अभंग

वरितील निर्वाण, शांति-ब्रह्म

प्रमादांची शय्या, नीतिवालेसाठीं। तसें धर्मापोटी, रक्तपात ॥ उषेच्या पूर्वी हा, काळोख पाहणें। भक्तिला साहणें, विरह-दु:ख ॥१॥

जेथ-तेथें बोंचे, अशी अपूर्णता। कधीं अनंतता, मिळे मजला ॥ अफाट या नभीं, एक इवला पंख। पाहतांच हरिख, मना वाटे ॥२॥

वनांत निर्जन, झोंपडी एकली। अशी कां राहिली, खडी तेथें ॥ पापात्मा मी असा, तरी इच्छा एक। मारिते कां हाक, अनंततेला ॥३॥

पाथेय गीतांचें, सवें घेऊनी यां। मार्ग चालावया, लागलों मीं ॥ परीं हे वाढते, गीतांचें वैभव। आणि आत्म-देव, असंतुष्ट ॥४॥

संपेल जेव्हां तें, तेव्हांच हे प्राण। वरितील निर्वाण, शांति-ब्रह्म ॥ करितात आशा या, सदा लंगडधीन। पाऊलें पुढें न, परि त्यांचीं ॥५॥

जागच्या जागींच, वरी खाली पाय। करुनीया काय, प्राप्त होई ॥ सांत-तेचे माझ्या, इवलेंसें अंगण। तेथ लंगडधीन, असें चाले ॥६॥

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search