अभंग

तुझ्याच प्रेमाची मूर्ति माझ्या मनीं। जणूं सिंहासनी अंबामाई।

आणि कोठे गेला तुझा तो विश्वास।

तुझा गूढ हास आनंदाचा॥

मनांत कां आले स्वैर स्वप्न कांही।

चित्त कोठे जाई - भटकाया॥४३॥

 

मनांत उदेला प्रेमभाव जेव्हा।

तेव्हांच या जीवा शांति आली॥

तुझ्याच प्रेमाची मूर्ति माझ्या मनीं।

जणूं सिंहासनी अंबामाई॥४४॥

 

प्रेमाचे हे गूढ कोण उकलील।

जयाने जीवन अलंकृत॥

कुणा अभाग्याला - प्रेम झालें ज्ञात।

तयाला जीवित - शव रूप॥४५॥

 

प्रेमदेवा तुम्हीं रहावे अज्ञेय।

नातरी अपाय आनंदाला॥

रहस्य प्रेमाचे स्पष्ट झाल्यावरी।

जीवाने शरीरी राहू नये॥४६॥

 

ज्ञात्वाची जी सीमा ध्येयाचा जो अंत।

तया नांव प्रीत दिले असे॥

पूज्यतेचा वास मांगल्याचा ध्यास।

पूर्णतेचा - प्रीति हा उल्हास॥४७॥

 

हात तो एकदां ओठाशी ह्या ठेव।

जीवाचा आरव ऐक माझ्या॥

कधी काळी हात तुझा पुढे।

माझी ही आरोळी आठवील॥४८॥

 

मनाच्या देहाच्या - अणूरेणू मध्यें।

तुझ्याच सुगंधे वास केला॥

नेत्रांत ध्यानांत स्वप्नांत प्राणांत।

खेळे तुझी मूर्त अनंत-ते॥४९॥

 

मनाच्या विश्वाच्या अणुरेणुमध्यें।

तुझ्या प्रेमगंधे वास केला॥

श्वासांत गीतांत तोच माझ्या स्फुरे।

कां बरे हंसे हें - तुझ्या ओठी॥५०॥

 

संशयाचे सदा पिशाच नाचते।

पुन्हा चित्त होतें दु:खमग्न॥

खरेच ना तुझे प्रेम माझ्यावरी।

नि:शंक अंतरी असू ना मी॥५१॥

 

एक सुद्धा जीव तुला न आवडो।

अत्स्वरूपीं जडो तुझे चित्त॥

खेळो तुझें प्राण माझ्याच गीतांत।

नेत्र मिळो नेत्रि क्षणो क्षणीं॥५२॥

 

चित्त माझे तुला एकदा अर्पिले।

एकदां स्वीकारलें तया तूं ही॥

कुठेंही फेकूंन तयाला दे आतां।

सखे ते सर्वथा तुझेच ना॥५३॥

 

दिलेले हृदय मागितले कुणी।

न जाई नयनी अश्रु पुन्हा॥

उमलले फूल - तारा लकाकला।

तेज-गंध गेले - विश्वांतरी॥

तसे माझे प्रेम तुला जें वाहिले।

ममत्व नुरेलें - तेथे माझें॥५४॥

 

आत्म्याच्या पाकळया सहस्त्र जन्मांनी।

झाल्या या मोकळया अचानक॥

निघाया तेथून लागला सौरभ।

भरे पृथ्वि हें नभ तयानेंच॥

फुलांना सुवास - तारकांना तेज।

प्राप्त् झाले आज - माझ्यामुळे॥५५॥

 

प्रेम हेच माझे काव्य शास्त्र नीति।

आत्मिक संपत्ति ज्ञान-धर्म॥

विश्व प्रेमामध्ये आत्मा राही दंग।

झालो मी नि:संग - स्वत:शीही॥५६॥

 

अशरीर जीव अमानस प्रेम।

हें कर्म निरिच्छ आचरिलें॥

गीतें ही गाइली - स्वत्वाला सोडून।

विश्वाचे चोरून गूढ नाद॥५७॥

१७-११-५८

तुझ्या मनीं मात्र असावे काहीही।

आणि मला नाही स्वतंत्रता॥

फुलांना तार्‍यांना पहात हुंगीत।

आनंदाने चित्त - तुझे नाचे॥

तुझ्याच मूर्तीत फुले आणि तारा।

जीव हा त्वन्मात्र - ओळखील॥५८॥

 

परत हें कितीदां प्रेम माझं आलें।

कुणीं न घेतले स्वत:पाशी॥

नको प्रेमदेवा दुज्यांना अलिंगू।

नको काणा सांगू अर्चिण्यास ॥ (अर्पिण्यास)

स्वत्वांत माझ्याच सर्वदा रहा ना।

सर्वदा नहा ना आत्म तेजे॥५९॥

 

स्वत:चेच स्वप्न विश्व संस्थितिही।

नियति बंध नाहीं तया मुळीं॥६०॥

 

देह तेथे मन असो माझे सदां।

नको या आपदा कल्पनांच्या॥६१॥

 

ज्ञान माझे सारे तुला अलिंगाया।

जातांच विलया - स्वये जाई॥६२॥

 

तुझे हे चिंतन केले आजवरी ॥६३॥

 

क्षणाचा हा मोह सर्व माझे प्रेम।

पावेल विराम - इतुक्यात ॥

कशाला यातना मनाने भोगण्या।

गीति का मीं गाण्या निराशेच्या ॥६४॥

 

दोन नेत्रांमुळे अस्तित्व दृष्टीला।

दोन हातांमुळें क्रियासिद्धि ॥

दोन ओठांमुळे गीति _____ माझी ।

दोन प्रेमें तुझी _______ ताई ॥६५॥

 

दृष्टि तेजाळली मोह गेला सरूनी।

प्रेम गेले मरूनी - मनांतले ॥

तयाची समाधि उभारे अंतरी।

सत्वरी तिला - जीवा ॥

ज्ञानाची देवता स्थळीं त्या पूजिता।

निराशेची कथा नको चित्ती ॥६६॥

 

अध:पात झाला पाय हा सरकला।

देव कीं भंगला देऊळांत ॥

तुझा शब्द आला इतुक्यांत भोवती।

अर्थबीजे रुतली मनाच्या शेतांत ॥६७॥ (अभंगांत पिके त्यांची सजलीं)

 

अभ्रपटले आली मला सांगावया।

आणि मीं गावया लागलो हा ॥

गाण्यांत माझ्या जे असती सुप्त।

अभ्रांच्या भोवतीं पाहू क्षणैक ॥६८॥ (आत्म दिसे अर्थ दिप्त)

 

अडखळे खडकांत जशी ही ज__ ।

तुझ्या दिव्य प्रेमी तशी मीं ही ॥

तुझे सुद्धा हृदय शिलेचे या कृष्ण।

माझें ही जीवन असे आ____ ॥६९॥

 

मनोदेवते - जे, वंद्य वाटे तुला।

आचार तो भला सर्व काळीं ॥

सौंदर्य भासले तुझ्या नेत्राला जें।

तेंच पूज्य झालें सर्व ठायी ॥

दिव्य प्रतिध्यनीं तुझ्याच आज्ञेचा।

संभार शास्त्रांचा असे सर्व ॥७०॥

 

कशाला हा प्रेमें आंसवे अंतरी।

सत्यदेवी दूरी जरी राहे त्याने ॥

करू येना जीवा सत्याचे पूजन।

प्रेमाचे मीलन नको कोठें॥

सत्य हेची एक मला सर्वां पूज्य।

__________ फेंक तिच्या पायी ॥७१॥

 

ओठांत माझ्या जे प्रेमशब्द आले।

तयांना धाडिले पुन्हां चित्तीं ॥

नाचाया लाज ही लागते।

तिला मागे घेते क्षणो क्षणीं ॥

नेत्र हा बावरे प्रेम लागे बिंबू।

मनीं - ध्येय जागे परी होई ॥

आंसे थांबवीत प्रीतिचा आवेग।

विझविली मीं आग - मनांतील ॥७२॥

 

प्रेम ही विकृती नसो चित्ता ठावी।

सत्य - मात्र व्हावी - जिविताशा ॥

सत्य तेज तितुके दिसावे दृष्टिला।

नेत्र अंध व्हावा बाह्य विश्वीं ॥

देऊळ सत्याचे प्रेम गंगेकाठी।

प्रेम - सत्य भेटी - असंभाव्य ॥

प्रेम सलिला मधुनी बाहेर येऊन।

देऊ अलिंगन सत्य देवा ॥७३॥

 

तुझ्या चित्तामध्ये पोळले विचार ।

तयांचा उच्चर - मीच केला ॥

तुझ्या हृदयामध्यें वाढली जी आस।

तियेचाच ध्यास मला होता ॥

तुझ्या आत्म्यामध्ये ध्येय जे लुकलुके।

तितुकेच ठाउके तुला सुद्धा ॥७४॥

 

किती वेळा रडूं किती वेळा स्मरूं।

धीर चित्ती धरूं सख्या किती ॥

घेच ना एकदां हात हा हातांत।

प्राण या देहांत नुरे मुळीं ॥

तुझ्यांच हृदयांशी भिडेन क्षणभरी।

श्वास तेव्हा उरी यावयाचा॥७५॥

 

शिला भव्य हीच - हेच तें आकाश।

इथे मीं अशीच उभी होते ॥

पावलें ही अशीच चोरूनी न्याहाळीत।

तुझे गूढ गीत - गायिलेंस ॥

नेत्र आणि प्राण तुझ्याच चरणावरी।

तत्क्षणीं सत्वरीं - वाहिलें मीं ॥

चिरं सत्याची ती लुकलुके तारका।

तीच एकमेकां - दावु ये ना ॥७६॥

 

सत्याच्या स्थली तुझे माझे प्राण।

करूं संतर्पण - एकदांचे ॥

मानवी नाती ही असावी कशाला।

सत्य पूजनाला - नको स्वत्व ॥७७॥

 

१८-११-५८

सप्त:च्या अंतरा विचारूनी पहा।

विश्रब्ध तूं तुझ्या इच्छेने ॥

आत्म्याने मृत्यूलोकी ।

तुझ्या ___________ मी ॥

फेकिली कराने जन्मजन्मी।

कुणाचे न प्रेम जडायाचे मला ॥७८॥ (सत्य मात्र झाला जीव माझा)

 

अनुभवाची शिंपी फोडुनीया टाक।

आनंद मौक्तिक नसे त्यांत ॥

ज्ञानाचा तिमिर हा बुद्धिनेत्र दिसे।

जीव हा फसतसे तयामध्ये॥

देवाचे खूळ ते करो माझ्या चित्ती।

सदा शून्य वृत्ति असो जीव॥७९॥

 

ज्ञानाची मोहिनी नको अंतरांत।

नको भक्तिगीत मुखामध्ये॥

नको आत्म्याला या परमात्म दर्शन।

नको योग ध्यान पात___ल॥

तुझ्या प्रेमाची ही पिऊनी वारुणी।

फिरूं दे जीवनी शून्यदेवि॥८०॥

 

तुझ्या वस्त्रावरी तुषार प्रीतीचे।

असे निरंतर उडविले मीं ॥

तुझ्या चित्तामध्ये किती गीत ध्वनी।

ठेविले पेरूनी अनंतते ॥

सुखे जाऊं, तूं, मी शून्य देशीं आतां।

अशी गीतें गाता-निरर्थक ॥८१॥

 

पु ____ पावलांनी तुझ्या स्पर्शिलेले ।

खडे ते शोभले हिरे जैसे ॥

तुझ्या निश्वासांनी भारलेली हवा।

सौरभाचा ठेवा येथ आणी ॥

तझ्याच आनंदे आकाश हंसले।

तारकांचे कुठले तेजनाद ॥८२॥

 

गीत माझे येथे तुझा जीव दूर।

नेत्रि अश्रुधूर असा चाले ॥

अदृष्ट हात तो पुशी या नेत्रांना।

मृत्यूनी न थांबे माझा श्वास ॥८३॥ (आवडे हा ध्यास अनंतते)

 

येतसे सुवास पुष्प तें कां दूर।

येत ऐकू सूर कंठ कोठे ॥

दिसे एक किरण अदृष्य तारक।

होई न ठाउक मला कां तो ॥८४॥

 

अनंतत्व नांदे प्रत्येक दृष्यांत।

प्रत्येक शब्दांत वाक्य हेतु ॥

गायिल्या स्वरांत गीत ते अवतरे।

रश्मि रुपें फिरे तेज तैसे ॥८५॥

 

मनाचीं सर्व जीं उपांगे सिद्धली।

तृप्त् त्यांची झाली पाहिजेच ॥

दिदृक्षा जिज्ञासा वासना भावना।

साफल्य सर्वांना सहाजिक॥८६॥

 

समुदाय दृष्यांचा सांतत्व मंदिरी।

अनंतेचें करी चिरंध्यान ॥

विरोधी साम्यता प्रकाश ध्वातात।

वसतसे मृत्यूंत अमृतत्व ॥८७॥

 

ज्ञानास श्रद्धेचे अधिष्ठान लाजे।

नीती हेतु वागे स्वैर चित्तीं ॥

अस्वतंत्र जीवा नीती नसे ध्येय।

देवही अविषय मुक्त चित्ता॥

सांतता ही असो सखी ।

तिच्या मात्र प्रेमीं जीव रंगे ॥८८॥

 

वर्तनांत राही गुप्त जें ध्येय तें।

जीवितास देतें हेतुवत्ता ॥

कृतींत बिंबतो मनींचा हेतु।

म्हणून आचार नीति विषय ॥८९॥

 

कालांचे कुंपण सांत आभासांना।

विरोधाचे ज्ञान - मानवांच्या ॥

सांत दृष्यांमध्ये मानव्य बुद्धीला।

कधीही न झाला ईश लाभ ॥९०॥

 

सत्य सृष्टीमध्ये दिसे नियमवत्ता।

आशेस सर्वथा ____ बंध ॥

मनाचे साम्राज्य पसरले निस्सीम।

नसे नेमानेम वासनेला ॥९१॥

 

मनोवृत्ति म्हणजे नसे आत्मतत्व।

तयाचें अस्तित्व अतर्केय ॥

नाम रुप रंग हें न सत्य ज्ञान।

स्वरोच्चार गान कसें व्हावे ॥९२॥

 

सेंद्रिय स्वत्वांत सत्य जें अवतरे।

व्यष्टित्व तें खरे - ओळखावे ॥

स्वयं नेतृत्व तें तेथ दिसते कांही।

अनंतांत राही पूर्णत: जें ॥९३॥

 

२०-११-५८

विशेषणे भव्य सांत अस्थित्वें हि।

अनंतता होई विशेष ज्या ॥

पूर्ण स्वरूपाचें अपूर्णांत ज्ञान।

अंश - योगी ध्यान एकतेचे ॥९४॥

 

वैगुण्य एवढे मानवी बुद्धीचे।

तिला न व्हायाचे पूर्ण ज्ञान ॥

कळे अंश-मात्र पूर्णता- अज्ञेय।

प्रतींद्रिय ध्येय मूर्ति, गूढ ती, न ॥९५॥

 

नामरुपानीच अनंतेचे ज्ञान।

शब्दस्वरे गान भावनेचे॥

सुवास-पाकळया, आकार-रंगांत।

पुष्पसत्य गुप्त असायाचें ॥९६॥

 

सामान्य दृष्यांत व्यष्टित्व देखणें।

ज्ञानवृद्धि होणे अशायोगें ॥

अविशिष्ट अनुभवीं वैशिष्ट जें गुप्त।

तयाला शोधीत बुद्धिनेत्र ॥९७॥

 

अस्तित्व तेवढे कळतसे सर्वदा।

सत्यता ती कदा ज्ञेय होई ॥

देह हा भागिला जन्मल्या पासुनी।

आत्म-तत्व ध्यानीं कधी यावे॥९८॥

 

परा पश्यंतीचे बंध ते शब्दांना।

अनुभवाचे ज्ञान नको वाणी॥

रंग रुपांचे हे पाश आभासांना।

कैवल्य चिंतन कशाला ते ॥९९॥

 

स्फुरद्रूपे जीं जी येथही विखुरली।

तयांत बिंबली तिरंतन-ता ॥

दिसें जें तें येथे अल्प मात्र सत्य।

असें ते अपत्य पूर्णतेचे ॥१००॥

 

दर्पणांत असला जरी बिंब नेत्र।

तयाला न दिसत रुप माझे ॥

मायिकांत ब्रम्ह बिंब भावे।

कसें तें दिसावे मायिकाला ॥

आत्म्यास होतसे स्वत:चेच ज्ञान।

विश्वाचा दर्पण - बिंब हेतु ॥

आत्म सत्य कळण्या विश्व हें साधन।

स्वत:चे पूजन - देवपूजा ॥१०१॥

 

आकाश दर्पणी सृष्टीचा बिंबतो।

शून्य चित्तीं स्थिरते सत्यता न ॥

प्रतिभास वस्तूंचा होतसे सलिलांत।

प्रेमार्द्र चित्तांत केवलाचा ॥१०२॥

 

ध्येय सृष्टीमध्ये तेज जे भांसले।

जनन त्याचे झाले सत्य-तेंत ॥

उच्च्तर वस्तुं ता ध्येय त्याचे नाव।

अशक्यत्व भाव _____ ते न ध्येय॥१०३॥

 

इच्छांचे साफल्य व्हावया साधन।

तेवढेच ज्ञान नको मला ॥

ज्ञानाची केवल इच्छा ही अंतरी।

तेवढाच सफल करी देवा ॥१०४॥

 

मला ईश्वराचे कार्याचे ज्ञान कैसे व्हावे।

सुवासाने ध्यावे पुष्प कैसे ॥

गीतांस गायक कसा ओळखावा।

शब्द मात्र ठावा - कसा हेतु ॥१०५॥

 

ज्ञानाची गांठिली एकदां परिसीमा।

वाहिला हा प्रेमा - तुझ्या पायीं ॥

नीती धर्म आणिले आचार।

कधीं होसी प्राप्त अनंत-ते ॥१०६॥

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search