घाव टाकीचे या, लागोत चित्तास
अग्निचा कीं झोत, शिरी यावा
धडधडा आपटाव्या, शिला मानेवरी
वेदना ही उरीं, साहवेना!
अनंतता भेटो, याच याच क्षणीं
ना तरी ही फुटो, अशी छाती
शिलाच घेतली, एकदांची हातीं
जगाची न नाती, मला ठावी
अनिवार्य इच्छा, जी जी येते मनी
तियेला वर्तनी, बिंबवावी
अज्ञेय सत्याचा, अदृष्ट जो किरण
तोच इच्छा-जनन, करी आत
इच्छा आणि ज्ञान, वंद्य ती दोन्हीही
सिध्द त्यात होई, व्यष्टितत्व