वैशाख शुद्ध पौर्णिमा ही श्री गणेशाच्या ‘पुष्टिपती’ या सुप्रसिद्ध अवताराची जन्म-तिथी आहे.
गाणपत्य संप्रदायांत हा अवतार अग्रगण्य समजला जातो.
श्री क्षेत्र कनकेश्वर (ता. अलिबाग, जि. कुलाबा) येथे पुष्टिपतीचा जन्मोत्सव अद्ययावत् सुरू आहे.
गेल्या वैशाख पौर्णिमेस, तो यथोचित साजरा झाला. वैशाख शुद्ध पौर्णिमा हा भारतीय संवत्सरांतला एक अर्थपूर्ण व स्फूर्तिदायक असा दिवस आहे.
चालू वर्षी ८मे या तारखेलाच वैशाख पौर्णिमा होती. हा योगायोग अतीव महत्त्वाचा आहे. ८मे हा ‘व्हाईट लोटस् डे’ म्हणून सुप्रसिद्ध आहे.
वैशाख पौर्णिमेलाच आद्य श्री शंकराचार्य ब्रह्मीभूत झाले. भगवान बुद्धांचा जन्म, संबोधी व महानिर्वाण या तीनही महनीय घटनांची तिथि, वैशाख पौर्णिमाच आहे असे मानले जाते. कूर्मावतार याच दिवशी झाला.
वैदिक वाङ्मयांत गणपती ही युद्ध-देवता आहे. गण म्हणजे विशिष्ट ध्येयाने प्रेरित झालेली, विशिष्ट कार्याच्या सिद्धीसाठी दीक्षा घेतलेली, मुद्रांकित व्यक्ति होय. अशा गणांचा अधिपती तो गणेश. शिव-गण, यम-गण, भूत-गण या पदांत हाच अर्थ अभिप्रेत आहे. गण-पती शब्दांतील गण हे देखील विशिष्ट ध्येयाने मुद्रांकित झालेले असतात. हे गण कवी, म्हणजे विद्वान असतात. गणेश विद्या त्यांनी आत्मसात् केलेली असते.
श्री गणेश विद्येचे स्वरूप सर्वसंग्राहक आहे. गणेश विद्येंत, शास्त्र आणि कला, धर्म आणि नीती, युद्ध आणि शांती या सर्वांचा सामग्र्यानें विचार झाला आहे. ऋग्वेदांतील ब्रह्मणस्पती सूक्तांत गणपती या प्रतीकाचा आद्य आविष्कार झाला आहे.
स्वातंत्र्याची संप्राप्ती व संरक्षण हीं श्री मंगलमूर्ती गणेश या प्रतिकाची दोन प्रमुख लक्षणें आहेत.
स्वातंत्र्य मिळविणें व टिकविणें यांत युद्धाचा अंतर्भाव होतो. म्हणूनच ऋग्वेदीय द्रष्ट्यांनीं, युद्ध-देवता म्हणून गणेश या प्रतिकाची निर्मिति केली.
प्रतीक हे केवळ काल्पनिक नसतें. ध्यानासाठीं, नित्यचिंतनासाठीं तें उभारले जातें. पण, प्रत्येक प्रतीकामागे एक ‘वस्तू’ असतें; एक सत्य असतें. तो कल्पनेचा स्वर विलास नसतो, वस्तूचें ‘एक दर्शन’ असतें.
मंगलमूर्ती हे प्रतीक चैतन्याचें, वीरतेचें, स्वातंत्र्याचें द्योतक आहे. मंगल शब्दांत मंग् हा धातू आहे. त्याचा अर्थ हालचाल करणें, चैतन्य किंवा सचेतन-ता प्रकट करणें, प्रतिक्रिया देणें, असा आहे. मंगल शब्दांत जडतेचा, निश्चेष्टतेचा, क्रियाशून्यतेचा निषेध गर्भित आहे. शौर्य, वीर्य व पराक्रम यांचाही निर्देश आहे. मांगल्य म्हणजे प्रतिक्रिया देणें; निश्चेष्ट पडून राहणें नव्हें.
भगवान पतञ्जलि योगसूत्रांत म्हणतात कीं ॐकार किंवा प्रणव हा ईशत्वाचा वाचक ध्वनी आहे - ‘तस्य वाचक: प्रणव:।’ ईश्वर हा एक पुरुष आहे. तो ‘क्लेशकर्म विपाकाशयाने अपरामृष्ट’ म्हणजे अकलंकित असा आहे.
‘क्लेश कर्म विपाकाशय अपरामृष्ट: पुरुष:-विशेषो ईश्वरा:।’ - येथें पुरुष हें देखील एक प्रतीक आहे. ॐकार हें या पुरुषाचें स्वरूप आहें. श्री गणेशाची मूर्ती - शुंडाविशिष्ट मूर्ती - म्हणजें ओंकार होय.
योगशास्त्रांत देखील ओंकार स्वरूप गणपती या एकमात्र ईश्वराचा उच्चार भगवान् पतञ्जलींनी योगसूत्रांत केलेला आहे.
‘कैवल्य’, ‘ब्राह्मी स्थिती’ इत्यादी अत्त्युच्च् अशा पारमार्थिक ध्येयांची सिद्धी, चतुर्थ किंवा ‘तुरीय’ या संज्ञेने गाणपत्य तंत्रात निर्देशिली आहे. चतुर्थी ही श्री मंगलमूर्तीची तिथी आहे. याचाच अर्थ तृतीयेच्या, त्रिपुटीच्या पलीकडील अवस्था म्हणजे चतुर्थी किंवा ‘तुरीया’ होय. आधुनिक विज्ञानांतील ‘फोर्थ डायमेन्शन’ किंवा ‘चतुर्थ कक्षा’ हा शोध अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. त्या शोधाचेंच एक दर्शन, चतुर्थीनें किंवा ‘तुरीय’ या अवस्थेनें होतें. तत्त्वत:, तुरीय शब्दाचा अर्थ केवळ चतुर्थ नसून, ‘अनंत’ असाच आहे. तुरीय म्हणजे त्रिपुटीपलीकडचें. जागृत-स्वप्न-सुषुप्ति यांच्या पलीकडील जी अवस्था ती तुरीयावस्था. ती स्थलकालादि मर्यादांच्या पलीकडील असल्यामुळे तिचें शब्दांत वर्णन करणें अशक्य आहे.
आग्नेय आशिया, जपान, दक्षिण अमेरिका इत्यादि देशांतहि श्री मंगलमूर्ती या प्रतीकाचे स्मरण करून देणारे अनेक अवशेष माझ्या पहाण्यांत आले.
यज्ञ-संस्थेचा व वेद-वेदांगांचा त्याग करणार्या भगवान बुद्धानें ‘आर्य गणपति-हृदय’ या नावाचे स्तोत्र आपल्या अन्तेवासी शिष्यांना सांगितलें होतें. यावरून गणेश-विद्येचे सर्वस्पर्शित्व सिद्ध होतें.
अज्ञानाच्या, परचक्रांच्या, विकारांच्या व अन्तर्विरोधांच्या सैन्याशीं, अंतरंगांत झगडत असताना ‘ॐ गं’ या महान बीज-मंत्राचा उच्चार गाणपत्य पंथाचे अनुयायी अखंडतेनें करीत असतात.
वैदिक कालीं सीमा प्रदेश ओलांडणार्या आक्रमकांशी व परकीय शत्रूंशी व लढत असतांना, झुंजार ‘गण’ हे ॐ गं याच महामंत्राचा उद्घोष करीत असत. ॐ गं या मंत्राचा २१, २१० किंवा एकवीसशे जप, प्रत्येक दिवशीं केल्यानें आज देखील भारताच्या संरक्षणाला आवश्यक असलेली आध्यात्मिक शक्ती अवतीर्ण होईल, यांत संदेह नाहीं. ‘हरहर महादेव’ या युद्ध-घोषणेप्रमाणें, ‘ॐ गं’ हा मंत्र-घोष स्फूर्तीदायक व यशोदायक आहे.
ॐ ॐ ॐ