प्रति प्रेम नाही तुला देता येत ।
भाव हे अज्ञात गूढ माझें॥
तुझा काय दोष सौंदर्य अंधाला।
भक्ति तर्कटाला - निरर्थक॥३३॥
दृष्टि गेली आता तुझ्या वरुनी पुढे।
चित्त झाले खडे शून्यतेंत॥
मला नाही उरली मागील बंधनें।
संपली वंदने - देवतांना॥
फूल हे विश्वाचे वाहिले स्वत:ला।
देव भक्त झाला - आज माझा॥३४॥
देव गाई मला प्रार्थना संगीत।
आत्म-ध्यान जीव माझा॥
माझ्या चरणकमली माझ्या कुणाचे निटिल हें।
काय निजला आहे - देव तेथे॥
उठ देवराया - तुला माझे अभय।
नको भिजवू-पाय आसवांनी॥३५॥
आनंद सांडला - भग्न चित्तांतून।
गीत ते निघून कुठें गेले॥
जावयाचे कोठे - सखीच्या चित्तांत।
असावे तें सुप्त् - अजूनीही॥३६॥
शब्द हे फेकितों - हवे मध्ये सदा।
हांसतो गद्गदा - अंतरात॥
तुम्ही ऐका गीते - परी आनंद हा।
तुम्हां सर्व सदा ना कळेल॥३७॥
उड्डाण केले हे अखेरीचे आतां।
विश्वास सर्वथा - विसरलो॥
पंख माझे झाले - शून्यामध्ये स्तब्ध।
माझ्याशी संबंध - नुरे माझा॥३८॥
प्रेम क्षणा अनंत ही युगे । (साठी?)
धावलो मीं मागें सावलीच्या॥
माझीच सांवली मला माझे प्रेम।
मिळूनी निष्काम आज झालों॥३९॥
एकच हे हंसे तुम्हांला सांगत।
गीत हे नाचते जन्मजन्मी॥
देवाजीची माझी पडूनिया गांठ।
झाली फिटं फाट - हृदयांची॥४०॥
आश्चर्ये पाहिली वरी खाली नभीं।
तशी मनोगर्भी तुझ्या माझ्या॥
एवढे आश्चर्य परी हे मोहक।
तुला न ठाऊक मीं तूं, मला॥४१॥ (मला न ठाऊक तूं, तुला मी)
कथिता हे प्रेम कशी हासलीस।
वरी पाहिलेंस आनंदाने॥
तुला विचारिले तूंहि दिलें स्मित।
झाले कां विस्मृत तुला तें ही॥४२॥