चक्रनेमिक्रम, विराट विश्वाचा।
असा चालायाचा, निरंतर ॥
जन्ममृत्यूंच्या या, पावलांनी दोन।
कालाचें हे वन, फिरे आत्मा ॥१॥
प्रकाशांची संख्या, असंख्य आधीच।
वाढवूनी उगीच, काय लाभ ॥
आकाशकंदिली, झाडावरी एका।
मिणमिणा दिवा कां, लावियेला ॥२॥
दरिद्री शब्द हे, कशाला मीं गावे ।
व्यर्थ का मिरवावे, क्षुद्र तेज ॥
पायमाल झाली, आशांची दौलत।
घेतली हातांत, राख त्यांची ॥३॥
चिता प्रेमाची त्या, धडाडली भव्य।
सव्य वा अपसव्य, नुरे मजला ॥
भस्म सर्वस्वाचे, सर्वांगी चर्चिलें।
नंतरी अर्चिले, देव-देवा ॥४॥