-५-
वैदिक संस्कृति ही आजच्या भारतीय संस्कृतीहून मी निराळी समजतो. आज एकंदर सव्वाशे संस्कृति जगतीतलावर प्रतिष्ठित आहेत असे तज्ज्ञ मानतात. वैदिक संस्कृति ही त्या ‘अनेकातली एक’ संस्कृति नव्हे. सर्व संस्कृतींना अधिष्ठानभूत असणारी जी एक संस्कृति तिचे नाव वैदिक संस्कृति असे आहे. एखाद्या कालखंडापुरती, स्थल-विशेष-निष्ठ अशी ही संस्कृति नव्हे. डॉ.स्पेंग्लर या सुप्रसिद्ध जर्मन पंडिताने सुचविलेले संस्कृतीचे नियम व अनु्क्रम वैदिक संस्कृतीला लागू होत नाहीत. जणू काय, जायते, अस्ति, वधते, विपरिणमते, अपक्षीयते, विनश्यति हे षड्-विकार प्रत्येक संस्कृतिला अनिवार्य आहेत, असे स्पेंग्लर म्हणतो. प्रत्येक संस्कृति ही एक सजीव प्रकृति (Organism) आहे व वरील अवस्थांमधून जाणे तिला अपरिहार्य आहे. भारतीय संस्कृति ही विनाशोन्मुख झाली आहे, असेही त्याचे एक विधान आहे. ते अल्प अर्थाने खरेही असेल. पण वैदिक संस्कृति ही अमर आहे, हे मात्र त्रिकालाबाधित सत्य आहे. वैदिक संस्कृति ही आदर्श संस्कृति होय. प्रज्ञान, समता, विश्वाचे ईशावास्यत्व हे वैदिक संस्कृतिचे व्यावर्तक त्रैगुण्य आहे. ज्या संस्कृतीत ही वैशिष्ट्ये आहेत ती संस्कृति वैदिक संस्कृतीची प्रतिनिधी आहे. मानवकुल एक आहे. मानवी संस्कृति एकच आहे. आचारविचारांच्या गौण वैशिष्ट्यांमुळे निष्पन्न होणारी सांस्कृतिक विविधता ही मूलभूत एकात्मतेला संपन्नता आणणारी आहे, नष्ट करणारी नव्हे.
-६-
असूयक व द्वेष्टे शत्रू वेदविद्येला पूर्व-कालीही होते. अशाच आजच्यासारख्या एका कालखंडात, वेदविद्येने ‘बह्मविद्’ बाह्मणांजवळ जाऊन अभय व शरण्य मागितले आहे. ‘विद्या ह वै बाह्मणं आजगाम। गोपाय मां शेवधि: ते अहं अस्मि। असूयकाय अनृजवे अयतारा न मा बूया: । वीर्यवती तथा स्याम्।।’
आचार्य यास्कांच्या निरुक्ताधारे या वचनाचा अर्थ असा आहे - वेदविद्या किंवा अध्यात्मविद्या बाह्मणाजवळ गेली व म्हणाली, “माझे संरक्षण कर. मी तुझा वैभव-निधी आहे. गुणांचे ठिकाणी दोषाविष्कार करणार्या मत्सरग्रस्ताला तू मला देऊ नकोस. तसेच कुटील वृत्तीच्या दुष्टाला, शठाला माझे स्वरूप सांगू नकोस. जो अ-यत आहे, इंदियांचे संयमन करीत नाही, त्याला माझे स्वरूप सांगू नकोस, असे केलेस तर मी प्रभावी, तेजस्विनी होईन. तुझ्यापासून ज्यांना माझी प्राप्ती होईल, त्यांच्या ठिकाणी मी अन्तस्तेजाने चमकेन.” आजचे अणुविज्ञान हे देखील संशोधकांजवळ, ज्ञात्यांजवळ हीच याचना करीत आहे. ते म्हणते, “मला दुष्टांच्या, शठांच्या स्वाधीन करू नका. मानवाच्या चिरशांतीसाठी व चिरसुखासाठी माझा उपयोग करा. मानवता ही ‘अ-योध्या’ आहे. अणुविज्ञान पुढे म्हणते, “मी विज्ञान आहे. मी वेदविद्येचा अवतार आहे. सर्व-संहारासाठी माझा उपयोग करणे हे मला असंमत आहे. विश्व-शांति सिद्धविण्यासाठी माझा आविष्कार आहे. माझ्या साहाय्याने अनंत अंतराळे, अनंत विश्वे तुम्ही काबीज करा, पण माझा संहारक उपयोग तुम्ही करू नका.”
-७-
वेदविद्या ही अ-लौकिक उपायांची जननी आहे.
“प्रत्यक्षेण अनुमित्या वा यस्तूपायो न बुध्यते।
एनं विन्दति वेदेन तस्मात् वेदस्य वेदता।।”
इतर शास्ते ही लौकिक आहेत. एक वेदविद्या मात्र अलौकिक आहे. वेदशक्ती ही अतीन्दिय शक्ती आहे. ही अतीन्दिय शक्ती ज्यांनी परंपरेने ‘प्रवर्तितो दीप इव प्रदीपात’ अशा अखंड संक्रमणाने या क्षणापर्यंत मुखोद्गत ठेविली त्या भारतीय वैदिकांचे केवळ भारतावरच नव्हे तर सर्व मानवतेवर अनंत उपकार आहेत. या वस्तुस्थितीची जाणीव आपल्यापेक्षा विल्यम् जोन्स, मॅक्स मुल्लरपासून विद्यमान फ़्रेंच पंडित रन पर्यंतच्या पाश्चिमात्य विद्वांनाना अधिक प्रमाणात असावी याबद्दल मात्र सखेद आश्चर्य वाटते. यंदा पुण्यास टिळक-मंदिरात प्रतिवार्षिक वेद-व्यास महोत्सवाच्या प्रसंगी जमलेल्या मंडळींत पांच अमेरिकन, एक बेल्जिअन, एक फ्रेंच व एक कोरियन असे परदेशीय पंडित महोत्सवातील व्याख्याते म्हणून उपस्थित होते. यांच्यापैकी काहीजण उत्कृष्ट वेदाभ्यासक होते. कोरियाचे डॉ.के.बाक यांनी अस्खलित संस्कृतमध्ये व्यास-महर्षिंबद्दल व त्यांच्या वेदव्यवस्थेबद्दल अभ्यासपूर्ण व प्रभावी भाषण करून सुमारे दोन हजार श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून सोडले. परदेशी विद्वानांकडून वेदविद्येला दाखविण्यात येणारा हा आदर पाहिला म्हणजे या विद्येच्या अभिवृध्दयर्थ आपण, आपले पुढारी व शासनसंस्था आज काय करीत आहोत? असा प्रश्न सहजच मनात येतो.
-८-
शके १८०३ मध्ये पुण्यातील काही विद्वानांनी व वेदभक्तांनी या प्रश्नाचे उत्तर शोधून काढले व प्रत्यक्ष कार्याला सुरूवात केली. ‘पुणे वेदपाठशाळा’ या संस्थेची स्थापना करून, त्यातून वैदिक विद्वान निर्माण करण्याची त्यांनी योजना केली. गेली ८०-८१ वर्षे ती संस्था अखंड अध्ययन-अध्यापनाचे कार्य करीत आहे. याच संस्थेच्या द्वारा ‘वैदिक विद्वानांचा परिचय’ या पुस्तकाचा पहिला भाग शके १८७८ मध्ये प्रकाशित करण्यात आला व आज संस्थेच्या अमृतमहोत्सवाच्या प्रसंगी सदर पुस्तकाचा दुसरा भाग प्रसिद्ध होत आहे. ही फार समाधानाची गोष्ट आहे. या पुस्तकाच्या दोन्ही भागात मिळून २३७ वैदिकांचा परिचय देण्यात आला आहे. संपादक श्री.सी.वि.केळकर यांची ही कल्पना सर्वथैव आदरणीय आहे. वैदिक मंहळी स्वभावत:च अंत:र्मुख व प्रसिद्धीपराङ्मुख असतात. त्यांचे जीवन बाह्यत: आकर्षक नसते. शेजारीपाजारी व नातलग यांना देखील वैदिकांची कदर नसते. अशा परिस्थितीत त्यांच्याबद्दल माहिती मिळवणे व चोखंदळपणे ती प्रकाशित करणे हे कार्य फार दगदगीचे आहे पण ते केले जाणे अत्यंत आवश्यक व फलत: समाजास अतीव उपकारक आहे यात शंका नाही. श्री.केळकर यांच्या हातून ही वैदिकांचीच नव्हे तर वेदपुरुषाची महनीय सेवा घडत आहे. या सेवेत त्यांच्या जीवनाचे साफल्य आहे असे मी समजतो. वैदिकांच्या अर्वाचीन इतिहासाची खरी साधने, या पुस्तकातील अल्प चरित्रे हीच होत. शिवाय त्यांच्या वाचनाने ‘अतीत’ स्मृतिबद्ध होते व अनागताला नवीन स्फूर्ति मिळते. या ग्रंथात इतिहास आहे त्याचप्रमाणे भावी पिढीला एक मूक आदेश आहे. आजकालही विद्वान् वेदविभूति आपल्यामध्ये आहेत, असू शकतात व उद्याही त्या संभवतात असे आश्वासन हा गंथ आपणास देत आहे. श्री.केळकर यांच्या हृदयातही ही श्रद्धा नंदादीपासारखी तेवत आहे. त्या नंदादीपाच्या पकाशात त्यांनी वैदिकांच्या जीवनाचे संशोधन चालविले आहे. त्यांना उदंड आयुरारोग्य मिळावे व त्यांच्या करवी अधिकाधिक वेदसेवा व्हावी अशी मी श्रुतिमाऊलीच्या चरणी प्रार्थना करून हे मंगलाचरण संपवतो. मिति आश्विन शु॥ ५ शके १८९४
- धुं. गो. विनोद
ॐ ॐ ॐ