-२-
वेद हे ‘अन्-अंत’ आहेत. वेदांना स्थलत:, कालत:, स्वरूपत: व तत्त्वत: केव्हाही नाश संभवत नाही.
पृथ्वी सूर्याच्या समोर नसली म्हणजे रात्र होते, पण रात्र झाली म्हणून सूर्याचा नाश होऊ शकत नाही. सूर्यनारायणाप्रमाणेच भगवान वेदोनारायणाचे आहे. आपल्या दृष्टीच्या आड वेदोनारायण झाले असे वाटले तरी त्यांच्या दृष्टीच्या आड आपण कधीही होऊ शकत नाही.
सप्त महापु्रुष चिरंजीव असल्याचा उल्लेख सुप्रसिद्ध आहे. वेदांचे चिरंजीवन त्याहू्नही श्रेष्ठ अर्थाने खरे आहे. कारण वेद हे कृति, आकृति किंवा विकृति या परिणाम-त्रयीने झालेले नाहीत. अर्थात त्यांना विनाश संभवत नाही.
महाप्रलयकाली परिणाम हे ‘पू्र्वात् पूर्व’ या पतक्रमाने कारणात लीन होत असतात.
वेद हे ‘कारण तत्त्व’ आहेत, परिणाम नव्हेत. म्हणू्नच वेद हे अपौरुषेय आहेत आणि केवलरूप, स्वयंप्रकाश, स्वयंसिद्ध व स्वयंपूर्ण आहेत.