(१)
अध्यात्माची परमोच्च अवस्था म्हणजे ‘धवलगिरी’. तेथे आरूढ झाल्यावर मुक्तिमान जीवात्मे अमुक्त मानवाच्या मार्गदर्शनासाठी करूणा-कोमल भावाने प्रत्यक्ष मोक्षसंपदेचा त्याग करतात.
ही मुक्तोत्तर अवस्था प्रत्यक्ष मोक्षापेक्षाही श्रेष्ठतर आहे. या अवस्थेची शक्यता व इष्टता प्रकट करणे, हा ‘धवलगिरी’ या ग्रंथाचा मुख्य हेतू आहे.
या अति-सर्वोच्च भूमिकेला ‘जीवन्मुक्त’, ‘अवधूत’ किंवा ‘बोधिसत्त्व’ अशा संज्ञा आहेत. जीवन्मुक्त म्हणजे, ‘जीवन् अपि मुक्त:।’ ज्याला जीवन-सहज असणार्या तृष्णा बद्ध करू शकत नाहीत, तो जीवन्मुक्त. त्याच्या ठिकाणी या तृष्णा अस्तित्वातच नसतात, असे नव्हे; पण त्यांचा स्वभाव किंवा स्वरूप जीवन्मुक्ताने संपूर्णपणे ओळखलेले असते.
तृष्णेची बन्धकता ओळखणे, हाच मोक्ष. वस्तूचे किंवा वासनेचे स्वरूप एकदा ज्ञानात आले; म्हणजे तेथे आपण बद्ध होऊ शकत नाही.
‘ज्ञानान्मोक्ष:।’ हा सिद्धान्त शिकविणार्या आद्य श्रीशंकराचार्यांच्या मनात हाच आशय होता.
मुक्ती, शुचिता, स्वतंत्रता यांचा अर्थ सदैव गतिदर्शक असतो. या अवस्था जडतेच्या, निष्क्रियतेच्या, स्थिर-बिंदूच्या ज्ञापक नाहीत.
शुचिता, मुक्ती व स्वतंत्रता हे अनुभव केव्हाही संपता कामा नयेत. त्यांच्यापुढे पूर्णविराम केव्हाच ठेवता येत नाही. खरोखर पूर्णविरामाची शक्यताच नसते. तो ठेवला, तर तद्विरोधी, प्रतियोगी अवस्थेचा प्रारंभ झालाच.
शुद्धी, मुक्ती, स्वातंत्र्य यांच्यापुढे पूर्णविराम पडला, तर मालिन्य, बद्धत्व व पारतंत्र्य तत्काल सुरू होईल. त्या अवस्था टिकविणे, म्हणजेच त्यांना गतिमान ठेवणे.
शुद्ध, बुद्ध व मुक्त झाले पाहिजे व राहिले पाहिजे. हे रहाणे, म्हणजे ‘रहात’ असणे. स्थिर रहाणे नव्हे. शुचिता रहात असणे, याचा अर्थ मालिन्याला सदैव दूर ठेवीत असणे.
खरी मुक्तावस्था बद्धतेच्या ‘शक्यते’चाही नाश करीत असते. स्वत:च्या बद्धतेचा नाश झाला, तरी जोपर्यंत बद्धतेची अवस्था कोठेही व कोणालाही भोगावी लागत आहे, तोपर्यंत, केवळ त्या एका व्यक्तीला मुक्त होणे, स्व-तंत्र होणे व असणे सर्वथैव अशक्य आहे. पण, हे सत्य प्रतीतीत उतरणे चांगलेच कठीण आहे.
मी एकटा मुक्तच काय, सुखी व संपन्न तरी कसा होऊ शकेन? सौख्य, वैभव, कीर्तीदेखील इतरांच्या संदर्भात, उपमेने व साहाय्याने सार्थ होत असतात, हे आपल्या लक्षात राहत नाही. याचे कारण, त्यांच्या यथार्थ स्वरूपाचे ज्ञान आपल्याला नसते.
मोक्षाचे देखील आपणांस ज्ञान नसेल, तर तो मोक्ष बद्धतेची परिसीमा होय. मला वाटते, मोक्षाचे स्वरूपच असे आहे की, स्वत:च्या व सर्वांच्या बद्धतेचा नाश!
मोक्षाच्या स्वरूप-ज्ञानाची ओळख करून घेणे व ठेवणे, बद्धांनाच काय, मुक्तांनाही आवश्यक आहे.
जीवन्मुक्त महात्म्यांना मोक्षाच्या स्वरूपाचे ज्ञान असल्याने, जेथे बद्धता असेल, तिथे तिचे निराकरण करण्यास ते उपस्थित होणारच.