सख्या भूतकाला, तुझ्या अन्तरांत। वेदना त्या सुप्त, किती माझ्या।।
तुझ्या अंगावरी, फेकुनी अनुभव। शान्त केला जीव, स्वत:चा मी ॥१॥
पिशाच्च स्मृतीचें, जरी हें मरेल। क्षणांत होईल, मुक्ति माझी।।
भूतकाला तुझे, आणि या जीवाचे। संबंध कायमचे, कशाला हे ॥२॥
भूतकाल गेला, इथे टाकूनियां। भविष्याची छाया, दिसे दूर।।
सख्या वर्तमाना, तुझ्या पंखावरी। बसूं दे क्षणभरी, अभाग्याला ॥३॥
गिळाया मोजके, सुखाचे हे क्षण। सदा पसरी वदन, भूतकाळ।।
दु:ख मात्र तितुके, स्मृतीच्या करंड्यांत। घालुनीयां परत, करी माझें ॥४॥
भविष्य देवते, तुझ्या निकट यावें। तोंच तूं सरकावें, पुढे पुन्हां।।
खेळसी माझ्याशी, शिवाशीव कां ही। मला न केव्हाही, शिवूं देसी ॥५॥
वर्तमान माझा, होईल होवो ते। जाऊ द्या गेले तें, यदृच्छया।।
भूतकालाचें तें, सांडलें माणिक। भविष्याची हांक, नसे श्राव्य ॥६॥
दृष्टि लावियेली, भविष्याचे वदनीं। एवढी विनवणी, सदा केली।।
वीट आला माझ्या, वर्तमानाचा ह्या। मला तारावया, तुवा यावें।।
भविष्यराज तो, दयार्द्र होऊनी। माझिया जीवनी, प्राप्त झाला।।
परन्तु वैरी हा, करी वर्तमान। भविष्याचे हनन, स्वत:मध्यें ॥७॥
भाकरीचा एक, मिळावा चतकोर। नीति होते ठार, म्हणूनी ती।।
कशाला एवढे, वेड हें जगण्याचें। भाग्य निश्चेष्टेचें, किती भव्य ॥८॥
जीवा तुला, जोंवरी वेदना। शान्ति माझ्या मना, तोंवरी न।।
जरी झाला कधीं, विसर माझा मला। तरी सुद्धां तुला, आठवीन ॥९॥
सदा हा नावरे, अन्तरी सुवास। तया फेकी श्वास, जगामध्यें।।
प्रतीति सत्याची, आत्मदेवा झाली। गीत-वाणी आली, अशी ओठी ॥१०॥
फेब्रुवारी