न्यायरत्नांच्या पश्चात शांतिमंदिराची परंपरा कशी चालणार याबाबत मैत्रेयींना फार काळजी वाटत होती.
१९७० मध्ये "महर्षि विनोद सिद्धाश्रम सेवा मंडळाची" स्थापना झाली होती.
व्यास पूजा महोत्सव, दत्तजयंतीचा उत्सव, विवेकानंद जयंती उत्सव, बुद्ध जयंती व शंकराचार्य पुण्यतिथीचा उत्सव असे चार कार्यक्रम वर्षात मोठ्या उत्साहाने करण्याची वर्षानुवर्षांची परंपरा होती. व्यास पूजा महोत्सवाने पुण्यात एक व्यासपीठ निर्माण केले होते. त्याला स्वतंत्र दर्जा प्राप्त झाला होता.त्या पद्धतीने तो कार्यक्रम पार पाडण्याची फारच मोठी जबाबदारी मैत्रेयीबाईंवर होती. न्यायरत्नांच्या निर्वाणानंतर पंधराच दिवसांनी व्यासपूजामहोत्सव आला. न्यायरत्नांच्या शिष्यवर्गाने ह्या उत्सवात मनापासून भाग घेतला होता. न्यायरत्नांच्या मुंबईच्या भक्तांनी मोठमोठे कार्यक्रम केले.
न्यायरत्नांच्या नावाने प्राथमिक शाळा सुरू करण्याच्या उद्देशाने त्यांच्या जन्मगावी (केतकीचा मळा, ता.अलिबाग)’महर्षि विनोद प्राथमिक विद्यामंदिर’ या नावाने शाळा सुरू केली.
शांतिमंदिर न्यायरत्नांच्या वास्तव्याने पवित्र झालेले होते परंतु त्यांचे एखादे तैलचित्र असावे अशी मैत्रेयीबाईंची इच्छा होती
.
त्यांनी श्री. डी.डी.रेगे यांना विनंती केली. डी.डी.रेगे यांना न्यायरत्नांबद्दल अत्यंत आदर होता. त्यांनी अत्यंत अल्प मानधनात न्यायरत्नांचे एक पूर्णाकृती पण बसलेले तैलचित्र काढले.तेच तैलचित्र मैत्रेयीबाईंनी न्यायरत्नांच्या पलंगावर ठेवले.
तसेच श्री.बी.आर.खेडकर यांनी मैत्रेयीबाईंच्या आग्रहावरून न्यायरत्नांचा एक अर्धाकृति ब्रॉंझचा पुतळा तयार केला.तो शांति-मंदिरमधील हॉलमध्ये विधिपूर्वक प्रस्थापित करण्यात आला. त्यावेळी महर्षींचे जवळचे शिष्य गुजराथेतील चांदोद पीठाचे परिव्राजकाचार्य अनिरुध्दाचार्यमहाराज जातीने उपस्थित होते.
शेवटची काही वर्षे मैत्रेयीबाई अमेरिकेत आपल्या मोठ्या मुलाकडे (ह्र्षीकेश)होत्या. तेथे मैत्रेयीबाई ह्रदयविकाराने आजारी पडल्या. त्यांच्यासाठी अमेरिकेतलं आजारपण हा एक विलक्षण आणि चमत्कारिक अनुभव होता. त्यावेळी ह्र्षीकेश, उदयन, संप्रसाद व दोन्ही सुना- डॉ. अरुंधती व डॉ. शीला यांनी त्यांची खुपच काळजी घेतली. मृत्युला सामोरं जाऊन येण्याचा तो अनुभव होता. त्या तृप्त होत्या परंतु आपल्याला अमेरिकेत मृत्यु यावा अशी त्यांची इच्छा नव्हती. भारतात मृत्यु आला तर भारतातच पुनर्जन्म मिळेल असा त्यांचा विश्वास होता. प्रकृति चांगली नसतानाही त्यांनी भारतात येण्याचा निर्णय घेतला व त्या भारतात आल्या.