चवथीची चंद्रकोर म्हणजे मानवी मनाची चौथी ‘तुरीय’ अवस्था.
जागृत्, स्वप्न व सुषुप्ति या तिन्हीं अवस्थेहून निराळी अशी कोणती अवस्था आहे?
स्थळ कालादिकांचे बंध तिला नसणार. कारण, उपकरण किंवा अंत:करण,
कर्मेंद्रियें किंवा ज्ञानेंद्रियें, अहंकार किंवा अहंकाराची जाणीव ह्या सर्वांचा अभाव
‘तुरीय’ अवस्थेंत क्रमप्राप्तच आहे. तिला ‘अवस्था’ ही संज्ञाही अयुक्त आहे.
कांही अतींद्रिय अनुभव, त्यांच्या प्रत्यक्षतेनंतर, इंद्रियांच्या चौकटींत पुन: बसूं शकतात.
उदाहरणार्थ संप्रज्ञात समाधि, भूत-प्रेतांचे (प्र + इत = येथून गेलेले), किंवा देवादिकांचे
कांही व्यक्तींमध्ये होणारे संचार, कांही उन्मनस्क अवस्था इत्यादि.
तुरीय अवस्थेची शब्दमूर्ति म्हणजे ॐकार.
प्रणव किंवा ॐकार या शब्दाला व्याकरणांतील कोणताही विभक्ति-विकार किंवा वृद्धिसंस्कार होऊं शकत नाहीं.
या शब्दाला कोणताही एकमात्र ‘वाच्य’ अर्थ नाहीं व त्यामुळें ‘लक्ष्य’ अर्थ असंख्य आहेत.
ॐकार चे तीन अवयव (अ + उ + म) हे सर्व उपलब्ध त्रिपुटींचें वाचन करूं शकतात.
सर्व वाच्य त्रिपुटींच्या पलीकडचा व सर्व त्रैगुण्यविशिष्ट अनुभवांचे अतीत असा जो निस्त्रैगुण्य अनुभव,
त्याची यथार्थ लक्षणा म्हणून ॐकार किंवा प्रणव यांची उपयोजना विहित समजली जाते.
सर्व देवता या देहेंद्रियांचे ठिकाणीं असलेल्या शक्ति होत. देवतांचीं विविध रूपें व रूपकें म्हणजे
या विविध इंद्रियांचें ठिकाणीं मूर्त झालेल्या आदिसत्तेचीं प्रतीकें आहेत.
आदिसत्ता ही कुठल्याही एका रूपांत, देवतेंत किंवा प्रतीकांत पूर्णत: अभिव्यक्त होत नाहीं.
त्यांच्या समुदायांत देखील ती सत्ता पूर्णांशानें अवतरू शकत नाहीं.
सर्व देवतांचे, म्हणजे आदि शक्तीच्या वा आदिसत्तेच्या अनेकविध प्रतीकांचे, एकमात्र लक्षण
असणा-या व एकंकाराचें वाचन करणा-या संज्ञेचे नाव ॐकार.
देहस्थित सर्व देवतांची समन्वित शक्ती व देवतातीत आदिसत्ता यांचा एकंकार म्हणजे
साकारलेला प्रणव किंवा शुंडाविशिष्ट मंगलमूर्ती श्रीगजानन. उभ्या ॐ मधील शुंडा स्पष्टच आहे.
श्रीमंगलमूर्तीचा अधिवास मनुष्यमात्राच्या नेत्र-तेजांत आहे-हे गाणपत्य शास्त्रांतले एक तंत्र-रहस्य आहे.
आद्य जगद्गुरू श्री शंकराचार्य यांच्या अ-खंड परंपरेंतील परमाचार्य भास्करराय भारती यांनीं केलेल्या
गणेश सहस्त्र नामावरील ‘खद्योत’ नावाच्या श्लोकबद्ध संस्कृत टीकेंत ‘सर्व नेत्राधिवासक:।’
असे गणपतीचे विशेषनाम सांगण्यांत आलें आहे. प्रत्येक व्यक्तीच्या नेत्र-बिंदूत महन्मांगल्य स्वयंसिद्ध आहे.
ॐ या बीज मंत्राच्या यथाशास्त्र उच्चारानें व प्रत्येक दिवशीं सहस्त्रैक (१०००१) संख्या जपानें
नेत्र बिंदूंत हें मांगल्य उपजविता येतें. स्वत:चें भोंवती मंगल वलय व वातावरण निर्माण करण्यास
ॐकार युक्त, म्हणजेच साक्षात् मंगलमूर्तीचें वाचन करणा-या प्रणवासहित,
गं बीजाचा प्रत्यही सहस्त्रैक जप ही एक अद्भुत् उपासना आहे. ईश्वर तत्त्वाचा वाचक प्रणव आहे,
असें भगवान् पतंजलींचे सूत्र सुप्रसिद्ध आहे - तस्य वाचक: प्रणव:।
प्रणव शब्दाची निरूक्ति - प्रकर्षेण (विशेषत्वाने) नूयते(स्तविला जातो) इति प्रणव:।।
ॐकार हे परमेश्वराचे परमोत्कृष्ट स्तोत्र आहे.
||ॐ गम्||