद्गुरू न्यायरत्न डॉ.धुं.गो. विनोद, एम्.ए., पी.एच्.डी, दर्शनालंकार यांचा कृपाशीर्वाद

-१-

श्री ज्ञानेश्वरांचे ‘अनुभवामृत’ ही साक्षात्, साकार व सधन अपरोक्ष-अनुभूति आहे. हे एक श्रुति-सूक्त आहे. प्रत्यक्ष परा-विद्येचे नि:श्वसित आहे. ज्ञानेश्वरी व ‘चांगदेव-पासष्टी’ हे त्यांचे पहिले दोन ग्रंथ म्हणजे परेच्छा-प्रारब्धाची प्रतीके म्हणता येतील. गीताकार श्री. भगवान व चांगदेव ही त्या दोन ग्रंथांची स्फूर्तिस्थाने होत. पण अनुभवामृत हे ज्ञानेश्वरांचे स्वेच्छा-प्रारब्ध आहे. किंबहुना केवळ प्रारब्धच नव्हे तर या ग्रंथांमध्ये, त्यांच्या आध्यात्मिक पूर्व-संचिताचा व अवतारकार्याच्या क्रियमाणाचा अंतर्भाव होऊन या तीन कर्मप्रवाहांनी एक प्रयागराज सिद्ध झाला आहे. “आता तुम्ही स्वतंत्र प्रकरण लिहावे!” या श्रीनिवृत्तीनाथांच्या आज्ञेमुळे प्रस्तुत तत्त्वगीतांत, आपला स्वयंप्रभ अनुभव व मौलिक तत्त्वज्ञान, ज्ञानेश्वरांनी विशद केले आहे. त्यांची स्वेच्छा म्हणजे श्री निवृत्तींची किंबहुना आदिनाथांची ही स्वेच्छा असणार हेही तितकेच खरे आहे. पण ‘अनुभवामृत’ हा ग्रंथ श्री ज्ञानेश्वरांचा म्हणावयाचा असेल तर अर्थातच त्यांची वैशिष्ट्यपूर्ण तात्त्विक भूमिका ज्ञानेश्वरी-पासष्टीपेक्षा याच ग्रंथांत प्रकट होणे साहजिकच नव्हे काय? या ग्रंथांतील दहा प्रकरणे म्हणजे भगवंतांचे दशावतार आहेत, अथवा जिवशिवैक्य दर्शविणारी अभिनव दशोपनिषदे आहेत. श्री ज्ञानेश्वरांच्या, स्वत:च्या अपरोक्ष अनुभवांची समग्र संहिता यात आहे; तसेच परमात्म तत्त्वावरील महावार्तिकही यातच अवतरले आहे - या दोन्ही अर्थांनी अनुभवामृत हे ज्ञानेश्वरांचे ‘आत्मभाष्य’ किंवा ‘स्वानुभव-वार्तिक’ म्हणता येईल. श्री ज्ञानेश्वरांनी स्वत:ची परमोच्च तात्त्विक भूमिका स्वत:च्या आंतरिक, अंतिम व आध्यात्मिक अवस्था, आणि स्वत: अनुभवलेले परिपूर्ण गुरू-तादात्म्य यांचे मनोज्ञ चित्रण या ग्रंथांत करून ठेवलेले आहे.

-२-

हा ग्रंथ स्वत: ज्ञानेश्वर म्हणतात त्याप्रमाणे ‘सिद्ध-अनुवाद’ आहे; म्हणजे स्वत:सिद्ध असलेल्या आत्म-तत्त्वाचा उहापोह यांत आहे. पर, सर्व सिद्धांसाठी एका सर्वश्रेष्ठ सिद्धाने केलेला हा ‘अनुवाद’ आहे असे म्हणणेही युक्त होईल! कारण हा ग्रंथ अध्यात्माचा उच्चोत्तम धवलगिरी आहे. येथे चंडोल गति हवी. या ग्रंथाला ‘अनुभवामृत’ हे नाव स्वत: ज्ञानेश्वर माऊलीने सहेतुक दिले असून त्या नावात त्यांचे सर्व तत्त्वज्ञान गर्भित आहे. ज्ञानदेव स्वत: सांगतात की हे अनुभवामृत असे श्रीमंत आहे की अगोदर जीवनमुक्त असलेले जीव याचे सेवन केल्यावर अमृतरूप होऊन जातील. ज्ञानदेवो म्हणे श्रीमंत हे अनुभवामृत। सेऊनि जीवनमुक्त हेचि होतु।। प्र. १०, १९ अमृतानुभव असाही पर्याय प्रचलित आहे. ‘नित्यानंदैक्यदीपिका’ ही प्रासादिक व तेजाळ टीका लिहिणारे परमहंस शिवकल्याण यांनीही, तो स्वीकारला आहे. पण, स्वत: ज्ञानेश्वरांचा ग्रंथातर्गत स्पष्ट निर्णयच असताना दुसरा पर्याय किंवा विकृति स्वीकारण्याचे प्रयोजन काय? हे ‘अनुभवामृत’च आहे. कारण अनुभव हेच अमृत होय असा या ग्रंथाचा संदेश आहे. जे अमृत असेल त्याचा फक्त अनुभव हा अभिप्राय नसून प्रत्येक व सर्व अनुभव, स्वभावात अमृतमयच आहेत; ही माऊलीची भूमिका आहे. सर्व अनुभवांचे स्वरूप-अंत:स्वरूप, यथार्थ स्वरूप व मूलस्वरूप अमृतमय आहे; साक्षात् अमरत्व आहे, अशी ज्ञान-राजाची शिकवण आहे. ‘अमृतानुभव’ म्हणण्यात हा अर्थ स्पष्ट होत नाही. मृतेतराचा म्हणजे अमृताचा, अमरत्वाचा अनुभव असा अर्थ तेथे प्रकटतो. अमरत्वाची प्रतीति खरी, पण मृतत्वाचा, जडत्वाचा त्याग केल्यावर असा काहीसा ध्वनी त्या नावात आढळतो. अमृताचा अनुभव म्हणजे ‘मृत’ या कल्पनेची देह-बुद्धी किंवा जडत्व-बुद्धी यांची प्रथम धारणा; नंतर त्यांचा त्याग व नंतर आत्मतत्वाचे ग्रहण, अशा शृंखलेची व्यंजना, ‘अमृतानुभव’ या शब्दांत आहे. पण ज्ञानेश्वरांचा सर्वश्रेष्ठ सिद्धांत हा आहे की मृत, जड, अज्ञानरूप, विषयरूप असे काहीच नाही. स्वरूपत:, सर्व अनुभव हेच अमृत होय. अविद्य, अज्ञान, माया, भ्रम हे पदार्थच नव्हेत; मात्र, अनुभवाचे यथार्थ स्वरूप ओळखले पाहिजे. ते ओळखले की अनुभव-अमृतमयच नव्हे, अमृत-मात्र आहे!

-३-

अनुभवामृत हा एकमात्र ग्रंथ असा आहे की ज्याच्या अध्ययनाचे व मननाने आत्मविकासाचा अंतिम कोटी जे सच्चिदानंदपद, चिरंजीवपद, ते ज्ञानत: ज्ञानयोगपद्धतीने अनुभवता येते. केवळ ज्ञानयोगाचे मोक्ष कसा मिळतो, कसा मिळू शकेल याचा प्रत्यय व मार्गदर्शन, अनुभवामृत या एकाच मराठी ग्रंथांत एवढ्या तर्कशुद्ध पद्धतीने केलेले आढळेल. ज्ञानाबरोबर भक्तिभाव व कर्मकौशल्य आपोआप साथ देत राहतातच. तथापि अंतिम स्फुरता ‘ज्ञान-मात्र’ आहे व त्यामुळे ज्ञानमार्ग व विचार-योग यांचाच आलंब अखेर बिंदू गाठीपर्यंत असणे क्रमप्राप्तच आहे. येथे ज्ञानयोग श्रेष्ठ की भक्तियोग, की कर्मयोग, वा राजयोग असा लढा निर्माण होत नाही व ज्ञानेतरयोग हे कमी महत्त्वाचे ठरत नाहीत. सर्व दृष्टी व अवस्था, योग व प्रयोग सारख्याच महत्त्वाचे आहेत, पण अनुभवाचे पृथक्करण करीत करीत अपरोक्ष-अनुभूतिपर्यंत जावयाचे असेल तर ज्ञानमाऊलीने एक विशुद्ध विचार-साधना प्रस्थापित केली आहे. ही साधना अनुभवामृतांत साकारली आहे. अनुभवामृतांत पहिल्याच ओवीत ‘देवी देवी’ हे पद निक्षेपून त्या दोघांना ‘निरूपाधिके’ हे विशेषण लावून ज्ञानेश्वरांनी आपले वैशिष्ट्यपूर्ण असे तत्त्वज्ञान उद्घोषित केले आहे. पुरूष व प्रकृति, ब्रह्म व माया या अंतिम द्वंद्वांमध्ये प्रकृति किंवा माया ही उपाधि समजली जाते. पण ज्ञानेश्वरांची भूमिका ही आहे की ‘उपाधि’ या कल्पनेला अर्थवत्ता किंवा अस्तित्व देखील शक्य नाही! अपरोक्षात किंवा स्व-स्वरूपांत कोठल्याही प्रकारच्या भेदप्रतीतीचा संभवच नाही. श्री प्रकाशानंद, सिद्धांतमुक्तावलीत म्हणतात त्याप्रमाणे - प्रतीति मात्रमेवेदम् भाति विश्वम् चराचरम् प्रतीतव्य - प्रतीत्योश्च भेद: प्रामाणिक: कुत:।। सर्व विश्व ही एक विशुद्ध `प्रतीति' आहे. प्रतीति आणि प्रतीतव्य यामधील भेदाला अवसरच नाही - त्या भेदाला प्रमाण काय? जे प्रमाण असेल तेही प्रतीतिरूपच असणार. ‘निरूपाधिके’ हा एकच शब्द पहिल्या ओवीत वापरून ज्ञानेश्वरांनी आपल्या उच्चोत्तुंग तत्त्वज्ञानाच्या धवलगिरीचे ओझरते दर्शन घडविले आहे. उपाधि म्हणजे काय? उपाधि शब्दाचे अनेक अर्थ आहेत, कारण निमित्त, पदवी, गुण किंवा धर्म, अनुषंग इत्यादी. सामान्यत: आगंतुक गुण किंवा धर्म म्हणजे उपाधि, असे समजले जाते. वाचस्पति मिश्रांनी ‘उपाधि’ या शब्दाची व्याख्या करताना विपरीतरूप दर्शविते ती असे तिचे लक्षण केले आहे. अन्यथास्थितस्य वस्तुत: अन्यथा प्रकाशनरूप: उपाधि:। न्यायदर्शनात उपाधि शब्दाचे विवेचन अत्यंत सूक्ष्मतेने झाले आहे. यद्व्यभिचारित्वेत साधनस्य साध्यव्यभिचारित्वम् स: उपाधि:। तार्किक शिरोमणि रघुनाथ भट्टाचार्यांनी आपल्या सुप्रसिद्ध ‘दीधीति’ नामक ग्रंथाच्या अनुमानखंडांत उपाधि या पदावर सर्वोत्कृष्ट विवरण केले आहे. त्यांनी उपाधि शब्दाचा निरूक्तार्थ असा केला आहे. त्यांच्या मते उपाधि हा शब्द योगरूढ असून “उप समीपवर्तिनि आदधाति संक्रामयाति स्वीयम् धर्मम् इति उपाधि:” जवळच्या पदार्थांत आपला गुण संक्रमित करतो तो उपाधि संस्कृतमध्ये उपाधि शब्द पुल्लिंगी आहे. स्फटिकाजवळ जपा जावाचे तांबडे पुष्प असेल तर स्फटिक तांबडा रंग दिसतो. तांबडे फूल हा उपाधि व स्फटिक हे उपाधेय. उपाधिला अविद्यामुळे भासमान होतो, असे वेदांतदर्शन मानते. उपाधीनाम च अविद्या प्रत्युपस्थापितत्वात् - ब्रह्मसूत्र १५.३.२ ही अविद्या ‘नैसर्गिकी’ आहे व म्हणूनच हा सर्व लौकिक व वैदिक म्हणजे यज्ञादिक व्यवहार होऊ शकतात. सत्यामेवच नैसर्गिक्याम् अविद्यायाम् लोक वेद व्यवहारावतार: इति ब्रह्मसूत्र (१५.३.२) वरील शांकरभाष्य पहावे. अविद्येमुळे उपाधि होती. या उपाधीचेच स्वरूपांतर बुद्धी किंवा अंत:करणचतुष्ट्य किंवा अंत:करणपंचक होय. बुद्धी हा एकच शब्द संपूर्ण अंत:करणाचा वाचक म्हणून वापरला जातो. अहंकार, बुद्धी, मन व चित्र हे चार पदार्थ अंत:करणाचे घटक होत; त्यातच अंत:करण म्हणून एक पाचवा पदार्थही कल्पिला जातो. त्याला अंत:करणपंचक असेही म्हणतात. पण आपण, एक ‘बुद्धी’ एवढाच शब्द वापरू आहे असे मानतात. व्यतिरेकाने जगदाभास होतो व अन्वयाने परत्मारूप प्रतीतीत येते. बुद्धीचा ‘विवेक’ हा मुख्य गुण आहे. सुरेश्वराचार्य आपल्या नैष्त्कर्म्य सिद्धींत (१४, ४) म्हणतात - बुद्धौ एव विवेकोऽयम यत् अनात्मतया भिदा बुद्धिमेव उपमृद्गाति कदलीं तत्फलं यथा।। विवेक हा बुद्धींत अभिव्यक्त होतो. बुद्धि हे अनात्म तत्त्व आहे. बुद्धि म्हणजे आत्मा नव्हे हे खरे; पण अनात्मबुद्धीचा नाश करणारा विवेक बुद्धीतच प्रकट होतो व बुद्धीचा उपाधि, विवेकाच्या उदयानंतर आपोआप अस्तंगत होतो. केळीला फळे आली व ती पूर्ण पक्व झाली की स्वत: केळीचे झाड नष्ट होत असते. अनुभवामृत ग्रंथाच्या परिशीलनाने बुद्धीचा हा विवेक गुण समुदित होईल. या ग्रंथाचे प्रथम एकदा समग्र पारायण करावे. नंतर रोज फक्त एका प्रकरणाचाच अभ्यास असे दहा दिवसांचे फलाहारपूर्वक अनुष्ठान करावे. अकरावा दिवस सिद्धांत - निदिध्यासात घालवावा. स्वप्नांतर्गत साक्षात्कारादि अनुभव अकराव्या रात्री अवश्य येतो. बुद्धीत विवेकसूर्याचा उदय होतो.

-४-

अपरोक्ष-अनुभवांत भेद-प्रतीति नाही, द्वैत-ग्रह नाही व त्रिपुटी भाव नाही. स्वभावात म्हणजे आपल्या मूळ, स्व-स्वरूप अपरोक्ष प्रत्ययात निराकार स्वयंपूर्णता आहे. या अवस्थेत अज्ञानाचा नव्हे, ज्ञानाचाही लोक व्हावयाचा असतो. म्हणूनच, केवळ अज्ञान-धांडोळा करून न थांबता ज्ञानेश्वरांनी अनुभवामृतांत ज्ञानाचेही विसर्जन केले आहे. ज्ञान व अज्ञान या दोहोंनाही मूलभूत, अधिष्ठानभूत अशी सत्-ता, अशी संवित्, अशी स्फुरता, आपले स्व-स्वरूप म्हणून कशी अनुभवावी ही प्रक्रिया अनुभवामृतांत ज्ञानेश्वरांनी सुस्पष्ट केली आहे. जगाच्या एकंदर वाङ्मयात, तत्त्व-शास्त्राच्या अखिल इतिहासात मानवी अनुभवाचे इतके सूक्ष्म, मूलगामी व तर्कविशुद्ध पृथक्करण करणारा दुसरा ग्रंथ पाहू लागले, तर अनामिका सार्थवली होईल अशी भीती वाटते.

-५-

ज्ञान व अज्ञान यांना मूलभूत असते ती स्फुरता. ही स्फुरताच स्व-स्वरूपाची अखंड अनुभूति होय. सामान्यत: अज्ञानाचा नाश ज्ञानाने होतो. पण ज्ञानाचा नाश अज्ञानाने होऊ शकेल काय? ज्ञान झाल्यावर त्याची विस्मृति होऊ शकेल, पण विनाश कसा होईल? ज्ञान व अज्ञान परस्पर सापेक्ष आहेत, पण त्या सापेक्षतेत दोन्ही पदे सममूल्य नाहीत! ज्ञानाने अज्ञानाचा बाध होतो. पण अज्ञानाने ज्ञानाचा बाध होऊ शकणार नाही. अज्ञान ज्ञानाला आवरण-शक्तीने व विक्षेप शक्तीने झांकळूं शकेल, पण ते मालवू शकणार नाही. वृत्ति-ज्ञान व अज्ञान ही सापेक्ष असली तरी स्फुरता, स्व-स्वरूप स्थिती, हा अनुभव त्यांचे अलीकडचा व पलीकडचा व अतीत व अतिक्रांत आहे. आणि तरीही तो अनुभव विशुद्ध ज्ञानमात्रतेचा आहे. अज्ञानमागतेचा नाही. वृत्तिज्ञान लोपले तरी निखले `ज्ञान' हा स्फुरतेचा स्वभाव आहे व असणार; अज्ञान-अंध:कार नाही व नसणार म्हणोनि ज्ञाने उजळे। का अज्ञाने रूळे। तैसे नव्हे निर्वाळे । ज्ञानमात्र जे ।। ४-४ ओवी १७ परि ज्ञानमात्रे निखळे। तेचि की तया कळे। काय देखिजे बुबुळे। बुबुळा जेवी ।। प्र. ४ ओवी १८ यामुळे, जे ज्ञानाने प्रकाशित होईल, प्रकट होईल, किंवा अज्ञानाने झाकले जाईल, असे नसणारे ते (स्व-स्वरूप, स्फुरता स्वरूप) केवळ शुद्ध ज्ञानमात्र आहे. परंतु ते केवळ शुद्ध, ज्ञानस्वरूप असल्यामुळे त्याला त्याची जाणीव कशी होईल? (होईल असे म्हणाल तर ज्याप्रमाणे डोळयाने डोळा पहावा तशी होईल.) अनुभवामृतांत, विशेषत: अजातवाद, स्फूर्तिवाद, चिद्विलासवाद व दृष्टिदृष्टिवाद यांच्या तात्विक कोटिक्रमांचा आढळ होतो. सृष्टि-दृष्टिवाद, अवच्छेदवाद, बिंबप्रतिबिंबवाद, आभासवाद व कल्पनावाद यांचा परामर्श ज्ञानेश्वरीत अनेक ठिकाणी घेण्यात आला आहे. श्री ज्ञानेश्वरांनी सर्व वादांचा व उपपत्तींचा समन्वय लावून अनुभवामृतांत स्वस्वरूपानुभवाचे संविद्रहस्य सांगितले आहे. श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रतिभेवर, विश्वैकधामाने प्रथम आपला प्रसादचंद्रमा पूर्णत: फुलवून त्यांच्या स्फूर्तिकलेची पौर्णिमा केली आणि नंतर जणू काय ती प्रफुल्ल गुरूपौर्णिमाच ‘अनुभवामृताच्या’ शब्दसरस्वतीत नित्यत्वाने बिंबित करून ठेविली आहे. गेली चाळीस वर्षे महाराष्ट्र जनतेला संतवाङ्मयाचा गाढ परिचय घालून देणारे माझे परमस्नेही श्री. प्रल्हादबुवा सुबंध, अनुभवामृताचे पुनश्च अंशत: प्रकाशन करीत आहेत. त्या निमित्ताने हे चार शब्द मला लिहिण्याची संधी मिळाली. नैष्ठिक ब्रह्मचर्याचे प्रतिज्ञापालन, संतवाणीचा व संतवृत्तीचा अखंड अभ्यास, आध्यात्मिक जिज्ञासेची धाराप्रवाही उपस्थिती, या त्रैगुण्याने सालंकृत असलेले प्रल्हादबुवा अनुभवामृताचे प्रकाशन करून पुनश्च महाराष्ट्राला ऋणाईत करीत आहेत. प्रत्येक मराठी हृदयाने, कृतज्ञतापूर्वक या ग्रंथाचे स्वागत करावे, अध्ययन करावे व स्वत: धन्य व्हावे ही माझी प्रार्थना आहे. म्हणोनि ज्ञानदेवो म्हणे। अनुभवामृते येणे। सणु भोगिजे सणे। विश्वाचे नि। अनुभवामृत प्रकरण, १० ओवी २१

- धुं. गो. विनोद ज्येष्ठ शुद्ध, एकादशी, शके १८७८ ता. १८ जून १९५६

ॐ ॐ ॐ

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

Dr. Samprasad Vinod - 09373686537

Dr. Mrs. Rujuta Vinod - 09371934520

Copyright 2019. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search