-३-
वेद म्हणजे ज्ञान. येथे शब्दाचा अर्थ ‘जाणण्याची क्रिया’ असा नव्हे. ज्ञान म्हणजे स्वयंसिद्ध ‘ज्ञप्ति’ होय. पंचदशीत विद्यारण्यांनी ‘ज्ञप्ति’ हा शब्द स्वयंसिद्ध ज्ञान या अर्थी वाप्ररला आहे. ज्ञान ही स्थलकालातीत अशी मूल-शक्ती आहे. ‘सत्यं ज्ञानं अनन्तम्’ या पदत्रयीतले ज्ञान हे पद मूल-शक्तीवाचक व ब्रह्मवाचक आहे. ज्ञान हा शब्द या मूलार्थाने आपणास सहसा परिचित नसतो. वेद हे ज्ञानस्वरूप आहेत हा सिद्धान्त समजावून घेताना, ज्ञान शब्दाचा हा मौलिक अर्थ आपण ध्यानात घेतला पाहिजे. ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय या त्रिपुटीतला ज्ञान हा शब्द वृत्ति-ज्ञानाचा, विधानगत ज्ञानाचा दर्शक आहे. ‘वेद म्हणजे ज्ञान’ या विधानातल्या ज्ञान शब्दाचा अर्थ श्री ज्ञानेश्वरांनी पुढीलप्रमाणे स्पष्टविला आहे.
ज्ञातज्ञेयाविहीन । नुसतेचि जे ज्ञान ।
सुखाभरले गगन । गाळीव जे । - ज्ञानेश्वरी
-४-
आज वेदपुरुषावर जे प्रहार होत आहेत, त्यात शत्रूक्रडून होणार्या प्रहरांपासून वेदांना तितकासा धोका नाही. “मला मित्रांपासून वाचवा”, “पाहि मां मामकीनेभ्य:” असा वेदपुरुषाचा आजचा आक्रंद आहे. आज वेदपुरुषावर भारतीय जनतेकडून जो प्रहार होत आहे, त्या प्रहाराचे नाव ‘उपेक्षा’ आहे. ही आपली वेदांबद्दलची उपेक्षावृत्ती आपल्या निश्चेष्टतेची, मृतावस्थेची ज्ञापक आहे. वेदपुरुष अमर आहे. आपण मात्र स्थिर शवासन घालून बसलो आहोत! यात आपण स्वत:ची हत्या करीत आहोत. वेदांची उपेक्षा म्हणजे खरोखर आपल्या विकासाची, आपल्या स्व-त्वाची, आपल्या संस्कृतीची उपेक्षा आहे, हे आपण ध्यानात घेऊ या. .....