इंग्रजी चौथी(मराठी ९ वी) मध्ये असताना धार्मिक तासाचे वेळी मुंबईच्या आर्यन एज्युकेशन सोसायटीत शिकत असताना स्पेन्सरच्या तत्त्वज्ञानावर पाऊणतास अस्खलित इंग्रजीमध्ये भाषण करून आपल्या सहाध्यायांना व शिक्षकांना चकित करून सोडले होते.
या असामान्य वक्तृत्व गुणांवरून कै. बॅ. बाबासाहेब जयकर यांनी , `मला खात्री आहे की, कु. विनोद हा आपल्या देशातील दैदिप्यमान नेतृत्वांपैकी एक होईल.' असे भाकित केले होते.
१९३३ सालापासून कुलाबा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संघटना विनोदांनी केली. नारंगी, वाघ्रण, पेढांबे व जवळपासच्या २५-३० खेड्यातील शेतकऱ्यांच्या सभा त्यांच्या मार्गदर्शनाखाली होत असत. त्यावेळी शेतकऱ्यांशी बोलताना त्यांची विद्वत्ता कधीही आड येत नसे.
१९३१ ते १९३८ या काळात त्यांचा मुंबईतील बहुतेक सर्व सार्वजनिक संस्थांशी संबंध आला होता. त्यावेळी गिरगावातील प्रसिद्ध चंद्रमहाल-सूर्यमहाल इमारतीत ते राहत असत. त्या काळात झालेल्या गणपती उत्सवात विनोदांची एका दिवसात २-२/३-३ व्याख्याने होत असत. व्याख्यानांचे विषय
`कला व जीवन', `
मीमांसकांचे संस्कार शास्त्र',
`गीतेतील क्रांतियोग',
`आत्मार्थ व इंद्रियार्थ' असे असत.
याशिवाय वर्षभर प्रत्येक आठवड्यामध्ये सूर्यमहालात त्यांचे ज्ञानेश्वरीवर प्रवचन होत असे. प्रत्येक भाषणाच्यावेळी काहीतरी नवीन विचार, नवीन कल्पना ते मांडत असत. भेटीला येणाऱ्या माणसांचा अखंड ओघ सुरू असताना सुद्धा त्यांचे वाचन आणि मनन सतत सुरू असे.
पुण्यामध्ये १९३७ साली मैत्रेयी विनोदांशी झालेल्या विवाहानंतर स्थायिक झाल्यावर अवघ्या १।।-२ महिन्यात निरनिराळया संस्थांच्या अध्यक्षपदावरून विविध विषयांवर १२-१३ भाषणे झाली. `श्री. तात्यासाहेब केळकरांच्या निधनानंतर आप्पासाहेब विनोद यांच्याकडे सभांच्या अध्यक्षपदांचा वारसा आलेला दिसतो असे त्याकाळच्या पुण्यातल्या ज्येष्ठ व्यक्ती म्हणत असत.
१९३८ साली ऋषीकेशजवळ भरलेल्या अखिल साधक परिषदेचे अध्यक्षपद विनोदांनी भूषविले होते. हिमालयातील गुरूकुलांच्या प्रमुखांना त्यांची साधना, तत्त्वज्ञानाचा व्यासंग आणि गूढविद्यांवरील अधिकाराबद्दल आदर असे. परिषदेला त्या परिसरातील शेकडो साधक उपस्थित होते.
१९४१ मध्ये ते युरोप-अमेरिकेच्या प्रदीर्घ दौऱ्यावर गेले होते. लंडनला असताना बीबीसीवरून त्यांनी श्रीगणपती अथर्वशीर्ष म्हटले होते.
अमेरिकेत गेल्यावर आपल्या दौऱ्यात झालेल्या व्याख्यानांवरून भारतीय संस्कृतीचा आणि जीवनाचा यथार्थ आणि गौरवपूर्ण परिचय त्यांनी अमेरिका श्रोत्यांना करून दिला. न्यूयॉर्क आणि आसपासच्या विद्याकेंद्रांमध्ये `पातंजल योग' आणि `आधुनिक मानसशास्त्र' या एकाच विषयावर केवळ दोन महिन्यांत त्यांची १६ व्याख्याने झाली होती. अमेरिकेतील विविध संस्थांमध्ये व जवळजवळ प्रत्येक रोटरी क्लबमध्ये त्यांची व्याख्याने झाली. अनेक संस्थांचे ते अधिकृत प्रवक्ते होते.