महर्षीची अर्धांगी मैत्रेयी

लक्ष्मण अभ्यंकर

लक्ष्मण अभ्यंकर

 

 

वेणूबाईंचे थोरले बंधू म्हणजे लक्ष्मण महादेव अभ्यंकर. सर्वजण त्यांना तात्या म्हणत. वेणूबाईंपेक्षा अकरा वर्षांनी मोठे. अतिशय मातृपितृ भक्त, परदु:खाने दु:खित होणारे, गरिबांची कणव असणारे असे त्यांचे व्यक्तिमत्व होते.वहिनींच्या म्हणजेच वेणूबाईंच्या मृत्युनंतर तात्या हेच त्यांचे लहानपणीचे परम आधार होते. द्वेष, मत्सर आदि कुत्सित भाव त्यांच्या ठिकाणी मुळीच नव्हते.परंतु त्यांचं बोलणं परखड होते. तात्यांचे आपल्या बहिणीवर म्हणजे वेणूबाईंवर निस्सीम प्रेम होते व ते शेवटपर्यंत तसेच राहीले.

वेणूबाईंच्या जीवन-सौभाग्यात तात्यांचा फारच मोठा वाटा होता. त्यांचे वेणूबाईंवर अपत्यवत प्रेम होते. तात्या म्हणजे परदुःखाने दुःखित होणार्‍या ’विरला’ लोकांपैकी होता. त्याला गरिबांची फ़ारच कणव येई. घरातील मोलकरीण, परटीण, गुरवीण, महारीण, कल्हईवाली, गौळण या सर्व सामान्यतः गरीब स्थितीतील मंडळींची त्यांना दया येई. त्यांना मदत करून त्यांचे काम हलके करण्यास ते सदैव तत्पर असे. स्वतः कष्ट सोसून ते इतरांची कामे करी. आईचा तिच्या या मुलावर फारच जीव होता. ती त्यांचे खूप लाड करी. घरातील प्रत्येक समारंभाचे वेळी लक्ष्मण म्हणजे तिचा उजवा हात असे. त्यांना कोणतेही काम सांगावे लागत नसे. ते काम तात्या स्वतःच करून टाकीत.

वेणूबाईंच्या शालेय शिक्षणाच्या काळात त्यांचे वेणूबाईंना अमोल सहाय्य झाले. वहिनी (आई) वारल्यानंतर तात्यांच्या सहवासात वेणूबाई होत्या. तात्या वेणूबाईंना दररोज पहाटे उठवीत असत. चहा देऊन अभ्यासास बसवत, घरकामात शक्य ती मदत करत. वेणूबाईंच्या बारीकसारीक हौशीही त्यांनी पुरवल्या. बालगंधर्वाची नाटके त्यांनीच दाखवली.  वहिनीच्या म्हणजे आईच्या मृत्युनंतर ते व वेणूबाई मिळून घरातील सर्व कामे करत असत, पण त्यातही  त्यांनी वेणूबाईंच्या वाटणीची म्हणून कामे वगळून ठेवली नाहीत. परीक्षेतील सुयशाकरीता तात्या दरवर्षी वेणूबाईंच्या वार्षिक परीक्षेच्या अगोदर गुरूचरित्राचा सप्ताह करत. वेणूबाईंच्या यशाने ते आनंदित होत. विश्वविद्यालयीन परिक्षांच्या वेळी ते दररोज वेणूबाईंना परिक्षास्थानी नेऊन पोहोचवीत व परत आणण्यास अगदी वेळेवर जात. वेणूबाई उत्तीर्ण झाल्या की ते सत्यनारायण करीत. मॅट्रिकच्या घवघवीत यशाने त्यांनी चौघडा लावला होता. मंडईजवळील रामेश्वराला लघुरूद्र केला होता. वेणूबाईंच्या प्रत्येक सत्काराच्या वेळी तात्या इतके आनंदित होत की त्यांच्या ऑफिसमधले त्यांचे सहकारी त्यांना चिडवत देखील, ’ अरे तात्या, वेणू पास झाली की तू ? तुझा आनंद व उत्साह पाहून आम्हाला जरा शंका आली म्हणून विचारले.’ धाकट्या बहिणीवर इतके अकृत्रिम प्रेम करणारे भाऊ फार कमी असतात. आपण शिकू शकलो नाही. आपल्या वडीलांनी शिकवले नाही, याबद्दलची ते कधीही तक्रार करत नसत. वेणूबाईंच्या सुयशानेच ते आनंदित होत असत. दुसर्‍याच्या सुखाने आनंदित होणारी मंडळी जगात फ़ारच थोडी असतात, त्यापैकी तात्या एक होते.

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search