सार्वजनिक जीवन
अनेक संस्थांशी त्यांचे जवळचे ऋणानुबंध होते. अशा संस्थांचे कार्यकर्ते विनोदांचे मार्गदर्शन व सहाय्य घेण्यासाठी येत असत.
एखादा वादाचा मुद्दा उपस्थित झाला तर सर्व दृष्टीने व दूरगामी विचार करून निरपेक्ष बुद्धीने ते निर्णय देत असत. त्यामुळे दोन्ही बाजूंना न्याय मिळाल्याचे समाधान वाटे. अतिशय गोड शब्दांत वादाची दुसरी बाजू , विशेषत: कौंटुंबिक भांडणामध्यते समजावून देत. समोरच्या व्यक्तीच्या तोंडून जे योग्य असेल तेच बाहेर पडेल असे प्रश्न विचारीत. यामुळे ती व्यक्ती दुखावली न जाता तिला योग्यायोग्य समजून येत असे. या निर्णय कौशल्याच्या दृष्टीने न्यायरत्न ही पदवी त्यांना साजेशी होती. अनेक अटीतटीचे प्रसंग त्यांच्या मध्यस्थीमुळे निर्णायकपणे पार पडले होते.
`साहित्यनिर्मिती आणि संशोधन यांनाच न्यायरत्नांनी वाहून घेतले असते तर रानडे, टिळकांनंतर महाराष्ट्रात तरी इतक्या बौद्धिक आवाक्याची व्यक्ती झाली नाही हे सर्वांच्या लक्षात आले असते', असे प्रो. दामले म्हणायचे.
विनोदांच्या पिंडात बुद्धीसामर्थ्यापेक्षाही प्रबळ व खोल संवेदनक्षमता होती. म्हणून `निघे जेथे जेथे, मंद करून खास, तिथे माझा श्वास असो देवा' या वृत्तीने ते जाणतेपणी सतत वागले. त्यातच त्यांची कार्यशक्ती प्रामुख्याने उपयोगात आली.
ते असं म्हणत असत की प्रतिपक्षाला कधीही समोर बसून चर्चा करून नये कारण त्यामुळे तुमची तोंडे परस्परविरुद्ध दिशेकडे वळलेली असतात. परंतु, तेच आपण जर त्याच्याकडे मित्र म्हणून पाहिले. त्याचे संपूर्ण म्हणणे ऐकून घेतले, पटत नसले तरी थोडे बहुत मान्य आहे असा विधायक सूर काढला तर प्रतिपक्षाचा जोर आपोआप थंड होतो. अनाग्रही वृत्ती परिणामी हितकारक ठरते.
त्यांना दलितांविषयी अतिशय कळवळा होता. त्यांच्यावरील अन्यायाची जाण त्यांना होती आणि हा अन्याय दूर करण्याची तीव्र तळमळ त्यांच्या ठायी होती.
त्यांच्याकडे आपत्तींमुळे निराश झालेले, शारिरीक दुखण्यांमुळे त्रासलेले, मनाचा तोल ढासळलेले, सर्व वयाचे, जाती-वंश-पंथाचे, स्त्री-पुरूष मदत मागण्यासाठी येत असत. अशी व्यक्ती स्वत:च्या पायावर उभे राहण्याइतका प्रयत्न करू शकेल, शांतपणे विचार करू शकेल, स्वत:ची जबाबदारी थोडीफार ओळखू शकेल इतका आशावाद ते निर्माण करीत असत. अशा व्यक्तिला निराशेतून अंशत: मुक्त केल्यावर, हळुहळू वस्तुस्थिती समजावून देऊन, प्रसंगाला सामोरे कसे जावे हे प्रेमाने व चतुरपणे ते सांगत असत. अशा तऱ्हेने समजावणी झाल्यावर स्वत:च्या पायावर पुन्हा उभे राहिलेल्या असंख्य व्यक्ती आजही आहेत.
या समुपदेशनाच्या जोडीला आहार, आयुर्वेदिक औषधोपचार आणि गूढ शास्त्रांद्वारे केलेली चिकित्सा ते अंमलात आणीत असत.