तृप्त होणार्या ह्या क्षुद्र इच्छा माझ्या ।
नांव त्यांचे तयां-कसे द्यावें॥
एक सुद्धा इच्छा थोडकीशी स्वैर।
सफळ ना होणार जीविती या ॥
अशा या ठरलेल्या जीवनक्रमांत।
कसे कां हें चित्त व्यग्र माझे ॥२२॥
कशाला मर्यादा असाव्या सर्वत्र।
आभाळांचे छत्र कां वरी हे ॥
कां मला ही तळमळ सत्य शोधाची।
सृष्टि संभ्रमांची कां न सेव्य॥२३॥
दृश्य झाल्या सीमा ज्ञान होतां क्षणी।
स्वैरता जीवनी नसें जरा॥
नियति शृंखला ठोकुनी पायांत।
कसा मी स्वतंत्र - फिरू सांगा॥
हातांत इच्छांच्या - जीविताचे सूत्र।
सुख दु:ख व्हायाचे - गौण हेंतू ॥२४॥
मायभूमि माझी दास्यांत रुतलेली ।
बंधु हें भंवताली - अकिंचन॥
माय बहिणी माझ्या अज्ञान-गर्तेंत।
कां न शून्य भक्त - असावे मीं॥२५॥
मन:क्षितिजावरी तेज हे उदेले।
बिंब हें खुलेले प्रेमरुप॥
नको मजला तसली शब्द सत्ये क्षुद्र।
जीव जो प्रेमार्द्र पूज्य तोच॥
सत्य-शोधनाचे असें हे अंतिम।
प्रेम जें निष्कर्म - व्यक्तिनिष्ठ ॥२६॥
प्रेमभावाचा जो अंतरी विकास।
सफलता तयास स्वयंनिष्ठ ॥
प्रति-प्रेम न लगे नि:स्वार्थ भावाला।
निराशेचा तया स्पर्श कुठला। ॥२७॥
माझे कितीदां सांडलो ।
न कळताच॥
कां न पाहिलेस मानस दृष्टिने।
कसें लक्ष्यार्थाने - वाच्य व्हावे॥२८॥
ऐक्य भाव व्हावे एकमेकां ज्ञात।
नि:शब्द गीतांत सहजतेने॥
अनुभवावे प्रेम आंतर वृत्तीनें।
कसें लक्ष्यार्थाने वाच्य व्हावे॥२९॥
हृदय कुरवाळिते सदां बाबल्याला।
दृष्टि ही चंदूला न्हाउ घाली॥
भोवती कृष्णेचे दिव्यतेज नाचे।
आत्म्यांत वास्तव्य तुझें सुलू॥
शून्यता अनंतता मायभू-दीनता।
पूजितो देवता - एवढ्याच॥
जात मात्र माझे असे प्रेम विषय।
नि:स्संग व्यवसाय - सर्व माझ॥३०॥
प्रेम माझे कुणी घ्याल का एवढे।
द्याल कां तेवढे मला पुन्हा॥
तुम्हाला सर्वांना जगाला देवाला।
हीच पृच्छा मला करायाची॥३१॥
मनींच्या कल्पना असाव्या मनांत।
नको सत्यतेंत - जन्म त्यांना॥
कल्पना सत्यांचा जीव हा भुकेला।
मन:सौंदर्याचा मला ध्यास॥३२॥ (मन: संभ्रमाचा मला मोह)