४
अंधश्रद्धा म्हणजे विवेचक बुद्धीचा अभाव. ही अंधश्रद्धा धार्मिक विषयातच असते असे नव्हे. विज्ञानाविषयीही अंधश्रद्धा असू शकेल व धार्मिक बाबींत डोळस चिकित्सा असंभाव्य नाही. विषयावरून, क्षेत्रावरून क्षेत्रज्ञ किंवा विषयज्ञ यांच्या भूमिकेचे स्वरूप ठरत नाही. विज्ञानाच्या क्षेत्रात आंधळया कोशिंबिरीचा खेळ खेळत वावरणारे पढतमूर्ख, अंधश्रद्ध व परप्रत्ययनेय बुद्धीचे लोक आढळतात तर धर्माच्या, मंत्रतंत्रांच्या क्षेत्रात काही डोळस, चिकित्सक व तर्कनिष्ठ संशोधकही भेटतात. आधुनिक भारतीय तरूण पाश्चात्य विज्ञानाबद्दल काहीसे अंधश्रद्ध दिसतात. तर काही पाश्चात्य पंडितांना भारतीय धार्मिक जीवनात सोज्वळ बौद्धिकता व तर्कनिष्ठा आढळते. तर्कशुद्ध भूमिका ती की जिला कोठलाही पूर्वग्रह दूषित करीत नाही. मंत्रविद्या आमची म्हणून किंवा मंत्रविद्या म्हणून श्रेष्ठही नव्हे व उपेक्षणीयही नव्हे. आधुनिक विज्ञान पाश्चात्यांचे म्हणून ग्राह्य नव्हे व त्याज्यही नव्हे. विवेचक, शास्त्रीयदृष्टीला पटेल ते आदरणीय व पटणार नाही ते तिरस्करणीय. अतींद्रिय, अलौकिक अनुभव मला येत नाहीत, कळत नाहीत म्हणून ते असंभाव्य ठरत नाहीत. तर्काला, विशुद्ध वैज्ञानिक दृष्टीला, डोळस अनुभव शास्त्राच्या कसोटीला उतरतील तरच ते यथार्थ, ग्राह्य व प्रमाणभूत. शास्त्रीयदृष्ट्या ग्रंथांत केवळ वस्तुस्थितीचे चित्र रेखाटलेले असते, उपलब्ध अनुभव स्पष्टविलेले असतात, त्यांचा परस्पर संदर्भ, समन्वय लावण्याचा प्रयत्न केलेला असतो. मंत्रविद्येकडे अशा विशुद्ध, शास्त्रीय वैज्ञानिकदृष्टीने भारतीय तरूणांनी पाहिले पाहिजे. तरूण पिढीपुढे हा ग्रंथ ठेवण्यात, मंत्रविद्येचे आधुनिक व शास्त्रीय दृष्टीने पुनरूज्जीवन व्हावे, एवढाच श्री. खरे शास्त्री यांचा आंतर हेतु आहे. मंत्रविद्येचे साहित्य त्यांनी सत्यान्वेषक चिकित्सकांकरिताच एकत्र आणिले आहे.
- धुं. गो. विनोद
ॐ ॐ ॐ