कशाला पूजावे सत्य हे कळलेले।
ध्येय लाधलेले नको मला ॥
अज्ञेय सत्याचा - अप्राप्य प्रेमाचा।
अश्राव्य गीताचा - भुकेला मी॥२०॥
देव मागे दान माझ्याच श्रद्धेचे।
आणि मीं ज्ञानाचे - तयाजवळी॥
जरी श्रद्धा मला ठेवताना येती।
वेदना संपती तत्क्षणीच॥
परी माझी बुद्धि सर्वदा अश्रद्धा।
तर्क माझा अंध - भावनांचा॥२१॥
भाव आणि गीति हेतु आणि नीति।
देव आणि भक्ति एकरूप॥
नेत्र आणि शोभा - प्रीति आणि प्रेमी।
स्फूर्ति आणि हा मीं - एकरुप॥२२॥
असे दु:खावेग सारखे येउनी।
चित्त झाले सखे शक्तिहीन ॥२३॥ (थिजे रोम रोम निराशेने)
मळयांत विश्वाच्या वाढली लता ही।
आंसवे सांडली वरी माझीं॥
पांच वर्षांनी ती लागली फुलाया।
मजसवे डुलाया - प्रेमगंधे॥२४॥
चित्त होते दु:खी जागृत स्थितींत।
कल्पना सृष्टित - रंगलेले॥
तुझें माझें ऐक्य स्वैर अनुकभावीत। (असावे)
स्वप्नस्थ सर्व काळ॥२५॥ (असे मीं स्वप्नस्थ सर्व काळ)
अनन्ततेशी - गीत मीं गातांच तुझ्या ओठी हसे।
यामुळे येतसे अनंतत॥
क्षुद्र माझे हृदय उच्च्भाव त्यांत।
कसे जन्मतात कोण जाणें॥
जीव कासावीस तुझ्यासाठी होई।
सहज येई गीत नाद॥
आत्मैक्य नसते - तुझे माझें जरी।
कोठले अंतरीं काव्य माझ्या॥२६॥
सदां दृष्टीपुढे उच्च ध्येय येतें।
पुन्हा आडविते - कुणीतरी॥
वासना वैरिणी टाकिते झांकुनी।
तेज जें चमकते अंतरांत॥२७॥
सौख्य सृष्टि दिसे इच्छेच्या डोळयांस।
आनंदाची वृष्टि अपेक्षेला॥
अपेक्षा ही माझी निरिच्छ असण्याची।
सापेक्ष नसण्याची - एक इच्छा॥।
मला सौख्य कुठले-कोठले आनंद।
आत्मतत्व भुललें शून्य भावी॥२८॥ (चित्त हे गोठले निराशेने)
असंभाव्यतेचे भोवती वर्तुळ।
कुठें न पाऊल टाकवे हे॥
सर्वदा आशा ह्या अशा ठेचाळती।
कां मनी जन्मती निरर्थक॥२९॥