भवानी पूजेला, आणिले भंडार। वासनांना ठार, करूनीयां ॥ मेलेल्या इच्छांनीं, रक्ताळले चित्त। संपादिलें वित्त, विरक्तीचें ॥१॥
सखे अनंतते, असला जीवात्मा हा। तुझ्या पायीं वहावा, हीच इच्छा ॥ प्रकार प्रेमाचे, पाहुनी भोंवती। अंतरीची खंती, सदा वाढे ॥२॥
द्रव्य वा शरीर, प्रेम तें तयांवरी। सर्व जनता करी, भ्रांति योगें ॥ दोन आत्म्यांचें जें, दिव्य एकीकरण। प्रेम ते चुंबन, अतींद्रिय ॥३॥
विरोधी भावांनी, विनटलेला जीव। सांडितो न शीव, संशयांची ॥ हंसे तोंडावरी, फाकलेलें दिसे। अंतरी कांहीसे, परी दु:ख ॥४॥
समजल्या सत्याचा, काही एक प्रांत। राहतो अज्ञात, बुद्धीला या ॥ दोन जीवांमध्ये, फुलेल्या प्रेमाला। वास केव्हा आला, पूर्णतेचा ॥५॥